|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » राज्यात शेतीसाठी दिवसा अखंड वीजपुरवठा

राज्यात शेतीसाठी दिवसा अखंड वीजपुरवठा 

प्रतिनिधी / मुंबई

शेतीसाठी दिवसा 12 तास अखंड वीजपुरवठा देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी ‘मी मुख्यमंत्री बोलतोय’ या कार्यक्रमात शेतकऱयांशी संवाद साधताना केली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयनिर्मित या कार्यक्रमाचा दुसरा भाग दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारित केला.

यशवंत पोपळे व मधुकर पवार या शेतकऱयांच्या सूक्ष्म सिंचनाबाबतच्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस म्हणाले, सूक्ष्म सिंचनामुळे पाण्याची बचत होते. उत्पादकता वाढते, सूक्ष्म सिंचनामुळे पिकांचे योग्य नियोजन करता येते. सरकार साखर कारखाने व शेतकऱयांच्या मदतीने राज्यातील पाच धरणक्षेत्रातील संपूर्ण ऊस शेती ठिबक सिंचनावर आणणार. तसेच अपूर्ण सिंचन प्रकल्पासाठी पेंद्र सरकारकडून 26 हजार कोटी रुपये मिळणार आहेत. यामुळे अपूर्ण सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यास मोठी मदत होणार आहे. जलतज्ञ राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली कोकणातील पाच नद्यांचे पुनरूज्जीवन करून कोकणातील फळप्रक्रिया उद्योगाला चालना देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

जगात हळदीचे महत्त्व वाढत आहे. हळद प्रक्रिया उद्योग निर्माण करण्यासाठी 50 लाख रुपयांपर्यंतची योजना आहे. सरकारने नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प सुरू केला आहे. या प्रकल्पाचा मूळ उद्देश वातावरणातील बदलाचा मुकाबला करणारी शेती तयार करणे असा आहे. नाशिकच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱयांना लागणाऱया आच्छादनाची निर्मिती करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

कार्यक्रमाच्या पहिल्या भागात गेल्या रविवारी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱयांना त्यांच्या बँक खात्यात अनुदाने थेट रक्कम जमा करण्याबाबत शासनाचा निर्णय जाहीर केला होता आणि कर्जमाफीच्या विषयावर सविस्तरपणे सरकारची भूमिका मांडली होती.