|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » खरंच जिल्हा परिषद बदलत आहे

खरंच जिल्हा परिषद बदलत आहे 

विनायक जाधव/ सांगली

जिल्हा परिषदेच्या पहिल्या सभेत अतिशय चांगली सुरवात नवीन सदस्यांच्याकडून करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेला महाराष्ट्रात नंबर वन आणण्याचा निर्धार अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख आणि उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी केला. त्याला नूतन सदस्यांनीही तितकीच चांगली साथ देत विकासाच्या मुद्य़ावर आम्ही तुमच्यासोबत असण्याची ग्वाही सर्वांनी दिली. तर प्रशासनाकडूनही धीरगंभीर होत या उपक्रमात आम्हीही हिरीरीने सहभागी होवु अशी साथ दिली. त्यामुळे खरंच जिल्हा परिषद बदलत आहे हे मान्य केले पाहिजे. या पहिल्या सभेत काँग्रेसचे गटनेते सत्यजित देशमुख यांनी ओपनिंग बँटींग अतिशय जोरदार केली.

जिल्हा परिषदेची नूतन सदस्यांची नूतन अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी पहिली सभा झाली. या सभेत अध्यक्ष संग्रामसिंह देशमुखांनी आपले आगामी पाच वर्षात कोणती टारर्गेट आहेत त्याबाबत विशेष विवेचन केले. त्या विवेचनामध्ये त्यांनी जसे खानापूर पंचायत समिती राज्यात प्रथम आली. त्याचप्रमाणे सांगली जिल्हा परिषद राज्यात प्रथम येईल या दृष्टीने आपण सर्वजण काम करू या असे आवाहन त्यांनी केले. या आवाहनाला सर्वच जिल्हा परिषद सदस्यांनी चांगली साथ दिली. विरोधक म्हणून कामकाज करणाऱया काँग्रेस आणि राष्ट्रवादीनेही त्याला साथ दिली आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्हा परिषदेतून चांगलेच कामकाज होईल अशी अपेक्षा करण्यास काहीही हरकत नाही.     पाणी प्रश्नावरून सदस्य आक्रमक….

पाणी प्रश्नावरून नूतन सदस्यांनी अभ्यासपुर्ण विवेचन केले. त्यामध्ये त्यांनी आपला आक्रमकपणा दाखविला. त्यामुळे आगामी काळात पाणीप्रश्नांवरून जिल्हा परिषद सदस्य सातत्याने अभ्यासपूर्ण मांडणी करणार हे निश्चित आहे. त्यामुळे पाणीप्रश्न आणि प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांचा पांढरा हत्ती याविषयी आगामी काळात निश्चित चांगला तोडगा निघेल अशी अपेक्षा आहे. या जिल्हय़ाला सातत्याने उन्हाच्या तीव्र झळा बसतात त्यामुळे आहे ते पाणी अतिशय चांगल्या पध्दतीने वापरणे आणि त्याचा योग्य विनियोग करण्यासाठी या योजनांचे योग्य पध्दतीने सक्षमीकरण करणे गरजेचे आहे.  आणि त्यासाठी एक स्वतंत्र अभ्यासाची कमिटी निर्माण करण्याचेही ठरले आहे. त्यामुळे पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो.

उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न

जिल्हा परिषदेला येणारे अनुदान आणि इतर योजनांचे अनुदान हे अत्यंत अल्प आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेला स्वतःचे वैयक्तिक उत्पन्न वाढविणे अतिशय गरजेचे आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेमध्ये आता बीओटीचा प्रयत्न सुरू होत आहे. याशिवाय विविध मार्गाने कर आणि इतर उत्पन्नाचे मार्ग शोधण्याचा प्रयत्न जिल्हापरिषदेकडून सुरू करण्यात आला आहे. त्यासाठीही अभ्यास कमिटीची निर्मिती करण्यात येणार आहे. त्याला प्रशासनानेही तयारी चांगली दर्शविली आहे. त्यामुळे आगामी काळात मोठयाप्रमाणात उत्पन्न वाढीसाठी प्रयत्न होणार आहेत. यासह मुख्यमंत्र्यांच्याकडून राज्यशासनाच्यामार्फत विविध योजनांतून मोठय़ाप्रमाणात निधी आणण्याचा प्रयत्न सुरू करण्यात येणार आहे.

  सदस्यांच्या अभ्यासासाठी माहिती पुस्तिका, आणि सभेपुर्वी पॉवर पाँईंट प्रेझेंन्टेशन

जिल्हापरिषदेच्या नुतन सदस्यांच्या अभ्यासासाठी आता जिल्हापरिषदेच्या कामकाज तसेच विविध योजनांची माहिती असणारी एक पुस्तिका प्रशासनाच्यावतीने तयार करण्यात येत आहे. ही पुस्तिका आगामी चार ते पाच दिवसात पुर्ण होईल त्यानंतर ती सर्व सदस्यांना वितरित करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक सभेपुर्वी एका विभागाचे पॉवर पाँईट प्रेझेंटेशनच्यामार्फत सदस्यांना त्या विभागाची संपुर्ण माहिती देण्यात येणार आहे. या निर्णयामुळे सदस्यांचा जिल्हापरिषदेच्या कामकाजात सहभाग चांगला वाढून जिल्हापरिषदेच्या कामकाजात आमुलाग्र बदल होवु शकतो आणि ही योजना अतिशय चांगली आहे.

 अध्यक्ष उपाध्यक्षांनी नेतेपणाची चुणुक दाखविली

जिल्हापरिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी अध्यक्ष म्हणून पहिल्या सभेत कामकाज करताना आपल्या नेतेपणाची आणि सर्व सभागृहाला एकत्रित घेवून कामकाज करण्याची चुणुक दाखविली तसेच विषय समितीमध्येही विरोधकांना 33 जागा देवून त्यांच्यावर सत्ताधारी अकुंश ठेवण्यात ते यशस्वी ठरले आहेत. उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी आपल्या नाविन्यपुर्ण योजना सांगत याठिकाणी अतिशय चांगल्या पध्दतीने कामकाज करण्यासाठी अध्यक्षांना आपली कशी साथ असेल त्याचीही झलक त्यांनी दाखविली त्यामुळे अध्यक्ष आणि उपाध्यक्षांनी पहिल्याच सभेत आपली चुणुक दाखविली आहे.

 सत्यजित देशमुखांची ओपनिंग बँटींग जोरदार

काँग्रेसचे गटनेते सत्यजित देशमुख यांनी जिल्हापरिषदेच्या पहिल्या सभेत आपल्या अभ्यासपुर्ण विवेचनाने जोरदार ओपनिंग बँटींग केली आहे. त्यांनी विरोधक म्हणून काम न करता या जिल्हापरिषदेचे हित आणि जिल्हय़ाचे हित या दृष्टीने सर्व विषयाची मांडणी केली त्यामुळे त्यांनी या पहिल्या सभेत खरोखरच आपली छाप पाडली.