|Thursday, July 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » हापूसला स्वतंत्र मानांकनाचा साज

हापूसला स्वतंत्र मानांकनाचा साज 

देवगड हापूस आंब्याच्या नावावर अन्य कुणी विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास तो गुन्हा ठरू शकतो. जी. आय. मानांकनामुळे देवगड हापूसचा विशिष्ट ब्रॅण्ड असणार आहे. ग्राहकांनाही हा ब्रॅण्ड पाहूनच आंबा घेता येणार आहे.

फळांचा राजा असा मान हापूस आंब्याकडे जात आला आहे. त्यातही कोकणात निर्माण झालेल्या हापूस आंब्याला तोड नाही. जागतिक पातळीला विक्री व्यवस्था करताना या फळांच्या राजाचा दिमाख कायम रहावा म्हणून बौद्धिक संपदा कायद्याअन्वये असलेला विशेष दर्जा या हापूस आंब्याला देण्याचा प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरु आहे. कोकणातल्या लाल मातीतील वेगळ्या स्वादाचा आंब्याला स्वतंत्र भौगोलिक उपदर्शन म्हणून जीओग्राफीकल इंडिकेशन (जीआय) देण्याचा मुद्दा निर्णित झाला आहे. रत्नागिरी हापूस आणि देवगड हापूस अशी नावे यापुढे ठरावीक प्रक्षेत्रात तयार झालेल्या हापूस आंब्यासाठी वापरता येणार आहेत.

हापूस आंब्याला जीआय मानांकनासाठी तीन अर्ज केंद्र सरकारच्या कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट या राष्ट्रीय संस्थेकडे आले होते. त्यामध्ये ‘रत्नागिरी हापूस’, दापोली कृषी विद्यापीठामार्फत ‘हापूस’ व देवगड तालुका आंबा उत्पादक संघाच्यावतीने ‘देवगड हापूस’ असे तीन अर्ज होते. दापोली कोकण कृषी विद्यापीठामार्फत ठाणे, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या भागातील आंब्याला ‘हापूस’ हे मानांकन देण्याबाबत अर्ज केला होता. मात्र, मुंबई येथे झालेल्या सुनावणीवेळी अर्जामध्ये निश्चित नाव आंब्याला न दिल्यामुळे रत्नागिरी जिल्हय़ातील अन्य एका संस्थेने ‘रत्नागिरी हापूस’ म्हणून दाखल केलेल्या अर्जाला कंट्रोलर जनरल ऑफ पेटंट या संस्थेने मान्यता दिली. देवगड तालुका आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे अध्यक्ष, ऍड. अजित गोगटे व त्यांच्या सहकाऱयांनी देवगड हापूसला जीआय मानांकन मिळविण्यासाठी सात वर्षे प्रयत्न केले.

देवगड हापूस आंब्याच्या नावावर अन्य कुणी विक्री करण्याचा प्रयत्न केल्यास तो गुन्हा ठरू शकतो. त्यामुळे देवगड हापूस नावाखाली कर्नाटक हापूस व अन्य हापूस आंबे विक्री केले जात होते. त्याला आता आळा बसणार आहे. जी. आय. मानांकनामुळे
देवगड हापूसचा विशिष्ट ब्रॅण्ड असणार आहे. ग्राहकांनाही हा ब्रॅण्ड पाहूनच आंबा घेता येणार आहे.

भौगोलिक उपदर्शनाच्या निर्णयामुळे बाजारपेठेत या आंब्याची जाहिरात रत्नागिरी किंवा देवगड हापूस अशीच होऊ शकणार आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर रत्नागिरी किंवा देवगड येथील हापूस आंब्याच्या निर्यात व विक्री करता विशिष्ट भौगोलिक क्षेत्रातील हापूस आंब्याचे उत्पादन होणे गरजेचे राहणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिह्यातील नोंदणीकृत बागांमध्येच हा हापूस आंबा तयार झाला असल्याबद्दल पुरावा देता आला तरच त्या आंब्याला रत्नागिरी अथवा देवगड हापूस आंबा म्हणता येणार आहे.

आजही श्रीवर्धन, म्हसळा, अलिबाग या क्षेत्रात हापूस आंबा होतो. हा प्रदेश देखील कोकणीच आहे. या प्रदेशातील लोकांना भौगोलिक उपदर्शन नोंदीचा उपयोग होणार नाही. त्यांना स्वतंत्र नोंदीची गरज आहे. शिवाय कर्नाटक मधील विविध गावे आपापल्या नावाच्या पुढे हापूस आंबा जोडून वेगळ्या उपदर्शन नोंदीची मागणी करू शकतात आणि देशभरात कित्येक गावांच्या नावापुढे हापूस असे लावण्यास बौद्धिक संपदा कायद्याचा अडथळा राहणार नाही.

