|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » स्विकृत सदस्य निवडीवरून भाजप, सेनेत बंडखोरी

स्विकृत सदस्य निवडीवरून भाजप, सेनेत बंडखोरी 

सोलापूर / प्रतिनिधी

महापालिकेच्या स्विकृत सदस्यांची निवड करण्याच्या विषयावरून भाजपाच्या दोन्ही देशमुख मंत्री व्दयातील आणि शिवसेनेतील अतंर्गत संघर्ष पून्हा एखदा चव्हाटय़ावर आला आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षासह एमआयएमला बंडखोरीचे ग्रहन लागले आहे. तर काँग्रेसने बंडखोरीला स्थान न देता यु. एन. बेरिया यांचा एकमेव अर्ज दाखल केला आहे. पाच स्विकृत सदस्य निवडीसाठी तब्बल 16 अर्ज दाखल झाले आहेत.

नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणूकीत भाजपाने काँग्रेसची तब्बल 43 वर्षाची सत्ता उलथून लावत परिवर्तन घडविले आहे. निवडणूकीतही भाजप आणि सेनेतील पदाधिकाऱयांचा अंतर्गत संघर्ष चव्हाटय़ावर आला होता. उमेदवारी देताना दोन्ही देशमुख मंत्रीव्दयामध्ये जोरदार अतंर्गत संघर्ष पहावयास मिळाला होता. तर सेनेमध्ये नगरसेवक महेश कोठे यांच्यावर जून्या पदाधिकाऱयांना विश्वासात घेतले नसल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. हा अंतर्गत संघर्ष या दोन्ही पक्षातील नेतृत्वामध्ये निवडणूकीनंतरही सुरूच असल्याची बाब स्विकृत सदस्य निवडीच्या विषयावरून पुन्हा एखदा समोर आली आहे.

पाच स्विकृत सदस्यांची निवड करण्यात येणार आहे. सभागृहातील पक्षीय बलाबलाप्रमाणे भाजपाला दोन तर काँग्रेस, शिवसेना आणि एमआयएम या पक्षाना प्रत्येकी एक सदस्य पद वाटय़ाला आले आहे. यासाठी बुधवारी दुपारी दिड वाजेपर्यत यासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. याकाळात भाजपाच्या वाटय़ाला दोन सदस्य आले असताना तब्बल आठ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये दत्तात्रय गणपा, प्रभाकर जामगुंडे, विक्रांत वानकर, अविनाश महागावकर, जयवंत थोरात, शोभा शिंदे, विजय कालानी आणि शिवशंकर घुगे यांचा समावेश आहे. तर शिवसेनेच्या वाटय़ाला एक पद आले असताना या पक्षाकडून पाच अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये शिवसेनेचे जिल्हा समन्वयक पुरूषोत्तम बरडे, जिल्हा अध्यक्ष लक्ष्मीकांत ठोगें-पाटील, ज्योती चव्हाण, हरिदास चौगुले आणि शशिकांत केंची यांचा समावेश आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षाला बंडखोरीचे ग्रहन लागले आहे. तर काँग्रेसकडून यु. एन. बेरिया यांचा एकमेव अर्ज दाखल झाला आहे. तर एका जागेसाठी एमआयएम पक्षाकडून गाजी इस्माईल सादिक जहागीरदार आणि रूकियाबानू महेंबूब बिराजदार यांनी अर्ज दाखल केले आहेत.

भाजपाकडून दोन सदस्यांची नांवे निश्चित झाली नाहीत. या निवडीवरून देशमुख मंत्री व्दयातील अंतर्गत संघर्ष पून्हा चव्हाटय़ावर आला. भाजपाचे सभागृहनेते सुरेश पाटील यांच्या कार्यालयात दुपारपर्यत बैठक सुरू होती. या बैठकीला महापौर शोभा बनशेट्टी, पक्षाच्या नगरसेवकांच्यासह शहराध्यक्ष अशोक निबंर्गी, जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, स्थायी समिती सभापती संजय कोळी, परिवहन सभापती दैदिप्य वडापूरकर आदीसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. पण, दोन सदस्यांच्यावर एकमत होत नव्हते. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या गटाकडून अशोक निबंर्गी आणि अविनाश महागावकर यांचे तर पालकमंत्री विजयकुमार देशमुख गटाकडून विक्रांत वानकर यांचे नांव आघाडीवर होते. पण, अशोक निबंर्गी यांच्या नांवावर दोन्ही गटाकडून एकमत होत नसल्याने नांवे निश्चित होण्यास विलंब होत गेला. दरम्यानच्या काळात पक्षाकडून आठ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले.

सेनेकडून शशिकांत केंची यांना निश्चित करण्यात आले. त्यांनी आपला उमेदवारी अर्जही सेनेच्या नगरसेवकांच्या समवेत दाखल केला. पण, त्यानंतर सेनेचे जिल्हा समन्वयक पुरोषत्तोम बरडे, जिल्हा प्रमुख लक्ष्मीकांत ठोगे-पाटील, हरिदास चौगुले आणि ज्योती शिंदे यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. बरडे आणि ठेंगे-पाटील यांनी मात्र आपले अर्ज आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून भरले.

स्विकृत सदस्य निवडीसाठी जिल्हा काँग्रेस कार्यालयात पदाधिकाऱयांची बैठक झाली. माजी केंद्रीय गृहमंत्री आणि काँग्रेसचे नेते सुशिलकुमार शिंदे यांनी यु. एन. बेरिया यांचे नांव सुचित केले. त्यानंतर बेरिया यांनी काँग्रेसचे नगरसेवक आणि पदाधिकाऱयांच्यासमवेत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

एमआयएम पक्षाकडून गाजी इस्माईल सादिक जाहागीरदार यांचे नांव निश्चित करण्यात आले आहे. पण, या पक्षाकडून रूकियाबानू बिराजदार यांनीही आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

गुरूवारी महापालिकेची सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. यामध्ये पाच स्विकृत सदस्य निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. पण, त्यापूर्वी भाजपा, शिवसेना आणि एमआयएम पक्षाला झालेली बंडखोरी शमविण्यासाठी प्रयत्नाची पराकष्ठा करावी लागणार आहे.

Related posts: