|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शेतकऱयांवर वार करणाऱया सरकारचे हात छाटा

शेतकऱयांवर वार करणाऱया सरकारचे हात छाटा 

आमदार बच्चू कडू यांचे आवाहन, आसूड मोर्चाचे कराडात स्वागत

वार्ताहर / कराड

आजवर देशाने जातीय व धर्मवाद पाहिला आहे. मात्र जगाचा पोशिंदा असणाऱया शेतकऱयाला जगवण्यासाठी आता देशाला कट्टर शेतकरीवादाची गरज आहे. चुकीचे निर्णय घेऊन शेतकऱयाच्या छातीवर वार करणाऱया सरकारचे हात छाटण्याची तयारी शेतकऱयांनी सुरू केली पाहिजे. जगाला जगवणाऱया शेतकऱयाला अपमानास्पद जीवन जगण्याची वेळ येऊ नये, यासाठी जात-पात, पक्ष संघटना विसरून एकत्र यावे, असे आवाहन आमदार बच्चू कडू यांनी केले.

 नागपूर येथून निघालेली शेतकरी, शेतमजुरांची सीएम टू पीएम आसूड यात्रा रविवारी दुपारी येथे आली. दत्त चौकातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा व स्मृतिसदनातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळयास अभिवादन केल्यानंतर झालेल्या जाहीर सभेत आमदार बच्चू कडू बोलत होते. यावेळी शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते रघुनाथदादा पाटील, बी. जी. पाटील, पंजाबराव पाटील, साजिद मुल्ला, विक्रम थोरात, विश्वास जाधव व कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

आमदार कडू म्हणाले की, साठ वर्षातील सरकारचा लेखाजोखा काढला तर शेतकरी कर्जबाजारी नसून सरकार कर्जबाजरी असल्याचे समोर येईल. सरकारने नेहमीच पिकवणाऱयांपेक्षा खाणारांचा विचार केल्याने शेतकरी अडचणीत आला आहे. देशात मोठय़ा प्रमाणात तुरीचे उत्पादन झाले असताना सरकारने निर्यात बंदी घातली. 18 हजार रूपये दराने तुर आयात केली. देशातील तुरीचे दर 4 हजार रूपयांवर आणले. हे सरकार महागाई कमी करून खाणारांचा विचार करून शाब्बासकी मिळवत आहे. पण शेतमालाचे दर पाडून सरकार शेतकऱयांच्या छातीवर वार करीत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी टाटा, बिर्लासारख्या असंख्य उद्दोजकांच्या उत्पादनावर निर्यात बंदी घालून दाखवावी. आपण स्वत: मोदींच्या घरात चपला उचण्याचे काम करू. बडय़ा उद्योगपतींसाठी 56 इंचाची छाती दाखवणाऱया मोदींनी शेतकऱयांसाठी 35 इंचाची तरी छाती दाखवावी, असे आव्हान बच्चू कडू यांनी दिले.

 शेतकऱयांच्या कर्जमुक्तीसह विविध मागण्यांसाठी नागपूर येथून मुख्यमंत्र्यांच्या घरापासून आसूड मोर्चास सुरवात केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी 1 लाखापर्यंतच्या कर्जाची माहिती मागवली आहे.आसुड मोर्चा गुजरातमधील नरेंद्र मोदींच्या घरी जाईपर्यंत हे सरकार शेतकऱयांची कर्जमुक्ती करेल, असा विश्वासही आमदार बच्चू कडू यांनी व्यक्त व्यक्त केला.

अन्यथा मंत्र्यांची गाडी फोडणार

देशातील अपंग व विधवांपेक्षाही आमदार व खासदार गरीब आहेत.कारण अपंग व निराधार विधवांना असलेली 500 ते 900 रूपयांची पेन्शन वाढवण्याची मागणी असताना वाढ न देता आमदार व खासदारांनी स्वत:च्या पेन्शनमध्ये वाढ करून घेतली. समाजकल्याण मंत्र्यांनी एप्रिलपर्यंत 1 हजार रूपयांनी पेन्शन वाढवण्याचे आश्वासन दिले आहे. जर पेन्शन वाढली नाही तर मे महिन्याच्या पहिल्या आठवडय़ात समाजकल्याण मंत्र्यांची गाडी मंत्रालयातच फोडण्याचा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला.