|Thursday, July 27, 2017
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » ‘देवगड हापूस’चा आता स्वतंत्र ब्रँड‘देवगड हापूस’चा आता स्वतंत्र ब्रँड 

देवगड : देवगड हापूस आंबा आता खवय्यांना खात्रीशीररित्या उपलब्ध होणार आहे. देवगड हापूसला स्वतःची ओळख प्राप्त करून देणारे ‘जीआय’ मानांकन मिळाले आहे. त्यामुळे आता देवगड हापूसच्या नावावर अन्य कोणताही आंबा विक्री होऊ शकणार नाही. गेल्या पाच वर्षाच्या प्रयत्नानंतर देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेने केलेल्या जीआय मानांकनाला अखेर हिरवा कंदील मिळाला आहे. जीआय मानांकनासाठी गुरुवारी मुंबई येथे सुनावणीमध्ये देवगड हापूसला मान्यता देण्यात आली.

हापूस आंब्याला जीआय मानांकनासाठी तीन अर्ज केंद्र सरकारच्या कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट या राष्ट्रीय संस्थेकडे आले होते. त्यामध्ये ‘रत्नागिरी हापूस’, दापोली कृषी विद्यापीठामार्फत ‘हापूस’ व देवगड तालुका आंबा उत्पादक संघाच्यावतीने ‘देवगड हापूस’ असे तीन अर्ज होते. दापोली कोकण कृषी विद्यापीठामार्फत ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या भागातील आंब्याला ‘हापूस’ हे मानांकन देण्याबाबत अर्ज केला होता. मात्र, मुंबई येथे झालेल्या सुनावणीवेळी अर्जामध्ये निश्चित नाव आंब्याला न दिल्यामुळे रत्नागिरी जिल्हय़ातील अन्य एका संस्थेने ‘रत्नागिरी हापूस’ म्हणून दाखल केलेल्या अर्जाला कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट या संस्थेने मान्यता दिली. सुनावणीच्या वेळेस कृषी विद्यापीठामार्फत शास्त्रज्ञ डॉ. साळवी यांनी देवगड हापूस आंब्याला ‘देवगड हापूस’ म्हणून जीआय मानांकन न मिळण्यासाठी अनेक अडथळे निर्माण करण्याचा प्रयत्न केला. चुकीची माहिती सादर करून जीआय मानांकनासाठी विलंब करत राहिले. अन्यथा, देवगड हापूसला यापूर्वीच हे मानांकन मिळाले असते.

देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष, माजी आमदार ऍड. अजित गोगटे व त्यांच्या सहकाऱयांनी देवगड हापूसला जीआय मानांकन मिळविण्यासाठी सात वर्षे प्रयत्न सुरू ठेवले. देवगड आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे मार्केटिंग सल्लागार ओंकार सप्रे यांनी हे मानांकन मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न केले.

                          फसवणुकीला बसणार आळा

देवगड हापूसला जीआय मानांकन मिळाल्यामुळे ग्राहकांना आता यापुढे खात्रीशीर देवगड हापूस उपलब्ध होणार आहे. देवगड हापूस आंब्याच्या नावावर अन्य कुणी विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास तो गुन्हा ठरू शकतो. त्यामुळे देवगड हापूस नावाखाली कर्नाटक हापूस व अन्य हापूस आंबे विक्री केले जात होते. त्याला आता आळा बसणार आहे. जी. आय. मानांकनामुळे देवगड हापूसचा विशिष्ट ब्रॅण्ड असणार आहे. ग्राहकांनाही हा ब्रॅण्ड पाहूनच आंबा घेता येणार आहे.

आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष ऍड. अजित गोगटे म्हणाले, देवगड हापूसला जीआय मानांकन मिळविण्यासाठी गेली पाच वर्षे प्रयत्न करत होतो. आज या प्रयत्नांना यश आले. देवगड हापूसला स्वतःची ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे देवगड हापूस खऱया अर्थाने त्यांच्यापर्यंत पोहोचेल. देवगड हापूसला मानांकन मिळविण्यात अनेक अडचणी आणण्याचा प्रयत्न कोकण कृषी विद्यापीठाने केला. तरीदेखील आम्ही आमची बाजू ठामपणे मांडली व पटवून दिली. त्यामुळेच जीआय मानांकन मिळाले आहे. यापूर्वी हैद्राबाद, चेन्नई व मुंबई येथे या मानांकनासाठी सुनावणी झाली. प्रत्येक सुनावणीवेळी आम्ही देवगड हापूस संदर्भात आवश्यक ते पुरावे सादर केले. त्यामुळे मानांकन मिळण्याचा मार्ग सुकर झाला.

Related posts:

प्रपोजल शोधत आहात? मराठी मॅट्रीमोनीमध्ये रजीस्ट्रेशन मोफत आहे!