|Tuesday, December 18, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मिरासाहेब उरूसास लाखो भाविकांची उपस्थिती

मिरासाहेब उरूसास लाखो भाविकांची उपस्थिती 

प्रतिनिधी/ मिरज

महाराष्ट्र-कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या येथील हजरत ख्वॉजा शमना मिरासाहेब यांच्या 642 व्या उरूसास शनिवारी उत्साहात प्रारंभ झाला. सकाळी सहा वाजता चर्मकार समाजाचा मानाचा पहिला गलेफ अर्पण झाला.  दर्शनासाठी भाविकांच्या रांगा पहाटेपासून दर्गा आवारात होत्या. दिवसभर विविध संस्था, संघटना, शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांचे गलेफ अर्पण करण्यात आले. 

शनिवारी पहाटे चर्मकार समाजाचा गलेफ सवाद्य मिरवणूकीने दर्गा आवारात आणण्यात आला. बॅन्ड आणि बेंजोच्या तालावर गुरूवार पेठेतील सातपुते वाडय़ातून ही गलेफ मिरवणूक मटण मार्केट, दर्गा कमान या मार्गे निघाली. तत्पूर्वी शुक्रवारी रात्रभर हा गलेफ दर्शनासाठी सातपुते वाडय़ात ठेवण्यात आला होता. रात्रभर भजन आणि इतर धार्मिक कार्यक्रम झाले. हा गलेफ मानाच्या शिंप्याकडून शिवून घेतला जातो. सकाळी सहा वाजता दर्गा आवारातील हजरत ख्वॉजा शमसुद्दीन मिरा आणि हजरत ख्वॉजा मुहम्मद मिरा यांच्या तुरबतींना गलेफ अर्पण करण्यात आले. यावेळी मानकरी शरद सातपुते, बापू सातपूते, हिरालाल सातपूते, किरण सातपूते, दत्तात्रय सातपूते, विजय सातपुते, श्रीकांत सातपुते, बाबु सातपूते, हिरालाल सातपूते, विशाल सातपूते, रविंद्र सातपुते, बसवेश्वर सातपूते, अनिल सातपूते, मीरा सखरे, उमेश सातपूते, दगडू कदम, धनराज सातपुते उपस्थित होते.

दरम्यान, रात्री संदलचा कार्यक्रम झाला. त्यानंतर कव्वालीचा कार्यक्रम झाला. यावेळी गुलबर्ग्याचे धर्मगुरू उपस्थित होते. दरम्यान, शनिवारी दिवसभर भाविकांचे शासकीय, निमशासकीय कार्यालयील कर्मचाऱयांचे गलेफ मिरवणूकीने अर्पण करण्यात आले. सकाळी पोलिस विभागामार्फत गलेफ अर्पण करण्यात आला. यावेळी पोलीस उपाधीक्षक धीरज पाटील, शहर पोलीस ठाण्याचे सदाशीव शेलार, महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे निरीक्षक श्रीकांत पिंगळे, वाहतूक शाखेचे रविंद्र चव्हाण, ग्रामीण पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजू मोरे, यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. सायंकाळी महापालिकेतर्फे गलेफ अर्पण करण्यात आला. यावेळी नगरसेवक सुरेश आवटी, अतहर नायकवडी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. रेल्वे कर्मचाऱयांनीही गलेफ अर्पण केला. रविवारी सकाळी महाराष्ट्र शासनाच्यावतीने तहसीलदार यांचा गलेफ अर्पण करण्यात येणार आहे.

उरूसानिमित्त शहर पोलिस ठाणे ते स्टँडपर्यंतच्या मार्गावर एकाच बाजूस पूजासाहित्य, धार्मिक पुस्तके, गृहोपयोगी वस्तू, खेळणी, खाद्यपदार्थ, सौंदर्यप्रसाधने यांचे स्टॉल लावण्यात आले आहेत. मंगल टॉकीज परिसरात मोठमोठे पाळणे, मेरी गो राऊंडसारख्या बालकांना आकर्षण करणारी खेळणी आहेत. जादूचे प्रयोग, फुगे फोडणे, जादूचा आरसा असेही मनोरंजक गोष्टी याठिकाणी मांडण्यात आले आहेत. मात्र, एकाच बाजूला उरूस भरवण्याचा निर्णय भाविकांना रूचला नाही. त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली. स्टॉलधारकांनीही मिळालेल्या अपुऱया जागेबद्दल संतप्त प्रतिक्रिया दिल्या.  

दरम्यान भविकांच्या सोयीसाठी महापालिकेने पाणी आणि इतर सुविधा पुरविल्या आल्या आहेत. पोलिसांनीही बंदोबस्त ठेवला असून महिलांची छेडछाड रोखण्यासाठी साध्या वेशातील पोलिसांचे तसेच महिला पोलिसांचे स्वतंत्र पथक नेमले आहे.

रविवारी सकाळी किराणा घराण्यातील शिष्य संगीतसेवा करणार आहेत.  खाँसाहेब दर्गा आवारातील ज्या चिंचेच्या झाडाखाली बसून अब्दूल करीम खाँसाहेब सेवा करीत त्याच झाडाखाली ही संगीतसेवा होणार आहे. यामध्ये देशभरातील नामांकित कलाकारांचे गायन-वादन होणार आहे.

Related posts: