|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » दोडामार्ग नगरपंचायत पोटनिवडणूक 24 मे रोजी

दोडामार्ग नगरपंचायत पोटनिवडणूक 24 मे रोजी 

प्रतिनिधी/ सिंधुदुर्गनगरी

कसई-दोडामार्ग नगरपंचायतीच्या प्रभाग क्रमांक सातच्या नगरसेविका संध्या राजेश
प्रसादी अपात्र ठरल्याने रिक्त झालेल्या नगरसेवकपदासाठीची पोटनिवडणूक 24 मे रोजी घेण्याचे प्रभारी जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर यांनी जाहीर केले आहे.

कसई-दोडामार्ग नगरपंचायतीची निवडणूक होऊन प्रभाग सातमधून शिवसेना पक्षाकडून संध्या राजेश प्रसादी निवडून आल्या होत्या. परंतु नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसने नगराध्यक्षपदासाठी उभे केलेले उमेदवार संतोष नानचे यांना मतदान केले होते. त्यामुळे शिवसेनेने त्याची गंभीर दखल घेत पक्षविरोधी कारवाई केल्याबद्दल संध्या प्रसादी यांना नगरसेवकपदावरून अपात्र ठरवावे, अशी
तक्रार जिल्हाधिकाऱयांकडे केली होती. त्या तक्रारीवर सुनावणी होऊन संध्या प्रसादी यांना नगरसेवकपदावरून जिल्हाधिकाऱयांनी अपात्र ठरवले होते. त्यामुळे रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक सातच्या नगरसेवकपदासाठी 24 मे रोजी पोटनिवडणूक घेण्याचे जाहीर केले आहे.

पोटनिवडणुकीसाठी प्रभारी जिल्हाधिकारी रवींद्र सावळकर यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. त्याप्रमाणे 28 एप्रिल ते 5 मे कालावधीत सकाळी 11 ते दुपारी तीन या वेळेत नामनिर्देशनपत्र दाखल करणे, 6 मे रोजी नामनिर्देशनपत्राची छाननी, 11 मे रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी मागे घेणे, 12 मे रोजी निवडणूक चिन्ह वाटप करणे व निवडणूक लढवणाऱया उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे, 24 मे रोजी सकाळी 7.30 ते 5.30 वाजेपर्यंत मतदान, 26 मे रोजी सकाळी 10 वाजल्यापासून दोडामार्ग तहसीलदार कार्यालयात मतमोजणी करून निकाल जाहीर केला जाणार आहे.

नोव्हेंबर 2016 मध्ये दोडामार्ग नगरपंचायतीची निवडणूक होऊन एकूण 17 नगरसेवकांपैकी भाजपचे पाच, शिवसेनेचे पाच, काँग्रेसचे चार, राष्ट्रवादीचे दोन आणि मनसेचा एक नगरसेवक निवडून आले होते. 24 नोव्हेंबर 2016 रोजी नगराध्यक्ष पदाची निवडणूक होऊन भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार सुधीर पनवेलकर यांचा पराभव करून शिवसेना-भाजपच्या दोन नगरसेवकांच्या मदतीने 8 विरुद्ध 9 मतांनी काँगेसचे उमेदवार संतोष नानचे निवडून आले होते.