|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » दारोगा बख्तावरसिंह

दारोगा बख्तावरसिंह 

पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ प्रमाणे हिंदीत श्रीलाल शुक्ल यांची ‘राग दरबारी’ ही अजरामर कलाकृती आहे. फरक इतकाच की ‘राग दरबारी’ कादंबरी आहे. कादंबरीतल्या अनेक नमुनेदार पात्रांपैकी दारोगा (पीएसआय) बख्तावरसिंह या वल्लीबद्दल आज लिहितोय. स्वतःवर ओढवलेल्या प्रसंगातून देखील तो कशी कमाई करतो त्याची हकिकत आजचे संदर्भ टाकून वाचली तर अधिक धमाल येते.

एकदा रात्री आडवाटेने येत असताना दारोगा बख्तावरसिंहला झगरू आणि मगरू या दोन गुंडांनी बदडले. दारोगा बख्तावरसिंहनी पोलीस ठाण्यावर रिपोर्ट लिहिला. हे झाल्यावर झगरू आणि मगरू पोलीस ठाण्यात आले आणि दारोगा बख्तावरसिंहचे हात ओले करून आणि पाय धरून म्हणाले, “साहेब, झाल्या चुकीची माफी करा. तुम्ही आमचे मायबाप. लेकराकडून चूक झाली तर मायबाप माफ करतात. तुम्ही देखील माफ करा.’’ दारोगा बख्तावरसिंहनी आपला ओला झालेला वरदहस्त दोघांच्या माथ्यावर ठेवला आणि मायबाप या नात्याने दोघांना माफ करून टाकले. पण दरम्यान टीव्हीवाल्यांना याची कुणकुण लागली. त्यांनी ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली उच्छाद मांडला. ज्या देशात पीएसआय मार खाऊन गप्प बसतो त्या देशातल्या नागरिकांच्या संरक्षणाचं काय यावर पंचक्रोशीतल्या रिकामटेकडय़ा म्हाताऱया-कोताऱयांना टीव्हीवर चर्चेसाठी बोलावून हा विषय जोरदार पेटवून दिला.

मग दारोगा बख्तावरसिंहनी आयडिया केली. त्यांनी झगरू आणि मगरूना बोलावून गुप्तपणे मसलत केली. झगरू आणि मगरूच्या विरुद्ध पक्षातले तीन गुंड जरा जास्त शिरजोर झाले होते. दारोगा बख्तावरसिंहनी या तिघांना अटक केली आणि त्यांनीच आपल्याला मारहाण केली असे म्हणून कोर्टापुढे नेले. दारोगा बख्तावरसिंहना मारहाण होताना बघणारे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून झगरू आणि मगरूनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तिन्ही गुंडांवर गुन्हा शाबीत झाला आणि ते तुरुंगात गेले. झगरू आणि मगरूची जोडी आपले अवैध धंदे बिनबोभाट करायला मोकाट सुटली. त्यांच्या मार्गातला मोठा अडसर दूर झाला होता.

हे पाहून इलाख्यातले इतर गुंड देखील दारोगा बख्तावरसिंहकडे आले नि त्यांचे पाय धरून विनवू लागले, “साहेब, आमचे देखील मायबाप व्हा. आम्हाला देखील तुमची लेकरे म्हणून पदरात घ्या. एकदा तुम्हाला बदडून काढायची आम्हाला देखील संधी द्या.’’

पण देशाला असलेली संततीनियमनाची गरज लक्षात घेऊन दारोगा बख्तावरसिंहनी अधिक लेकरे स्वीकारण्यास विनम्रपणे नकार दिला.

Related posts: