|Thursday, June 27, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » उपजिल्हाधिकाऱयांची म्हापसा नागरिकांशी चर्चा

उपजिल्हाधिकाऱयांची म्हापसा नागरिकांशी चर्चा 

प्रतिनिधी/ म्हापसा

म्हापशात भेडसावणाऱया समस्यांवर चर्चा करण्यासाठी बार्देश उपजिल्हाधिकारी चंदकांत शेटकर यांना नागरिकांबरोबर चर्चा झाली. यावेळी मामलेदार दशरथ गावस, आरोग्यअधिकारी, ट्राफिक पोलीस, आदी मान्यवर उपस्थित होते. या समस्यांवर त्या त्या अधिकाऱयांशी चर्चा करण्यासाठी लवकरच बैठक घेऊन अंतिम निर्णय घेण्यात यईल, असे उपजिल्हाधिकाऱयांनी सांगितले.

 म्हापसा पिपल्स युनियने या समस्या उपजिल्हाधिकाऱयांच्या समोर मांडून बैठक बोलावण्याची मागणी केली होती. बैठकीत वरील अधिकाऱयांसोबत ऍड. महेश राणे, विजय भिके, दिलीप नाटेकर, कमल डिसौझा, किशोर कोलगे, अकबर शेख, सुदिन नाईक, विनय चोडणकर, सुदेश तिवरेकर, एकनाथ म्हापसेकर, जे. शेटये, पोलीस उपनिरिक्षक ए. मांद्रेकर, शिपाई गोसावी आदी मान्यवर उपस्थित होते.

म्हापशात तरूण भरवेगात गाडय़ा चालवतात. त्यांच्यावर कारवाई होणे गरजेचे आहे, असे एकनाथ म्हापसेकर यांनी निदर्शनास आणले. विजय भिके म्हणाले की, म्हापसा रेमेन्सो हॉस्पिटल, गावसवाडा भागात उघडयावर कचरा टाकला जातो. त्याकडे पालिकेचे लक्ष नाही. या भागात कचराकुंडया ठेवाव्यात अशी मागणी त्यांनी केली. रस्त्यावर भलेमोठे चर पडलेले असून ते योग्यरित्या बुझविले नसल्याने अपघात होत आहेत. याकडेही लक्ष देण्याची मागणी सुदिन नाईक यांनी केली.

  म्हापशात अपघाताचे प्रमाण वाढलेले आहे. अपघात टाळण्यासाठी रस्त्यावर झेब्रा  क्रॉसिंग पेटींग करावे. अनेक ठिकाणी वीज खांब्यावर वीज बल्प आढळत नाही. तेथे वीजबत्तीची सोय करावी अशी मागणी यावेळी विनय चोडणकर यांनी केली.

कुचेली खोर्ली म्हापसा भागात अनेक ठिकाणी डासांची पैदास होते. याकडे आरोग्यखात्याने लक्ष द्यावे अशी मागणी ऍड. महेश राणे यांनी केली. तसेच  म्हापशात फायर हायड्रन्ट नाही, एखादी आगीची दुर्घटना घडल्यास नेमके त्याचवेळी पाणी नसते. याबाबत येथे लक्ष देणे गरजेचे आहे असेही राणे यांनी निदर्शनास आणले.

उपजिल्हाधिकारी श्री. शेटकर यांनी सर्व मुद्यांची नोंद घेऊन संबंधित खात्यांना अहवाल पाठवण्यात येईल, अशी माहिती दिली.

नगरसेवक स्वप्निल शिरोडकर अपात्रतेचा निर्णय छाननी समितीचा : शेटकर

   नगरसेवक स्वप्निल शिरोडकर यांनी दोन ठिकाणी अर्ज दाखल करून पालिका निवडणुक लढविली. अशी तक्रार म्हापसा पिपल्स फोरसतर्फे दाखल करण्यात आली असता उपजिल्हाधिकारी शेटकर म्हणाले की, याचा अधिकार छाननी समितीकडे आहे. म्हापसा पिपल्स युनियन आपल्यावर तसेच छाननी समितीवर व पोलिसांवर अविश्वास दाखवतात. यापुढे शिरोडकरांचा विषय छाननी समिती हाताळणार असल्याचे उपजिल्हाधिकाऱयांनी स्पष्ट केले.

  यावेळी ट्राफिक उपनिरिक्षक आर. एस. मंगेशकर, पालिका अभियंता व्यंकटेश सावंत. एटीओ शिवराम वझे, श्यामसुंदर कारेकर, आरोग्य अधिकारी डॉ. ए. एम. पोलेकर, सुदेश तिवरेकर बैठकीला उपस्थित होते.