|Thursday, May 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » नाल्याच्या पात्रातील 77 झोपडय़ा हटविल्या

नाल्याच्या पात्रातील 77 झोपडय़ा हटविल्या 

गोवंडीतील रफी नगर नाल्याच्या पात्रात झोपडय़ांची अतिक्रमणे उद्भवल्याने सदर ठिकाणी नाल्याच्या रूंदीकरणाचे काम गेली 8 वर्षे प्रलंबित होते. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या 77 झोपडय़ा महापालिकेने शुक्रवारी धडक कारवाईदरम्यान तोडल्याने आता नाल्याच्या रूंदीकरणास वेग येणार आहे, अशी माहिती एम पूर्व विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिली. त्याचबरोबर जोगेश्वरी पश्चिम परिसरात इमारतींच्या जागेत करण्यात आलेली अनधिकृत बांधकामेही कारवाईदरम्यान तोडण्यात आली आहेत, अशी माहिती के पश्चिम विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी दिली.

गोवंडीतील शिवाजीनगरमध्ये दुर्गा सेवा संघाजवळील भागात रफी नगर नाला आहे. या नाल्याच्या पात्रात दोन्ही बाजूला अतिक्रमण स्वरुपातील 77 झोपडय़ा उभ्या राहिल्या होत्या. या झोपडय़ांमुळे या परिसरातील नाल्याच्या रुंदीकरणाचे काम गेली 8 वर्षे प्रलंबित होते. महापालिकेच्या परिमंडळ 5 चे उपायुक्त भारत मराठे यांच्या मार्गदर्शनानुसार या झोपडय़ांची पात्रता निश्चित करून पालिकेच्यावतीने करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान या झोपडय़ा हटविण्यात आल्या. त्यामुळे नाल्याच्या रुंदीकरणाच्या कामांना गती प्राप्त होणार आहे. ज्यामुळे पावसाळय़ाच्या कालावधीत या परिसरातील अहिल्याबाई होळकर मार्ग, 90 फूटी मार्ग व शिवाजीनगर बेस्ट बस डेपो आदी परिसरात पाण्याचा निचरा अधिक वेगाने होण्यास मदत होऊन वाहतूक सुरळीत होईल.

जोगेश्वरी पश्चिम परिसरात जुहू गोरेगांव लिंक रोडवरील लिंकप्लाझा या इमारतीच्या मोकळय़ा जागेत व हॉटेल पॅफे हेवनच्या समोरच्या जागेत अनधिकृत बांधकाम करण्यात आले होते. याच इमारतीच्या समोर असणाऱया दुसऱया एका इमारतीत 4 दुकाने अनधिकृतपणे बांधण्यात आली होती. ही सर्व अनधिकृत बांधकामे आज करण्यात आलेल्या धडक कारवाई दरम्यान तोडण्यात आली.

Related posts: