|Sunday, July 15, 2018
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » खिलाडी अक्षयची स्टंटमॅनसाठी विम्याची भेट

खिलाडी अक्षयची स्टंटमॅनसाठी विम्याची भेट 

बॉलीवूडचा खिलाडी म्हणून ओळख असलेल्या अक्षय कुमारचा दिलदारपणा सगळ्यांनाच माहित आहे. अनेक गरजूंना, दुष्काळग्रस्त शेतकऱयांना, सैन्य दलातील जवानांना आर्थिक मदतीचा हात त्याने नेहमीच पुढे केला आहे. आता पुन्हा एकदा त्याची संवेदनशील बाजू पुढे आली आहे. चित्रपटामध्ये स्टंटमॅन म्हणून काम करणाऱया कलाकारांना जीवन विमा योजनेचे कवच तो उपलब्ध करून देणार आहे. खिलाडी अक्षयने एकप्रकारची भेट त्यांना देऊ केली आहे.

अभिनेता होण्यापूर्वी अक्षय कुमारने तायक्वांडो, मार्शल आर्ट्स यांचे धडे गिरवले आहेत. त्याने मुंबईत आल्यानंतर मार्शल आर्ट्सचे प्रशिक्षणही दिले आहे. सौगंध या चित्रपटापासून ऍक्शन हिरो म्हणून त्याने कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर त्याला हळूहळू खिलाडी अक्षय कुमार अशी ओळख मिळाली. अक्षय कुमारची कारकिर्द सध्या जोमात सुरू आहे. राष्ट्रीय पुरस्कारावरही त्याने छाप उमटवली आहे. आता नव्या उपक्रमाची मुहुर्तमेढ त्याने रोवली आहे. अक्षय कुमार आणि प्रसिद्ध हृदयरोगतज्ञ डॉ. रमाकांत पांडा यांच्या संकल्पनेतून ही योजना राबविण्यात येणार आहे. डॉ. रमाकांत पांडा यांनी 2009 साली माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची हृदय शस्त्रक्रिया केली होती. मी आधी स्टंटमॅन आहे त्यानंतर अभिनेता आहे असे अक्षय कुमार अभिमानाने सांगतो. स्टंटमॅन खूपच कष्ट घेत असतात. त्यांचा जीव नेहमीच धोक्यात असतो. जीव धोक्यात असूनही मनापासून आणि पोटासाठी ते ही रिस्क घेत असतात असे अक्षय कुमारने सांगितले. 18 ते 55 या वयोगटातील जवळपास 380 स्टंट करणारे पुरुष आणि महिला यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. आजवर स्टंटमॅनसाठी कोणतिही विमा योजना अस्तित्वात नव्हती. गेल्या चार ते पाच महिन्यांपासून या उपक्रमावर काम सुरू होते. स्टंट आर्टिस्ट असोसिएशनचे सचिव एझाज गुलाब यांनी सांगितले की, गेल्या अनेक वर्षांपासून निर्माते आणि विमा कंपन्यांकडे आम्ही विमा योजनेसाठी पाठपुरावा केला. मात्र आम्हाला कुणिही प्रतिसाद दिला नाही. मात्र अक्षय कुमारने आम्हाला मदतीचा हात दिला आहे. याचे समाधान आहे. या विमा योजनेनुसार, शूटींगदरम्यान स्टंट करत असताना अपघात झाल्यास स्टंटमनना जवळपास 4 हजार रुग्णालयांमध्ये 6 लाख रुपयांपर्यंत खर्च करता येणार आहे. पॅशलेस पद्धतीने हा व्यवहार होणार आहे. योजनेमध्ये एखाद्या रुग्णालयाचा समावेश नसल्यास त्यांना उपचारानंतर त्याचा परतावा मिळणार आहे. तसेच दुर्दैवाने स्टंटमॅनचा मृत्यू झाल्यास नॉमिनीला दहा लाख रुपयांपर्यंतची मदत केली जाणार आहे.

शहिदांच्या कुटुंबियांसाठी ऍप

नुकतेच सैन्यातील शहिदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत मिळावी यासाठी ‘भारत के वीर’ हे मोबाईल ऍप्लिकेशन आणि संकेतस्थळ अक्षय कुमारने सुरू केले आहे. तीन महिन्यांमध्ये त्याने हे मोबाईल ऍप्लिकेशन सुरू केले. माझे वडील हरीओम भाटिया सैन्यदलात होते. त्यामुळे शहीदांच्या कुटुंबियांचे दु:ख मी समजू शकतो. यासाठी हे ऍप सुरू केले आहे, असे अक्षय कुमारने सांगितले.

Related posts: