|Thursday, October 18, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » गल्ली ते दिल्ली

गल्ली ते दिल्ली 

भाजपने दिल्ली महानगरपालिकांवरही विजयाचा झेंडा फडकविल्याने गल्लीपासून  दिल्लीपर्यंत कमळच फुलल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. केवळ महानगरपालिका निवडणुकीतील विजय, अशा चष्म्यातून या निकालाकडे पाहता येणार नाही. याचे दूरगामी परिणाम दिल्लीसोबतच देशाच्या राजकारणावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे होऊ शकतात. म्हणूनच अनेकार्थांनी हा विजय महत्त्वाचा म्हटला पाहिजे. मागील दहा वर्षांपासून दिल्लीत भाजपाचे वर्चस्व आहे. हे पाहता पक्षाचा विजय ऐतिहासिक नसेलही. मात्र, याच दिल्लीकरांनी अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला दोनदा निवडून दिले आहे, हे विसरता येत नाही. राज्यात आपचीच सत्ता असून, केजरीवाल हे दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. आपल्या आत्तापर्यंतच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीत त्यांनी काही कामे केली आहेत, हे नाकारता येत नाही. लाल दिवा संस्कृतीविरोधात भूमिका घेण्याचा पहिला निर्णय तसा त्यांचाच. पाणी बिल माफीपासून ते दिल्लीतील
प्रदूषणापर्यंत अनेक महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी पावले उचलली. असे असले, तरी नकारात्मक दृष्टीकोन, आक्रस्ताळेपणा अशा काही गोष्टींमुळे त्यांच्याभोवतीचे वलय काही प्रमाणात आक्रसत चालल्याचेही पहायला मिळत होते. खरेतर दहा वर्षे सत्तेवर असल्याने भाजपाला ‘ऍन्टी इन्कबन्सी’चा धोका होता. तथापि, त्याचा लाभ उठवून महापालिकेवर वरचष्मा मिळविण्याचे स्वप्न आपला पूर्ण करता आले नाही. हे त्यांचे मोठेच अपयश मानावे लागेल. कलचाचण्यांमध्ये भाजपाच बाहुबली ठरेल, असा अंदाज वर्तविण्यात आला होता. हे अंदाज खरे ठरले असून, केजरीवाल यांच्या आपपुढे या निकालाने मोठे आव्हान निर्माण झाले आहे. अडीच वर्षांपूर्वी जनतेने आपच्या पारडय़ात भरभरून माप टाकले असले, तरी हे यश किती टिकणार, असा प्रश्न आजच्या निकालाने नक्कीच निर्माण झाला असेल. स्थानिक स्वराज्य संस्था व विधानसभा तसेच लोकसभा निवडणुकांचे संदर्भ वेगळे असतात, असे मानले तरी आपच्या यशाला ओहोटी लागली आहे यावर यातून शिक्कामोर्तबच होते. मोदी लाटेने लोकसभा निवडणुकीत भाजपाला स्पष्ट बहुमत मिळवून दिले. परंतु, दिल्लीत मोदींची मात्रा चालली नाही. केजरीवाल यांची दिल्ली, नितीशकुमार यांचा बिहार व अमरिंदसिंग यांचा पंजाब वगळता गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत  भाजपाचाच निर्माण झालेला प्रभाव मागच्या दोन-अडीच वर्षांत देशाने पाहिला. उत्तर प्रदेशसह चार राज्येही पक्षाने पादाक्रांत केली आहेत. महाराष्ट्रात नुकत्याच पार पडलेल्या लातूर व चंद्रपूर महापालिकांमध्येही कमळ फुलले. हाच ट्रेण्ड दिल्लीत पहायला मिळाला. त्यामुळे मोदी लाटेचा प्रभाव अजून आहेच, हे मान्य करावे लागते. मोदी यांना यशस्वी टक्कर देणाऱया राजकारण्यांमध्ये नितीशकुमार, केजरीवाल यांचीच प्रामुख्याने गणना होते. परंतु, पुढील दिल्ली विधानसभा निवडणूक केजरीवाल यांच्यासाठी अधिक कसोटीची असेल. विधानसभा