महाराष्ट्रातील कोकणात तयार होणाऱया हापूस आंब्याला केवळ हापूस म्हटले जावे, गोवा, कर्नाटक, गुजरात, केरळमध्ये तयार होणाऱया कोणत्याही आंब्याला केव्हाही हापूस हे नाव लावता येऊ नये एवढेच काय रत्नागिरी किंवा देवगडमध्ये तयार झालेली हापूस आंब्याची कलमे परदेशात नेऊन लावली तरी त्याला हापूस हे नाव मिळता कामा नये अशी विनंती कोकण कृषी विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय परिणामांचा अभ्यास करून पेटंट विषयक मंडळाला केली होती. पेटंट विषयक मंडळाने गांभीर्याने व दूरगामी विचार न करता लोकानुयासाठी उपदर्शन मागणी मान्य केली आहे. उद्या धारवाड हापूस सोबत मलेशिया हापूससारखे आंबे भारतीय बाजारात अथवा जागतिक बाजारात येऊ शकतात आणि त्याला अडथळा करणे अशक्य होणार आहे. म्हणून गावाच्या नावाच्या प्रेमात पडण्यापेक्षा हापूस या नावाचे संरक्षण झाले पाहिजे, असा विचार कोकण कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱयांनी केला होता. परंतु त्यांचा प्रस्ताव अमान्य झाला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अन्य कोणालाही हापूस हे नावे घेता येऊ नये असा विद्यापीठाचा विचार दीर्घकालिक वाटचालीसाठी निश्चितच उपयुक्त ठरणारा होता परंतु इतक्या तपशिलामध्ये लोकांनी विचार केला नाही. असेच म्हणावे लागेल.

आंबा निर्यातीच्या टप्प्यावर यावर्षी थोडे आशावादी चित्र निर्माण झाले आहे. एकीकडे मुंबई-वाशी मार्केटमध्ये हापूसला पर्यायी आंब्याची स्पर्धा वाढल्याने तेथील हापूसचे दर घसरले आहेत. वाशी मार्केटमध्ये हापूससाठी डझनाला 300 ते 400 रु. दर मिळत आहे. स्थानिक बाजारपेठांबरोबरच परदेशातील निर्यातही तेथून होते. आखाती देशांबरोबरच दुबई, युरोप, अमेरिका, जपान, सिंगापूर, दक्षिण कोरिया, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया येथेही वाशी मार्केटमधून आंबा निर्यात सुरू झाली आहे.

युरोपिअन युनियन तसेच अमेरिका, चीन, पॅनडा इत्यादी विविध देश सध्या कृषिमाल आयात करताना संबंधित मालाच्या कीडरोगमुक्त व किडनाशक उर्वरित अंशमुक्त हमी बरोबरच अन्य पूर्व इतिहासाबाबत मागणी करत आहे. उत्पादकाने ठेवलेले अभिलेख, वापरलेली कार्यपद्धती, स्वच्छताविषयक घेतलेली काळजी उत्पादन प्रक्रियेत अवलंब करण्यात आलेले तंत्रज्ञान आदी माहितीचा आग्रह आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत धरला जात आहे.

रशियात मात्र आंबा निर्यातीसाठी असे निकष नसल्याचे सांगितले जात आहे. रशियात निर्यातीसाठी आंब्याच्या फळाचे वजन 270 ग्रॅम पेक्षा अधिक असणे गरजेचे आहे. त्यामुळेच यावर्षी प्रथमच रशियात रत्नागिरीतील पॅक हाऊसमधून हापूसची निर्यात करण्यात आली आहे. इमेजिन इंडस्ट्रीज कंपनीमार्फत मँगोनेट प्रणालीअंतर्गंत 12 मार्च रोजी 1,200 किलो, तर 23 मार्च रोजी 500 किलो हापूसची निर्यात करण्यात आल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. रत्नागिरीतून मुंबई, तेथून अमृतसर ते रशिया असा हापूस निर्यातीचा प्रवास झाला आहे. या आंब्याला प्रति डझन 800 रु. असा समाधानकारक दरही मिळाला आहे. अजून नेदरलँडमधूनही हापूससाठी सुमारे 1500 किलोची मागणी आहे.