|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » पासपोर्ट पडताळणीसाठी होणार टॅबलेटचा वापर

पासपोर्ट पडताळणीसाठी होणार टॅबलेटचा वापर 

प्रतिनिधी / बेळगाव

पासपोर्टसाठी अर्ज करणाऱयांना पोलीस पडताळणीसाठी लागणारा विलंब आणि त्यामुळे होणारी परवड थांबविण्यासाठी आता टॅबलेटचा वापर करण्याचा प्रस्ताव पुढे आला आहे. पासपोर्ट प्राधिकरण आणि पोलीस खात्याने पडताळणीसाठी लागणारा वेळ कसा वाचविता येईल यावर संयुक्तपणे विचारविनिमय सुरू केला असून लवकरच त्याची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

सध्या पासपोर्ट प्राधिकरणाच्या कार्यालयात पडताळणी झाल्यानंतर पोलीस पडताळणीसाठी संबंधित व्यक्तींचे अर्ज पोस्टाद्वारे संबंधित शहराच्या पोलीस मुख्यालयात पाठविले जातात. तेथून ती व्यक्ती राहत असलेल्या पोलीस स्थानकात हे अर्ज जातात. तेथे पडताळणी झाल्यानंतर पुन्हा पोलीसस्थानक ते मुख्यालय व मुख्यालयातून प्राधिकरणाचे कार्यालय असा पासपोर्ट अर्जाचा प्रवास होतो. याकाळात एखाद्या ठिकाणी अर्ज अडला तर पासपोर्ट मिळण्याची प्रक्रिया लांबते. यावर पर्याय म्हणून हा उपाय फायदेशीर ठरणार आहे.

या पर्यायानुसार प्रत्येक पोलीस मुख्यालयात या पडताळणीसाठी स्वतंत्र पोलीस अधिकारी व कर्मचाऱयांची नेमणूक करून त्यांच्याकडे पासपोर्ट प्राधिकरणाशी जोडलेला टॅबलेट दिला जाणार आहे. या टॅबलेटवर पडताळणी पूर्ण झाल्याचा शेरा या अधिकाऱयांना आवश्यक कार्यवाहीनंतर द्यावा लागणार आहे. यामुळे कागदोपत्रांचा प्रवासही थांबणार असून पोस्टाद्वारे लागणारा विलंब टाळला जाणार आहे. एका क्षणात पडताळणी पूर्ण झाल्याचे प्रमाणपत्रच प्राधिकरणाकडे गेल्यास पुढे पासपोर्ट देण्याची प्रक्रियाही तातडीने सुरू होणार आहे. यामुळे नागरिकांची मोठय़ा प्रमाणात सोय होवू शकणार आहे.

सध्या हा प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यावर अद्याप अंतिम निर्णय घेण्यात आलेला नाही. दरम्यान प्रस्ताव उत्तम असून त्यासाठी वेळ घातला जावू नये, अशाच प्रतिक्रिया नागरिकांतून व्यक्त होत आहेत. बेळगावकरांना पासपोर्टसाठी हुबळीला जावे लागते. पडताळणीचे अर्ज हुबळी ते बेळगाव असा उलटा प्रवास करत असल्याने बराच उशीर होतो. अशावेळी हा प्रस्ताव चांगलाच कामी येईल, अशी अपेक्षा आहे.