|Thursday, July 27, 2017
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » जप्त रक्तचंदन साठा घालणार तिजोरीत शेकडो कोटींची भर!जप्त रक्तचंदन साठा घालणार तिजोरीत शेकडो कोटींची भर! 

राज्यभरात हजार टनांहून अधिक जप्त साठा, आंतरराष्ट्रीय लिलावासाठी केंद्राकडे मागितली परवानगी

राजेंद्र शिंदे / चिपळूण

जानेवारी महिन्यात चिपळुणात जप्त करण्यात आलेला रक्तचंदनाचा साठा आणि याप्रकरणी राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात उपस्थित झालेल्या तारांकीत प्रश्नानंतर संपूर्ण राज्यातील जप्त रक्मतचंदन साठय़ाची माहिती वनमंत्रालयाने गोळा करण्यास सुरूवात केली आहे. अलिबाग, कोल्हापूर, सातारा, चिपळूणसह अन्यत्र रक्तचंदनाचा सुमारे 1 हजार टनाहून अधिकचा साठा जप्त करण्यात आला आहे. या रक्तचंदनाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर लिलावासाठी केंद्राची परवानगी मिळाल्यास राज्याच्या तिजोरीत शेकडो कोटींची भर पडेल हे लक्षात घेऊन त्यादृष्टीने अर्थमंत्रालयाने हालचाली सुरू केल्या आहेत. दरम्यान, चिपळुणातील रक्तचंदन तस्करीप्रकरणी केंद्राच्या ‘डीआरआय’ची मदत घेतली जात आहे.

जानेवारीमध्ये चिपळूण शहरातील गोवळकोट रोड परिसरात चार ठिकाणी धाडी टाकून रक्तचंदन जप्त करण्यात आले आहे. यामध्ये एकूण 9.796 घनमीटरच्या तब्बल 412 रक्तचंदनाच्या ओंडक्यांचा समावेश आहे. 14 टन वजन असलेल्या या चंदनाची किंमत बाजारभावाप्रमाणे 1 कोटी 71 लाख 76 हजार असली तरी परदेशातील चलनानुसार त्याची किंमत कित्येक पट अधिक असल्याचे सांगितले जाते. राज्यात आतापर्यंत जप्त करण्यात आलेल्या रक्तचंदनाच्या साठय़ांमध्ये चिपळुणातील कारवाई ही सर्वात मोठी आहे.

मुळातच रक्तचंदन हे महाराष्ट्रात मिळत नाही. तामिळनाडू, आंध्रप्रदेश व कर्नाटकमधून त्याची तस्करी होते. या रक्तचंदनाला चीनसह अरब राष्ट्रात मोठी मागणी आहे. दक्षिण भारतातून रक्तचंदन आणून ते पुढे समुद्रमार्गे परदेशात पाठवले जाते. जेएनपीटी बंदरात कंटेनरमधून वाहतूक करताना काही दिवसांपूर्वी रक्तचंदन जप्त करण्यात आले होते. त्याचबरोबर कोल्हापूर, नागपूर, सातारासह ठाणे, अलिबागबरोबरच राज्यात अन्यत्र गेल्या पाच-सहा वर्षांपासून जप्त करण्यात आलेला रक्तचंदनाचा साठा तसाच पडून आहे. चिपळुणातील तस्करीप्रकरणी तारांकीत प्रश्न अधिवेशनात उपस्थित झाल्यानंतर राज्यातील ठिकठिकाणी जप्त करण्यात आलेल्या साठय़ाची माहिती गोळा करण्यात आली. यामध्ये हजार टनाहून अधिक साठा असल्याचे पुढे आले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत लक्षात घेऊन त्याचा लिलाव केल्यास राज्याच्या तिजोरीत मोठी भर पडणार आहे.

पाच वर्षांपूर्वी अवघ्या 80 टनाच्या जप्त रक्तचंदनाचा लिलाव करण्यास परवानगी मिळाली होती. मात्र त्यानंतर ती मिळालेली नाही. दरम्यान, चिपळुणातील तस्करीमुळे फोकस झालेल्या याप्रकरणी आता अन्य साठय़ाची एकत्रित माहिती गोळा करून त्यादृष्टीने त्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर लिलाव करण्यासाठी केंद्राची आवश्यक असलेली परवानगी मिळवण्याचे प्रयत्न वन मंत्रालयाने सुरू केले आहेत.

चिपळुणातील तस्करीप्रकरणी ‘डीआरआय’ची मदत

चिपळुणातील रक्तचंदन प्रकरणी जप्त करण्यात आलेल साठा हा आता अन्यत्र हलवण्यात आला आहे. या प्रकरणाचा सूत्रधार असलेल्या इसा हळदे याचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळल्यानंतरही तो फरार आहे. वन विभागाला हळदे न सापडल्याने तस्करी प्रकरणी पुढील तपासाला वेग आलेला नाही. त्यामुळे याप्रकरणी वनविभागाने आता केंद्राच्या डीआरआय (डायरेक्टरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स)ची मदत घेतली जात आहे.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!