पालकमंत्र्यांचा पुतळा जाळणार

सावंतवाडी : आरोंदा देऊळवाडी ते भवानी मंदिर रस्ता डांबरीकरण न होण्यास पालकमंत्री जबाबदार आहेत. येत्या पंधरा दिवसात सदर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम पूर्ण केले नाही तर पालकमंत्री दीपक केसरकर यांची शहरातून प्रतिकात्मक तिरडी काढून पुतळा जाळण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे सावंतवाडी तालुकाध्यक्ष संजू परब यांनी दिला. शनिवारी ग्रामस्थांच्या प्रांत कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणस्थळी त्यंनी भेट देऊन पाठिंबा दिला. ग्रामस्थांची उपोषणाची मागणी रास्त असून त्यांच्या उपोषणासाठी सावंतवाडी तालुका काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा राहील, असे परब यांनी सांगितले.
आरोंदा देऊळवाडी ते भवानी मंदिर परिसरातील हुसेनबाग, मानशीवाडी, गोळतूवाडी, जावेळवाडी ग्रामस्थांनी रस्त्याच्या मजबुतीकरण व डांबरीकरणासाठी
शुक्रवारपासून प्रांत कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. उपोषणस्थळी बांधकाम विभागाच्या एकाही अधिकाऱयाने भेट दिली नाही. जोपर्यंत रस्त्याचे डांबरीकरण होत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच ठेवण्याचा निश्चय ग्रामस्थांनी केला. दुसऱया दिवशीही ग्रामस्थांचे उपोषण सुरू होते.
दुपारी सावंतवाडी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संजू परब, सभापती रवींद्र मडगावकर, माजी सभापती प्रमोद सावंत, नगरसेवक सुधीर आडिवरेकर, राजू बेग, गुरु सावंत यांनी उपोषणस्थळी भेट दिली. संजू परब यांनी ग्रामस्थांशी चर्चा करून उपोषणाला पाठिंबा दिला.
परब म्हणाले की, गेल्या कित्येक वर्षांपासून तेथील ग्रामस्थ रस्त्याचे डांबरीकरण व्हावे या मागणीसाठी उपोषण करत आहेत. मात्र प्रशासनाकडून आश्वासनापलिकडे काहीच झाले नाही. याला पालकमंत्री व बांधकाम अभियंता जबाबदार आहेत. पालकमंत्री मताचे राजकारण करत आहेत. खरोखरच केसरकर पालक असतील तर त्यांनी ग्रामस्थांना न्याय द्यावा. मंत्रालयस्तरावर या कामासाठी निधी मंजूर झाला असताना प्रशासन काहीच करीत नाही. आदेशाला प्रशासन किंमत देत नाही. त्या भागातील काही ग्रामस्थांनी रस्त्याच्या ठिकाणी संरक्षक भिंत उभारणीची मागणी केली असेल तर पालकमंत्र्यांनी मंजूर करून आणलेल्या 1600 कोटीच्या निधीतील नऊ कोटीचा निधी वापरण्याची हिंमत दाखवावी. आम्ही ग्रामस्थांबरोबरच राहणार आहोत. त्यांचा प्रश्न येत्या पंधरा दिवसात सोडविला नाहीतर पालकमंत्री केसरकर यांची शहरातून प्रतिकात्मक तिरडी काढून पुतळा जाळला जाईल.
उपोषणस्थळी गामस्थ संजय कोचरेकर, गणेश गोसावी, तुषार भुते, बाबी बुडे, अनुजा तळवणेकर, चंद्रभागा भुते, सानिका केरकर आदी उपस्थित होते. उपोषणस्थळी माजी जि. प. आरोग्य व शिक्षण सभापती मंगेश तळवणेकर, भाई देऊलकर यांनी भेट देऊन ग्रामस्थांशी चर्चा केली.