|Wednesday, May 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » जिल्हा पंचायत मतदारसंघासाठी वाढीव निधी द्यावा

जिल्हा पंचायत मतदारसंघासाठी वाढीव निधी द्यावा 

प्रतिनिधी/ पणजी

प्रत्येक जिल्हा पंचायत मतदारसंघासाठी रु. 30 लाख देण्याची मागणी उत्तर गोवा जिल्हा पंचायतीच्या सर्वसाधारण सभेतून करण्यात आली आहे. तशी मागणी सरकारकडे करण्याचेही ठरविण्यात आले आहे.

गोव्यात नवीन सरकारची स्थापना झाल्यानंतरची जिल्हा पंचायतची ही पहिलीच बैठक होती. अध्यक्षस्थानी अंकिता नावेलकर उपस्थित होत्या. बैठकीत नेहमीप्रमाणे अधिकार आणि निधी यावर चर्चा झाली. नवीन सरकारकडे त्यावर नव्याने मागणी करावी, अशी सूचना काहींनी केली. जिल्हा पंचायतीसाठी सध्या देण्यात येत असलेला निधी अपुरा असून तो वाढवावा, असे मत काही सदस्यांनी मांडले.

निधी नसल्यामुळे जिल्हा पंचायत मतदारसंघात कोणतीच विकासकामे हाती घेता येत नाहीत आणि होत नाहीत. जो काही मिळतो तो पुरेसा नसतो. म्हणून रु. 30 लाख तरी प्रत्येक सदस्याच्या मतदारसंघासाठी विकासकामांकरीता मिळावेत यावर बैठकीत एकमत झाले. नैसर्गिक आपत्ती आल्यास किंवा झाल्यास आर्थिक मदतीची रक्कम अतिशय अल्प म्हणजे केवळ रु. 5000 एवढीच असून ती वाढवावी आणि रु. 1 लाख तरी करावी असे उत्तर गोवा जिल्हा पंचायत बैठकीतून सूचविण्यात आले आहे.

जिल्हा पंचायतीच्या अंतर्गत काहीतरी खात्यांचा कारभार असावा आणि तो यावा अशी सूचना बैठकीत आली तेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच प्राथमिक शाळा शिक्षण हे जिल्हा पंचायतीच्या अखत्यारित आणावे असा मुद्दा पुढे आला आहे. मागील बैठकीच्या वृत्तांताचे वाचन करण्यात येऊन तो बैठकीसमोर मांडण्यात आला आणि त्यास मान्यता देण्यात आली. बैठकीला उपाध्यक्ष वासुदेव कोरगावकर व इतर सर्व सदस्य उपस्थित होते.

Related posts: