|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » तापमान वाढीने पोल्ट्री व्यवसाय अडचणीत

तापमान वाढीने पोल्ट्री व्यवसाय अडचणीत 

सचिन भादुले/ विटा

अंडय़ाची होणारी साठेबाजी, त्यामुळे वारंवार दरात होणारे चढउतार, वाढत्या उन्हाळ्याने होणारी मर आणि कमी होणारी उत्पादन क्षमता यामुळे पोल्ट्री व्यवसाय चांगलाच अडचणीत आला आहे. वाढत्या तापमानाने होणाऱया नुकसानीपासून वाचण्यासाठी खर्चात वाढ होत असताना दरात घट झाल्याने पोल्ट्रीचे अर्थकारण बिघडू लागले आहे. या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असताना नेक मात्र गांधारीच्या भूमिकेत असल्याचा आरोप पोल्ट्रीधारक करीत आहेत.

विटय़ात मोठय़ा प्रमाणात पसरलेल्या पोल्ट्री व्यवसायावर सध्या वाढत्या उन्हाचे संकट आहे. तापमान मोठय़ा प्रमाणावर वाढू लागल्याने पक्षांची मर होत आहे. त्याचबरोबर तापमान थंड ठेवण्यासाठी शेडच्या पत्र्याला रंग देणे, दुपारच्या सत्रात पाणी बदलणे, पाण्याचा फवारा वापरून तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न करणे, तापमान वाढीचा फटका बसू नये, यासाठी पक्षांना खाद्यातून विटॅमीन सी, खाण्याचा सोडा, इलेक्ट्रोलाईट यासारखे घटक देणे आदी उपाय पोल्ट्रीधारक राबवित आहेत.

मात्र एवढे उपाय करूनही काही प्रमाणात मर होत आहेच. पारा 40 अंशावर पोहचल्याने हे उपाय देखिल कमी पडत आहेत. शिवाय तापमान नियंत्रणात ठेवण्यासाठी मोठय़ा प्रमाणावर पाण्याचा उपयोग करावा लागत आहे. मुळातच तालुका दुष्काळी अशातच सध्या पाणी टंचाईच्या झळा तिव्र होऊ लागल्या आहेत. अशावेळी टँकरचे विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. त्यामुळे पाण्यासाठी पुन्हा जास्तीचे पैसे खर्च करावे लागत आहेत.

उत्पादन खर्च वाढला आणि अंडय़ाचा दर घटला

या सर्व संकटावर मात करून उत्पादीत अंडय़ाला भाव नाही. सध्या प्रती अंडय़ाला 2.40 ते 2.60 रूपये असा भाव सुरू आहे. मात्र प्रत्यक्षात उत्पादन खर्च 3.20 रूपयांवर पोहचला आहे. त्यामुळे उत्पादन खर्च आणि मिळणारे उत्पन्न यात मोठी तफावत आढळून येत आहे. एकटय़ा विटा शहरात दररोज सुमारे 9 लाख अंडय़ांचे उत्पादन होते. या मंदीच्या लाटेत दररोज जवळपास 5.50 लाख रूपयांचा तोटा होत आहे. सहाजिकच पोल्ट्रीचे अर्थकारण दिवसेंदिवस बिघडत चालले आहे.

साठेबाजीचे ग्रहण : नेकचे दुर्लक्ष

गेल्या काही वर्षात या व्यवसायाला साठेबाजीचे ग्रहण लागले आहे. मोठे व्यापारी दर पाडून अंडी खरेदी करतात. साठेबाजी झाल्यानंतर अचानक महिन्याभरात दर वाढतो. त्यामुळे दलाल मालामाल आणि उत्पादक तोटय़ात अशी काहीशी अवस्था आहे. यामध्ये या व्यवसायाची प्रमुख संस्था असणाऱया नेकने लक्ष देण्याची मागणी पोल्ट्री व्यवसायिक करीत आहेत. मात्र मोठय़ा पोल्ट्रीधारकांचे वर्चस्व असणारी ही संस्था सध्या गांधारीच्या भूमिकेत असल्याचा आरोप पोल्ट्रीधारक करीत आहेत.

दुष्काळाने खताची मागणी कमी झाली

अंडय़ाबरोबरच पोल्ट्रीच्या खतातून व्यावसायिकांना चांगले उत्पन्न मिळते. मात्र गेल्या सलग दोन वर्षात पावसाने ओढ दिल्याने शेती उत्पादनावर परिणाम झाला आहे. सहाजिकच पोल्ट्रीच्या खताची मागणी रोडावली आहे. त्यामुळे खताचा साठा पडून आहे. त्याचाही विपरीत परिणाम पोल्ट्रीच्या अर्थकारणावर होत असल्याचे पोल्ट्रीधारकांनी सांगितले.

‘पोल्ट्री व्यवसाय मंदीच्या तडाख्यात’

वाढत्या उन्हाळ्याने पक्षांची मर आणि घटलेले दर यामुळे पोल्ट्री व्यवसाय सध्या अडचणीत आहे. साठेबाजी आणि नेकचे दुर्लक्ष यामुळे सामान्य पोल्ट्रीधारक हतबल आहे. दुष्काळाने खताला मागणी नाही. एकीकडे उत्पादन खर्च वाढत असताना, अंडय़ाचा दर कमी होत असल्याने हा व्यवसाय सध्या मंदीच्या तडाख्यात सापडला आहे. – प्रशांत भोसले, (18विटा03) साधना पोल्ट्री फार्म, घानवड.

 

विटय़ाच्या अर्थवाहिन्यांना साठेबाजीचे ग्रहण

शेतीपुरक व्यवसाय असणाऱया पोल्ट्री व्यवसायाचे महत्त्वाचे केंद्र म्हणून विटय़ाचा नावलौकीक आहे. यंत्रमागाची धडधड आणि पोल्ट्रीतील किलबीलाट ही विटय़ाची ओळख आहे. मात्र गेल्या काही वर्षात विटय़ाची अर्थवाहिनी असणारे हे दोन्ही उद्योग मंदीच्या तडाख्यात सापडले आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही व्यवसायाला साठेबाजी आणि दलालीचा फटका बसत असल्याचे समोर येत आहे.