|Saturday, August 24, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » हल्ल्याचा कट उधळला, तीन दहशतवादी जेरबंद

हल्ल्याचा कट उधळला, तीन दहशतवादी जेरबंद 

वृत्तसंस्था /नोएडा :

उत्तर प्रदेशमधील दहशतवाद प्रतिबंधक पथक (एटीएस) आणि पाच राज्यांच्या पोलिसांनी संयुक्तपणे कारवाई करत तीन संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री उशीरा ही कारवाई झाली. मुंबई, जालंधर आणि बिजनौरमध्ये अटक केलेल्या संशयितांनी दहशतवादी हल्ल्याचा कट रचल्याचे तपासात स्पष्ट झाल्याचे एटीएसचे पोलीस महानिरीक्षक असीम अरूण यांनी सांगितले. दरम्यान, अटक केलेले संशयित इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेच्या संपर्कात असावेत, असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
  उत्तर प्रदेशसह पाच राज्यांमध्ये दहशवादी सक्रीय असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली होती. यानुसार बुधवारी रात्री उत्तर प्रदेश एटीएस पथकाने दिल्ली, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश एटीएस पथक, पंजाब, बिहार पोलिसांसमवेत मुंबई, जालंधर आणि बिजनौरमध्ये कारवाई करत तिघांना अटक केली.  बिजनौर येथे अटक केलेल्या तिघांकडे देशातील विविध भागाचे नकाशे, कटामध्ये सहभागी असणाऱया लोकांची नावे असणारी डायरी जप्त करण्यात आली आहे. संशयित दहशतवाद्यांची नोएडा येथे चौकशी सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले. या कारवाईमुळे मोठा दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला गेला असल्याचे स्पष्ट करत  सर्व संशयित इस्लामिक स्टेट (आयएस) या दहशतवादी संघटनेची संबंधित असल्याचा संशय पोलीस सूत्रांनी व्यक्त केला आहे.  7 मार्च 2017 रोजी मध्य प्रदेशमधील शाजापूरमध्ये भोपाल-पैसेंजर ट्रेनमध्ये स्फोट झाला होता. यामध्ये दहा जण जखमी झाले होते. या स्फोटानंतर चौघा संशयितांना अटक करण्यात आली होती. यानंतर उत्तर प्रदेश एटीएसने कानपूरमधून दोन तर इटावामध्ये एका संशयिताला अटक केली होती. या तिघांनी दिलेल्या माहितीच्या लखनौमधील ठाकूरगंज परिसरातून दहशतवादी सैफुल्लाह असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. तब्बल 11 तासांच्या चकमकीनंतर त्याचा खात्मा करण्यात उत्तर प्रदेश पोलिसांना यश आले होते. या कारवाईनंतर आयएसचे जाळे पाच राज्यांमध्ये पसरल्याचे स्पष्ट झाले होते.

 आणखी सहा जणांना घेतले ताब्यात  

तीन संशयित दहशतवाद्यांना अटक केल्यानंतर उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, पंजाब, आंध्र प्रदेश आणि बिहारमध्ये विविध छापे टाकण्यात आले. या कारवाईत सहा जणांना ताब्यात घेतले असून त्याच्याकडे चौकशी सुरू आहे. दहशतवादी कोणत्या शहरात हल्ला करणार होते. त्यांच्या साथीदारांच्या माहितीसह मिळणारी आर्थिक रसद या सर्व बाबींचा तपास सुरू असल्याचे उत्तर प्रदेश एटीएसच्या अधिकाऱयांनी सांगितले.