|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » साध्वी प्रज्ञासिंहला जामीन; कर्नल पुरोहित आतच

साध्वी प्रज्ञासिंहला जामीन; कर्नल पुरोहित आतच 

2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पाच लाखांच्या व्यक्तिगत जातमुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आला. मात्र या प्रकरणातील दुसरे आरोपी कर्नल पुरोहित यांचा जामीन न्यायालयाने फेटाळून लावला आहे. न्यायालयाच्या निकालावर आनंदी असल्याचे मत साध्वीचा मेहुणा भगवान झा यांनी व्यक्त केले.

एप्रिल 2016 मध्ये एनआयएने साध्वीला क्लीनचिट देत मोक्का हटवला. त्यानंतर साध्वीने सत्र न्यायालयातील विशेष न्यायालयात जामिनासाठी अर्ज केला. मात्र विशेष न्यायालयाने तिच्याविरुद्ध सबळ पुरावे आहेत असे म्हणत जामीन अर्ज फेटाळला होता. विशेष न्यायालयाच्या या निर्णयाला साध्वीने उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. अखेर मंगळवारच्या सुनावणीत न्यायालयाने साध्वी यांना जामीन मंजूर केला. मात्र लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांचा जामीन अर्ज फेटाळला.

बॉम्बस्फोटात वापरलेली मोटारसायकल आपली असली तरी ती दुसऱयाला विकण्यात आल्याचा दावा साध्वीने उच्च न्यायालयात केला होता. साध्वी आजारी असल्याने तिचा जामीन मंजूर करण्यात यावा, अशी विनंती साध्वीच्या वकिलांनी न्यायालयाला केली होती. साध्वीच्या जामीन अर्जावर एनआयएनेही आक्षेप घेतलेला नव्हता. साध्वीविरुद्ध पुरावे नसल्याने व काही आरोपींनी त्यांचा जबाब फिरवल्याने तिच्याविरुद्ध पुरावे नाहीत असा युक्तिवाद एनआयने खंडपीठापुढे केला होता. बॉम्बस्फोटासाठी ज्या मोटारसायकलचा वापर केला होता ती मोटारसायकल फरारी आरोपी रामचंद्र कालसंगराच्या ताब्यात होती. त्यामुळे या गुह्याप्रकरणी साध्वीला जबाबदार धरले जाऊ शकत नाही, असा दावा तिच्या वकिलांनी केला. तो चुकीचा ठरवता न आल्याने न्या. रणजीत मोरे आणि न्या. शालिनी फणसाळकर – जोशी यांच्या खंडपीठाने जामीन मंजूर केला. प्रथमदर्शनी साध्वीविरोधात सबळ पुरावे नसल्याचे सांगत त्यांनी साध्वीला दिलासा दिला.

कर्नल प्रसाद पुरोहितनेही उच्च न्यायालयात जामिनासाठी धाव घेतली. बेकायदेशीर कारवाया प्रतिबंध कायद्याची (युएपीए) सुधारित तरतूद पूर्वलक्षित प्रभावाने लागू केली जाऊ शकत नाही. तसेच या तरतुदीनुसार युएपीए लागू करण्यासाठी विशेष समितीची मंजुरी घेणे आवश्यक आहे. मात्र जानेवारी 2009 मध्येही समितीच अस्तित्वात नव्हती. त्यामुळे सुधारित तरतुदींनुसार पुरोहितला जामीन नाकारणे बेकायदा आहे, असे पुरोहित यांनी याचिकेत नमूद केले होते. पुरोहितच्या जामीन अर्जावर एनआयएने आक्षेप घेतला होता. न्यायालयाने साध्वी प्रज्ञा यांना जामीन दिला असला तरी कर्नल प्रसाद पुरोहित यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

साध्वी प्रज्ञासिंहला 5 लाखांच्या व्यक्तिगत जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला. त्याशिवाय तेवढय़ाच रकमेच्या दोन जामीनदार, पासपोर्ट एनआयएकडे सोपवणे आणि तारखांना न्यायालयात हजर राहण्याच्या अटींवर आणि साक्षीदारांना आपल्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न करू नये या शर्तीवर आदेशात असल्याचे साध्वीचे वकील रामेश्वर गीते यांनी सांगितले.

मालेगाव बॉम्बस्फोट नेमकं काय प्रकरण?

मालेगावमध्ये एका दुचाकीमध्ये 29 सप्टेंबर 2008 रोजी झालेल्या स्फोटात सहा जणांचा मफत्यू झाला होता तर 101 जण जखमी झाले होते. या स्फोटात सहभागी असल्याच्या आरोपाखाली महाराष्ट्र एटीएसने ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्यात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित यांच्यासह 11 जणांना अटक केली होती. जानेवारी 2009 साली एटीएसने सर्व जणांविरोधात मोक्का अंतर्गत आरोपपत्र दाखल केले होते. 2011 साली मालेगाव स्फोटाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला. 2011 साली बॉम्बस्फोटाचा तपास एटीएसकडून एनआयएकडे वर्ग करण्यात आला. 2014 साली सत्तांतर झाले. त्यानंतर एनआयएने 2 वर्षात नव्याने तपास करत साध्वीसह सहा जणांविरोधात सबळ पुरावे नसल्याचे स्पष्ट केले आहे. मालेगाव बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर हिला संशयित आरोपी म्हणून अटक केली होती. त्यानंतर अनेकदा तिने जामिनासाठी प्रयत्न केले पण दिलासा मिळू शकला नव्हता. मात्र गेल्या वर्षी मे महिन्यात साध्वीविरोधात पुरेसे पुरावे नसल्याचा निर्वाळा देत एनआयएने पुरवणी आरोपपत्रात साध्वीला क्लीनचिट दिली होती. साध्वी, कर्नल पुरोहितसह 12 आरोपींवरील मोक्का हटवण्यात आला होता. त्याआधारावरच साध्वीने एनआयएच्या विशेष न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र हा अर्ज फेटाळण्यात आला. त्यामुळे साध्वीने उच्च न्यायालयाचे दार ठोठावले.

प्रदीर्घ लढय़ानंतर न्याय

आठ वर्षांच्या प्रदीर्घ न्यायालयीन लढय़ानंतर आम्हाला यश मिळाले आहे. उच्च न्यायालयाच्या निकालावर आम्ही खूश आहोत. सध्या साध्वी प्रज्ञासिंह या मध्य प्रदेशातील कारागृहात आहेत. लवकरच न्यायालयीन बाबींची पूर्तता झाली की त्यांची सुटका होईल. – रामेश्वर गीते, साध्वीचे वकील

Related posts: