|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू

विवाहितेचा विहिरीत बुडून मृत्यू 

वार्ताहर / तवंदी

विहिरीजवळ कपडे धुण्यासाठी गेलेल्या विवाहितेचा पाण्यात तोल गेल्याने बुडून मृत्यू झाला. ही घटना अमलझरी (ता. चिकोडी) येथे 21 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. आक्काताई ओमा उर्फ पप्पू पुजारी (वय 27) असे मृत विवाहितेचे नाव आहे.

याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, आक्काताई सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गावातील विहिरीवर गेली होती. त्यावेळी त्यांचा तोल पाण्यात गेला. आक्काताईला पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून तिचा मृत्यू झाला. दुपारी 12 च्या सुमारास गावातील एक मुलगी विहिरीवर कपडे धुण्यासाठी गेली असता तिला विहिरीच्या बाजूला कपडे दिसले व विहिरीच्या कडेला घागर दिसली. त्यावेळी त्या मुलीने तत्काळ सदर प्रकार गावातील नागरिकांना सांगितला.

सदर प्रकार पाहून नागरिकांनी मुलीच्या सांगण्यावरुन विहिरीजवळची परिस्थिती पाहिली. तसेच परिसरात महिलेचा शोध घेतला. त्यावेळी सदर विवाहितेचा पाय घसरुन पाण्यात पडल्याने मृत्यू झाला असावा असा अंदाज बांधण्यात आला. घटनास्थळी ग्रा. पं. अध्यक्षा कल्पना तळसकर, ग्रा. पं. सदस्य सिद्राम पुजारी, सोमराई यमगर, सिद्धाप्पा गौंडन्नावर, सत्तू गावडे इत्यादींनी विहिरीकडे जाऊन शोधाशोध सुरू केली. ही माहिती त्वरित निपाणी शहर पोलिसांना दिली. नंतर दुपारी 2 वाजता आक्काताईचा मृतदेह  विहिरीतून बाहेर काढण्यात आला.

यावेळी निपाणी शहर पोलीस ठाण्याचे एएसआय एस. एस. खानापूरे व त्यांच्या सहकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह महात्मा गांधी हॉस्पीटल येथे पाठविण्यात आला. ही घटना समजल्यानंतर ग्रामस्थांनी विहिरीनजीक मोठी गर्दी केली होती. सदर महिला ही बाहेर गावी बकरी राखण करायला जात होती. सध्या ती विशाळी यात्रेसाठी गावी आली होती. तिच्या पश्चात सासू, सासरे, पती, दोन मुले असा परिवार आहे.

सदर घटनेची नोंद निपाणी शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सदर घटनेने परिसरातून हळहळ व्यक्त होत होती.

Related posts: