|Wednesday, June 21, 2017
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » दापोलीचे उद्यानविद्या महाविद्यालय हलवणार सिंधुदूर्गातदापोलीचे उद्यानविद्या महाविद्यालय हलवणार सिंधुदूर्गात 

राजगोपाल मयेकर/ दापोली

दापोलीच्या डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठातील 33 वर्षे जुने उद्यानविद्या महाविद्यालय यंदापासून बंद होणार आहे. हे महाविद्यालक सिंधूदूर्ग जिह्यातील मुळदे येथे हलवण्याचा निर्णय विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेने घेतला आहे. विशेष म्हणजे फलोद्यान जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱया रत्नागिरी जिह्यातील हे एकमेव उद्यानविद्या महाविद्यालय आहे. जिह्यातील आमदार संजय कदम, आमदार राजन साळवी यांच्यासारखे लोकप्रतिनिधी या कार्यकारी परिषदेचे सदस्य असतानाही उद्यानविद्या महाविद्यालया जिल्हावासीयांना मुकावे लागणार असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

मुळात डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाची ऍक्रेडीशन अर्थात अधिस्वीकृती भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने (आयसीएआर) एक वर्षापूर्वी रद्द केली होती. त्यामुळे विद्यापीठाला आयसीएआरकडून मिळणारा निधी बंद झाल्याने विद्यापीठावर मोठा आर्थिक ताण पडला. यावर्षी विद्यापीठाची अधिस्वीकृती पुन्हा कायम करताना येथील उद्यानविद्या महाविद्यालय दोन वर्षांत मुळदे येथे हलवावे, अशी अट आयसीएआरने ठेवली. या महाविद्यालयाकडे स्वतंत्र पायाभूत सुविधा नसल्याने शिक्षणाच्या दर्जावर परिणाम होत असल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले. साहजिकच

विद्यापीठ प्रशासनाने महाविद्यालयाच्या स्वतंत्र वास्तूसाठी प्रयत्न करण्याऐवजी आयसीएआरच्या सूचनेवर तातडीने कार्यवाही करण्याचा निर्णय घेतला.

या प्रस्तावाला उद्यानविद्या विभागाच्या बोर्ड ऑफ स्टडीजमध्ये विरोध होऊन तसा ठरावही करण्यात आला. जिह्यातील एकमेव उद्यानविद्या महाविद्यालय दापोलीतच कायम ठेवण्याच्या या ठरावावर विद्यापीठाच्या शिक्षण परिषदेतही चर्चा झाली. चर्चेच्यावेळी महाविद्यालय याच ठिकाणी ठेवण्याबाबत अनुकूलता दाखवण्यात आली असतानाही ठराव नोंदवताना हे महाविद्यालय कायमचे स्थलांतरीत करण्याचा निर्णय घेण्यात आला.

यानंतर कार्यकारी परिषदेच्या गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत स्थलांतराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. विशेष म्हणजे रत्नागिरी जिह्यातील दोन आमदार या परिषदेचे सदस्य असतानाही या निर्णयाला कोणताही विरोध झाला नाही. त्यामुळे पुढील वर्षाच्या शैक्षणिक वर्षापासून येथील उद्यानविद्या महाविद्यालय कायमचे बंद होणार आहे.

पायाभूत सुविधांकडे दुर्लक्ष

दरम्यान, 1970 च्या दशकात दापोलीत कृषी महाविद्यालय सुरू झाले. 1984 मध्ये उद्यानविद्या पदवी अभ्यासक्रमाची गरज लक्षात घेऊन याच वास्तूत उद्यानविद्या महाविद्यालयही समाविष्ट करण्यात आले आहे. या निर्णयाची तातडीने अंमलाबजावणी करण्याच्या प्रयत्नात नव्या महाविद्यालयाची स्वतंत्र वास्तू आणि पायाभूत सुविधा उभारण्याकडे विद्यापीठ प्रशासनाने दुर्लक्ष केले. सध्या येथे 30 विद्यार्थी क्षमता असलेले वर्ग सुरू असून त्यासाठी स्वतंत्र आठ प्राध्यापक नेमण्यात आले आहेत. गेली 33 वर्षे निर्विघ्नपणे सुरू असलेल्या या उद्यानविद्या महाविद्यालयाची कार्यपद्धत आणि शैक्षणिक दर्जाबाबत आयसीएआरने गेल्या वर्षी ताशेरे ओढले आणि विद्यापीठाची अधिस्वीकृती रद्द केली होती. त्यामुळे विद्यापीठ अडचणीत सापडले होते.

चार वर्षांपूर्वी कृषी विद्यापीठाने सिंधुदूर्ग जिह्यातील मुळदे येथे स्वतंत्र उद्यानविद्या महाविद्यालय सुरू केले आहे. दापोलीचे उद्यानविद्या महाविद्यालय दोन वर्षांत मुळदे येथील महाविद्यालयातच स्थलांतरीत करावे, अशी सूचना आता आयसीएआरने केली आहे. त्या शर्तीवरच त्यांनी विद्यापीठाची अधिस्वीकृती कायम केली आहे. मात्र या निर्णयाने रत्नागिरी जिह्यातील विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार असून उद्यानविद्या अभ्यासक्रमासाठी आता सिंधुदुर्गकडे धाव घ्यावी लागणार आहे.

Related posts: