|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कोंत्येव बोबलाद, कागणरीत तीन पानी जुगार अडडय़ावर छापा

कोंत्येव बोबलाद, कागणरीत तीन पानी जुगार अडडय़ावर छापा 

प्रतिनिधी / उमदी, जत

जत तालुकयातील कोंत्येव बोबलाद आणि कागणरी येथे अनेक दिवसांपासून सुरू असणारा तीन पानी जुगार आंतरराज्यीय अडय़ावर सांगलीचे पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पोलीस पथकाने रविवारी सायंकाळी छापा टाकून सुमारे 47 लाखांचा मुददेमाल ताब्यात घेतला आहे. यात रोख रक्कम, मोटर सायकली, चारचाकी गाडय़ा, किंमती मोबाईल, पत्त्यांचे डाव याचा समावेश आहे. तर तीन पानी खेळणाऱया 25 जुगाऱयांना अटक केली आहे. कर्नाटक व महाराष्ट्रातील हे जुगारी असून, यात अनेक बडय़ा घरातील लोकांचा समावेश आहे. सांगली जिल्हय़ातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे. तर या कारवाईमुळे उमदी पोलीसांच्या खाबुगिरीचे पितळ उघड पडले आहे.

याबाबत अधिक माहीती अशी, जत तालुकयातील उमदी पोलीस ठाण्याअंतर्गत  कोंत्येव बोबलाद व कागणरी येथे अनेक दिवसापासून तीन पानी जुगार अडडा सुरू होता. परंतु या अडय़ांवर कारवाई केली जात नव्हती. अनेकवेळा याची उघड चर्चाही झाली होती. शिवाय गेल्या दोन महीन्यापूर्वीच उमदी पोलीसांच्या भ्रष्ट कारभारा बाबत जतचे आमदार विलासराव जगताप यांच्या नेतृत्वाखाली भाजप व सेनेने एक दिवसांचे लाक्षणिक उपोषण केले होते. या उपोषणावेळीही या  अडय़ाबाबत उल्लेख झाला होता.

दरम्यान, कोंत्येव बोबलाद व कागणरी येथे दिवसा ढवळय़ा व राजरोसपणे जुगाराचा आंतरराज्यीय अडडा सुरू असल्याची माहीती पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे यांना मिळाली होती. त्यानुसार त्यांनी अतिशय गोपनीयता पाळत हा अडडा उद्धवस्त करण्याचे नियोजन केले हेते. त्यानुसार रविवारी दुपारी सांगलीच्या विशेष पोलीस पथकाचे प्रमुख दीपक ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पथक नियुक्त करून ही कारवाई केली. या कारवाईत सुमारे 47 लाखांचा मुददेमाल पोलीसांना मिळून आला आहे.

कोंत्येव बोबलाद येथे तुकाराम माळी यांच्या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये पोलीसांनी छापा टाकला यावेळी येथे 12 जुगारी आणि सुमारे 21 लाख 51 हजार  330 रूपयांचा मुददेमाल मिळाला आहे. यात रोख रक्कम एक लाख 830 रूपये, पत्त्यांची पाने 176, 15 किंमती मोबाईल याची किंमत 55 हजार 500, पाच मोटर सायकली व दोन महागडय़ा चारचाकी याची किंमत 19 लाख 95 हजार अशी आहे. तर येथे आरोपी तुकाराम गंगाप्पा माळी रा. कोंत्येव बोबलाद, परसाप्पा साबू हळळी रा. विजापूर, प्रकाश चिन्नाप्पा आगकर रा. विजापूर, रमेश बसाप्पा नुची रा. विजापूर, विशाल रवींद्र शेरखाने रा. विजापूर, श्रावण श्रोतीबा सरगर रा. करेवाडी, बसाप्पा महादेव तेली रा. करेवाडी, शिवाजी मरीबा भिसे, जटींग मेहबुब पांडू रा. कन्नुर, सलीम मौलाना जहागिरदार रा. विजापूर, उमेश दशरथ व्हसमणी रा. धुमकनाळ अशी आरोपींची नावे आहेत. या सर्वांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

कागणरीत सव्वीस लाखांचा मुददेमाल

तर कागणरी येथील अडय़ावर टाकलेल्या छाप्यात सुमारे 26 लाखांचा मुददेमाल जप्त केला आहे. येथे सुभाष यमाजी चव्हाण यांच्या पत्राशेडमध्ये हा अडडा सुरू होता. येथे रोख रक्कम 96 हजार, किंमती मोबाईल बारा, आलिशान चारचाकी व मोटरसायकली 12, पत्त्यांचे डाव याचा समावेश आहे. येथे बारा आरोपींना अटक केली आहे. यात रामण्णा हनुमान दोरमळे रा. बळगानूर, चिदानंद सुरेश देशपांडे रा. रेवतगाव, अशोक शिवाप्पा जैनापूर रा. मुधोळ, इराप्पा भद्राप्पा माडगी रा. बुध्देबिहाळ, सिध्दणगौडा मोनाप्पा बिरादार रा. बळगाणुर, विजयकुमार धोंडीबा साळुंखे रा. विजापूर, समीर निसार मणीयार रा. विजापूर, रेवाप्पा निंबाण्णा मंटूर रा. वज्रमठी, गोकारप्पा सदाशिव घाणेगेर रा. वज्रमठी, परशूराम गणपती पालघाल, जब्बार मनुसाब देगनाळ रा. विजापूर, संगमेश निलाप्पा नाशी रा. तालीकोट अशी आरोपींची नावे आहेत.

या सगळय़ा आरोपींना पोलीसांनी ताब्यात घेवून जत न्यायालया समोर उभे केले होते. पोलीसांनी 14 दिवसांची पोलीस कोठडी मागितली आहे. तर याप्रकरणी उमदी पोलीसांत गुन्हय़ाची नोंद झाली आहे. या कारवाईत प्रमुख दीपक ठोंबरे, कर्मचारी पाटील, सानप, पुजारवाड, जाधव, चव्हाण आदींनी सहभाग घेतला होता. तर या धाडसी कारवाई बददल पोलीस प्रमुख दत्तात्रय शिंदे व पथकाचे जतेत विशेष कौतुक केले जात आहे.

 उमदी पोलीसांचे पितळ उघडे

जतच्या उमदी पोलीस ठाण्यांतर्गत विशेष पोलीस पथकाने इतकी मोठी कारवाई करून उमदी पोलीसांचे भ्रष्ट कारभाराचे पितळ उघडे पाडले आहे. तर पोलीसांच्या भ्रष्ट कारभारा बाबत जतेत भाजप सेनेने केलेल्या अंदोलनात झालेला उल्लेखाची सत्यता यानिमित्तांनी पुढे आली आहे. कायदय़ाचे रक्षकच भक्षक होत असल्याचेही अधोरेखीत झाले आहे.