|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » पर्ससीनविरोधात मच्छीमार आक्रमक

पर्ससीनविरोधात मच्छीमार आक्रमक 

देवगड : देवगड समुद्रामध्ये अवैधरित्या पर्ससीन ट्रॉलर्स मासेमारी करीत असून त्यांच्यावर मत्स्य व्यवसाय विभाग कोणतीही कारवाई करीत नसल्याबाबत संतप्त मच्छीमारांनी तहसीलदार सौ. वनिता पाटील यांची भेट घेऊन आपली कैफियत मांडली. दोन दिवसांत पर्ससीनविरोधात कारवाई न झाल्यास मच्छीमारांच्यावतीने उग्र आंदोलन छेडले जाईल. आंदोलनावेळी मच्छीमारांचा उद्रेक झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार मस्त्य खाते व प्रशासन राहील, असा इशारा मच्छीमारांनी दिला. मत्स्य परवाना अधिकाऱयांनाही मच्छीमारांनी यावेळी धारेवर धरले.

यावेळी दिर्बा यांत्रिकी मासेमारी नौका मालक संघाचे अध्यक्ष भाई खोबरेकर, फिशरमेन्सचे माजी चेअरमन संजय बांदेकर, तारामुंबरी मच्छीमारी सोसायटीचे माजी चेअरमन ज्ञानेश्वर खवळे, युवा मच्छीमार नेते तुषार पाळेकर, जयप्रकाश खवळे, दत्ताराम कोयंडे, प्रमोद खवळे, सुनील सावंत, बाबू हिरनाईक, सागर फडके, उमेश खवळे, दीपक जाधव, सुशांत प्रभू, गुरुनाथ तारी, गणेश कुबल, अश्विनी धुरी, जितेंद्र धुरी, बाळा आचरेकर, भाऊ कुबल आदी मच्छीमार उपस्थित होते. मंगळवारी सकाळी 11.30 वा. सुमारास मच्छीमारांनी तहसीलदार सौ. पाटील यांची भेट घेत आपले पर्ससीन विरोधात आपली भूमिका मांडत तत्काळ कारवाईची मागणी केली. यावेळी मत्स्य परवाना अधिकारी श्री. वारुंजीकर उपस्थित होते.

कारवाई न केल्यास कायदा हातात घेऊ!

 मच्छीमार नेते खोबरेकर यांनी सांगितले, शासनाच्या नियमानुसार 1 जानेवारीपासून पर्ससीन मासेमारीला बंदी आहे. बंदी कालावधीत पर्ससीन मासेमारी झाल्यास त्यांच्यावर तत्काळ कारवाई करून त्यांचा परवाना व रजिस्ट्रेशन रद्द करण्याचे निर्देश आहेत. मात्र, मत्स्य व्यवसाय परवाना अधिकारी पर्ससीन धारकांसोबत संगनमत असल्याने कारवाई करीत नाहीत. गेल्या महिन्यामध्ये दहा वाव पाण्यात पर्ससीनला मासेमारी करताना पोलिसांनी गस्तीवेळी पकडले. त्यामध्ये मासळीही सापडली. मात्र, मत्स्य परवाना अधिकारी श्री. वस्त यांनी पंचनामा करताना किरकोळ मासळी मिळाल्याचे दाखवून त्यांना नाममात्र दंड करून सोडण्यात आले. पर्ससीनवरील कारवाई पैशाच्या दबावापोटी मत्स्य व्यवसाय विभागाकडून केली जात नाही. त्यामुळे सर्वसामान्य लहान मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे यापुढे पर्ससीनवर कारवाई न झाल्यास मच्छीमारांना कायदा हातात घ्यावा लागेल, असा इशारा दिला.

अन्यथा अधिकाऱयांना डांबून ठेवू – बांदेकर

मत्स्य परवाना अधिकाऱयांनी दोन दिवसांत पर्ससीनवर कारवाई न केल्यास मत्स्य परवाना अधिकाऱयांना त्यांच्या कार्यालयात डांबून ठेवू. जर आमच्यावर उपासमारीची वेळ येत असेल, तर या अधिकाऱयांनाही आम्ही सोडणार नाही, असा इशारा दिला. बंदरामध्ये पर्ससीन नौका उभ्या आहेत. पर्ससीनला बंदी असताना बंदरात नौका उभ्या का? या उभ्या असलेल्या पर्ससीन नौकांवर कारवाई करा. या पर्ससीन बोटींवर जाळी सापडतील. त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, असेही बांदेकर यांनी सांगितले.

पर्ससीनमुळे उपासमारीची वेळ – ज्ञानेश्वर खवळे

पर्ससीनच्या मासेमारीमुळे यांत्रिकी नौकांना मासे मिळत नाहीत. पर्ससीन नौका लाईटचा प्रकाशझोत टाकून मासेमारी करीत आहेत. त्यामुळे लाईटच्या दिशेने मासळी आकर्षित होत असल्याने लहान मासळीपासून मोठी मासळी पर्ससीनच्या जाळय़ात मिळते. त्यामुळे किनाऱयाकडे मासळी येत नसल्याने छोटय़ा मच्छीमारांना मासळी मिळत नाही. त्यामुळे पर्ससीनवर कारवाई करावी. अन्यथा, मच्छीमारांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा ज्ञानेश्वर खवळे यांनी दिला.

दोन दिवसांत कारवाई करा – तहसीलदार

मत्स्य परवाना अधिकारी वारुंजीकर यांना तहसीलदार सौ. पाटील यांनी सांगितले, मत्स्य खात्याच्या विरोधात मच्छीमारांचा प्रचंड रोष आहे. पर्ससीनवर बंदी असताना आपण कारवाई का करीत नाही? तुमच्याकडे मनुष्यबळ नसेल तर पोलिसांची मदत घ्या. पोलिसांच्या गस्ती नौकेच्या सहाय्याने पर्ससीनवर कारवाई करा. ही कारवाई दोन दिवसांत झाली पाहिजे. अन्यथा, मच्छीमारांच्या आंदोलनाला तुम्हांला जबाबदार धरण्यात येईल, असे खडे बोल सुनावत पर्ससीनवर तात्काळ कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.

Related posts: