|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » दुसऱया टप्प्यातील खातेवाटप जाहीर

दुसऱया टप्प्यातील खातेवाटप जाहीर 

प्रतिनिधी/ पणजी

माविन गुदिन्हो हे आता पंचायतमंत्री तर विश्वजित राणे आरोग्यमंत्री बनले असून मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दुसऱया टप्प्यातील प्रत्येकी एकेका खात्याचे वाटप मंगळवारी सायंकाळी केले. मात्र गेल्या आठवडय़ात मंत्रीपदाची शपथ घेतलेल्या माविन व विश्वजित यांना केवळ एकेक खाते देण्यात आले, तर इतरांना आणखी एकेक खाते देण्यात आले आहे.

मंगळवारी नव्याने वाटप केल्यानंतर मंत्रिमंडळात द्वितीय स्थानी असलेल्या सुदिन ढवळीकर यांच्याकडे वाहतूक, विजय सरदेसाई यांना कृषी, फ्रान्सिस डिसोझा यांच्याकडे कायदा तसेच विधिमंडळ कामकाज, मनोहर उर्फ बाबु आजगावकर यांच्याकडे क्रीडा तर रोहन खंवटे यांना माहिती व तंत्रज्ञान हे महत्वाचे खाते सोपविण्यात आले आहे.

पांडुरंग मडकईकर हे आता समाजकल्याण मंत्री बनले आहेत. गोविंद गावडे यांच्याकडे आदिवासी कल्याण, विनोद पालयेकर यांच्याकडे मत्स्योद्योग, जयेश साळगावकर यांच्याकडे ग्रामिण विकास यंत्रणा ही खाती सोपविली आहेत.

माविन, विश्वजितची ज्येष्ठताही गेली

नव्याने मंत्रिमंडळाची जी रचना झाली त्यात सर्वांत शेवटी आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांचे नाव घेण्यात आले आहे. यापूर्वी 2007 ते 2011 पर्यंत आरोग्यमंत्री असलेल्या राणे यांचा सध्याच्या मंत्रिमंडळात 12वा क्रमांक ठरला आहे. त्यातल्या त्यात माविन गुदिन्हो हे या मंत्रिमंडळात सर्वात ज्येष्ठ आहेत. मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्यापेक्षाही ते ज्येष्ठ आहेत. माविन गुदिन्हो हे 1989 पासून आमदार आहेत. मात्र त्यांना आता 11 व्या स्थानी बसविण्यात आलेले आहे. नव्याने आमदार व मंत्री झालेले सर्व मंडळी सुरवातीच्या रांगेत आहेत. मात्र भाजपमध्ये आलेल्या या दोन्ही नेत्यांची क्रमवारीत झालेली घसरण फारच लागणारी आहे.