|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शिवसृष्टीचे काम गतिमान

शिवसृष्टीचे काम गतिमान 

प्रतिनिधी / बेळगाव

श्री शिवसृष्टीच्या उद्घाटनासाठी पूर्वतयारीने आता वेग घेतला आहे. त्यामुळे नागरिकांना एका प्रेरणादायी केंद्राची भेट येत्या दि. 28 रोजी मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. शिवप्रेमी कार्यकर्त्यांच्या सततच्या पाठपुराव्याने दि. 28 रोजी शिवसृष्टी खुली होणार आहे. शिवप्रेमी कार्यकर्त्यांना दिलासा देणारी ही बाब असून त्यामुळे आता शहरवासियांचे लक्ष याकडे लागले आहे.

छत्रपती शिवरायांच्या संदर्भातील बेळगावकर नागरिकांत असणारा उत्साह आणि अभिमान यांचे नाते अतूट आहे. त्यामुळेच छत्रपती शिवाजी उद्यानातील श्री शिवरायांचा पुतळा हेदेखील बेळगावकरांचे प्रेरणास्थान आहे. बुडाच्या माध्यमातून या उद्यानात शिवसृष्टी उभारणीचे काम सुरू झाल्याने नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले. मात्र काही कारणांमुळे हे काम रखडले होते. याची दखल घेऊन शहरातील शिवप्रेमी संघटना आणि कार्यकर्त्यांनी याचा पाठपुरावा केला. सदर कामाच्या कार्यारंभासाठी मनपा आणि बुडाकडे पाठपुरावा केला. यामुळे आता शिवसृष्टीच्या कामाला गती प्राप्त झाली आहे.

शिवसृष्टीच्या उद्घाटनासाठी विलंब होत होता. त्यामुळे माजी महापौर महेश नाईक यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह या कामी पुढाकार घेतला. नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी तर स्वतःच कामांना प्रारंभ करून आपली तयारी दर्शविली. या पार्श्वभूमीवर शनिवारच्या मनपाच्या बैठकीत या उद्घाटनाची जबाबदारी उचलण्याची सूचना बुडा अभियंत्यांना करण्यात आली. त्यावर कार्यवाही करण्यासाठी आता मनपा आयुक्त शशिधर कुरेर यांनीही आदेश बजावला आहे. उद्घाटनानंतर बुडाकडून हस्तांतरण झाल्यावर यापुढील कामे मनपाकडून करून देण्याचे आश्वासन दिले आहे.

शिवकालीन प्रसंगांचे सादरीकरण लक्षवेधी

शिवजयंतीसाठी अवघे शहर सज्ज होत असतानाच आता शिवसृष्टीदेखील नागरिकांसाठी खुली होणार आहे. सध्या शिवसृष्टीच्या ठिकाणी असणारे शिवकालीन प्रसंगांचे सादरीकरणदेखील लक्षवेधी ठरणारे आहे. त्यामुळे उर्वरित कामांच्या पूर्ततेसाठी बुडा आणि मनपा यंत्रणेला वेळ देऊन नागरिक शिवसृष्टी पाहण्याची संधी घेतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

सदर कामकाजाची पूर्तता वेळेत करवून घेण्यासाठी नगरसेवक विजय भोसले, विनायक गुंजटकर आदींसह इतर शिवप्रेमी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत.