|Monday, July 31, 2017
You are here: Home » क्रिडा » अनिर्णीत सामन्याने युवेंटस उपांत्य फेरीतअनिर्णीत सामन्याने युवेंटस उपांत्य फेरीत 

वृत्तसंस्था /बार्सिलोना :

येथील नोऊ कॅम्पवर झालेल्या उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱया टप्प्यातील सामन्यात युवेंटसने बार्सिलोनाला गोलशून्य बरोबरीत रोखत चॅम्पियन्स लीग स्पर्धेच्या उपांत्य फेरीत स्थान मिळविले. पहिल्या टप्प्यात युवेंटसने बार्सिलोनावर 3-0 असा विजय मिळवित आघाडी घेतली होती. तीच शेवटी निर्णायक ठरली आणि बार्सिलोनाचे या स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले.

उपांत्यपूर्व फेरीत बार्सिलोनाने पहिल्या टप्प्यातील 0-4 गोलांची पिछाडी दुसऱया टप्प्यातील सामन्यात पॅरिस सेंट जर्मेनवर 6-1 असा नाटय़मय विजय मिळवित उपांत्यपूर्व फेरी गाठण्याचा चमत्कार केला होता. पण त्याची पुनरावृत्ती बार्सिलोनाला युवेंटसविरुद्ध करता आली नाही. सर्वोत्तम बचावाचे रेकॉर्ड असलेल्या युवेंटसने आपली क्षमता या सामन्यात पुन्हा एकदा सिद्ध करून दाखविली. लायोनेल मेस्सी, लुईस सुआरेज, नेमार यांना अजिबात संधी मिळू न देता त्यांनी 2015 चॅम्पियन्स लीग अंतिम लढतीतील पराभवाचा वचपा काढला. ‘दोन्ही टप्प्यातील बार्सिलोनाला एकही गोल करू दिला नाही, यावरूनच संघाचा डावपेचातील दर्जा बरेच काही सांगून जातो,’ असे युवेंटसचे बॉस मॅसिमिलियानो ऍलेग्री म्हणाले.

युवेंटसप्रमाणेच रियल माद्रिद, ऍटलेटिको माद्रिद व मोनॅको यांनीही उपांत्य फेरी गाठली असून शुक्रवारी त्याचा ड्रॉ काढण्यात येणार आहे. ‘आम्ही गोल करण्यासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न केले. पण आम्हाला यश मिळाले नाही. तुरिनमध्ये झालेल्या पहिल्या टप्प्यात आम्ही खूप निराशाजनक प्रदर्शन केले, त्याचाच आम्हाला फटका बसला,’ असे बार्सिलोनाचे प्रशिक्षक लुईस एन्रिक म्हणाले. चॅम्पियन्स लीगमधील या मोसमातील दहा सामन्यांत आठव्यांदा युवेंटसने प्रतिस्पर्ध्याला गोल करू दिला नाही. त्यांच्या समी खेदिराला पिवळे कार्ड मिळाले असल्याने उपांत्य फेरीच्या पहिल्या टप्प्यातील सामन्यात तो खेळू शकणार नाही.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!