हातची गेली, तर त्यांच्या राष्ट्रीय राजकारणातील प्रतिमेलाही धक्का बसून पक्षवाढ खुंटण्याचा धोका संभवतो. देशभर भाजपा शतप्रतिशत विस्तारत असला, तरी राजधानीत सत्ता नसणे, हे भाजपावाल्यांचे शल्य आहे. त्यामुळे ते आगामी काळात दिल्ली जिंकण्यासाठी कसोशीने प्रयत्न करतील, हे वेगळे सांगायला नको. स्वाभाविकच केजरीवाल यांना या पराभवातून बाहेर पडत अधिक जोमाने पुढे यावे लागेल. जुन्या चुका टाळतानाच बोलंदाजीपेक्षा विकासकामांवरच त्यांना अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. अर्थात ते काय करणार, हे पुढील काळातच कळेल. तूर्तास तरी त्यांनी आपला पराभव स्वीकारलेला नाही. दिल्लीतील भाजपाचा विजय मोदी लाटेमुळे नव्हे; तर ‘ईव्हीएम’ लाटेमुळे झाल्याचा आरोप आपने केला आहे. काँग्रेसनेही याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. उत्तर प्रदेशातील निकालाबाबत मायावती यांनीही याविरोधात भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रातील निकालांबाबत शंकाकुशंका घेण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर भविष्यातील निवडणुकीत मतदारांना मतदान केल्याची पावतीही मिळणार असल्याचे आयोगाकडून सांगण्यात आले आहे. तसे झाले, तर चांगलेच आहे. कुणालाच निकाल निश्चितीचे आरोप करता येणार नाहीत. मात्र, अशा पावतीचा गैरवापर होऊ नये, यासाठी दक्षता घ्यावी लागेल. ती तिथेच जमा करण्याचे वा फाडून टाकण्याचे बंधन टाकणे क्रमप्राप्त ठरेल. अन्यथा, उमेदवार त्याचाही मते विकत घेण्यासाठी फायदा घेऊ शकतात. शेवटी कोणत्याही गोष्टीमध्ये पारदर्शकता महत्त्वाची असते. काळाप्रमाणे सुधारणा कराव्या लागतात. निवडणूक प्रक्रियाही अधिकाधिक पारदर्शक कशी होईल, यासाठी पावले उचलली पाहिजेत. एकेकाळी काँग्रेसवरही आरोप व्हायचे. आत्ता भाजपावर होत आहेत. चलताही रहेगा, अशा दृष्टिकोनातून काही होत नाही. उलटपक्षी संभ्रम, साशंकता वाढत जाते. हे पाहता याबाबत योग्य ती पावले उचलली जातीलच. दुसरीकडे विरोधकांनीही आपल्या कार्यपद्धतीत सुधारणा करायला हव्यात. केवळ दूषणे देत बसण्यापेक्षा कामाला लागावे. ज्यांच्या आंदोलनातून केजरीवाल यांचे नेतृत्व पुढे आले, त्या ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही अरविंद नुसते बोलतात, काही करत नाहीत अशी टीका केली आहे. आपल्या गुरुपदेशातून धडे घेऊन केजरीवाल यांनी कृतिशील होण्याचा प्रयत्न करावा. भाजपाची वाटचाल सध्या शतप्रतिशतच्या दिशेने सुरू आहे. शंभर हत्तींचे बळ आलेल्या या पक्षाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. परंतु, त्यांच्यावरही अंकुश असायला हवा. सक्षम विरोधी पक्ष नसला, की सत्ताधारी भरकटण्याचा धोका असतो. काँग्रेस कमकुवत झाल्याने सध्या अशीच भीती निर्माण झाली आहे. अशा काळात आपसारख्या पक्षांनी आपले स्थान बळकट करणे, ही लोकशाहीची गरज बनते. काही का असेना आजमितीला गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत भाजपाचाच बोलबाला आहे. आगामी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीनेही पक्षाचे पारडे आता जड झाले आहे. स्वाभाविकच सर्वच पक्षांपुढे आता फक्त भाजपाचेच आव्हान असेल.

Related posts: