|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नगरसेवकांचा पुढाकार ; प्रशासनाची उदासीनता

नगरसेवकांचा पुढाकार ; प्रशासनाची उदासीनता 

प्रतिनिधी/ बेळगाव

अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर शिवसृष्टीचे उद्घाटन करण्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. याकरिता उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना महापौर संज्योत बांदेकर व आमदार संभाजी पाटील यांनी महापालिका आयुक्त शशीधर कुरेर व बुडा आयुक्त शकील अहमद यांना केल्या होत्या. मात्र, दोन्ही कर्तव्यदक्ष (?) अधिकाऱयांनी शिवसृष्टीच्या कामाबाबत कानावर हात ठेवले असल्याने नगरसेवकांनीच पुढाकार घेऊन रंगरंगोटीचे काम हाती घेतले आहे.   

छत्रपती शिवाजी उद्यानामध्ये बुडाच्यावतीने शिवसृष्टी उभारण्यात येत आहे. मात्र, चार वर्षे झाली तरी हे काम अद्याप अपूर्ण असल्याने शहरात संतापाची लाट पसरली आहे. अंतर्गत राजकारणात शिवसृष्टीचे काम पूर्ण करण्यास बुडाच्या अधिकाऱयांनी टाळाटाळ चालविली आहे. उद्यान निर्मितीसाठी शहराच्या उत्तर विभागातील नाले बुजवून कोटय़वधी निधी खर्च केल्याचा आरोप नागरिक करीत आहेत. अनेक ठिकाणी उद्यान निर्माण करण्यास बुडाने प्राधान्य दिले आहे. मात्र, शिवसृष्टीचे काम पूर्ण करण्याकडे कानाडोळा केला आहे. यामुळे शिवप्रेमींमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

गेल्या चार वर्षांपासून अर्धवट अवस्थेत असलेल्या शिवसृष्टीचे काम पूर्ण करून खुले करण्याची मागणी विविध संघटनांनी केली होती. पण याकडे बुडा प्रशासनाने दुर्लक्ष केले होते. यामुळे हा मुद्दा आमदार संभाजी पाटील व नगरसेवक पंढरी परब यांनी बुडाच्या बैठकीत उपस्थित करून अर्धवट काम पूर्ण करण्याची मागणी केली होती. तसेच बुडा आयुक्मत शकील अहमद यांच्या उपस्थितीत पाहणी केली होती. यावेळी महापालिकेकडून सहकार्याची अपेक्षा बुडा आयुक्तांनी व्यक्त केल्याने महापौर कक्षात बैठक आयोजित करून चर्चा केली होती. शिवसृष्टीचे काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याची तयारी आयुक्त शकील अहमद आणि महापालिका आयुक्त शशीधर कुरेर यांनी दर्शविली होती. यामुळे दि. 28 रोजी शिवसृष्टीचे उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. महिना होत आला तरी अद्याप कोणतेच काम बुडा व महापालिकेकडून हाती घेण्यात आले नाही. येथील संगीत कारंज्यांचे काम करण्यासाठी निविदा मागवून येथील अन्य कामांकडे बुडा आयुक्तांनी साफ दुर्लक्ष केले आहे. उद्यानाचे काम महापालिकेतर्फे करण्यात येईल, असे आयुक्त कुरेर यांनी सांगितले होते. त्याप्रमाणे आयुक्तांनी याबाबत कार्यकारी अभियंत्यांना संपर्क साधून उद्यानाचे काम करण्याची सूचना केली होती. पण अधिकारी जबाबदारी घेण्यास टाळाटाळ करीत आहेत. महिनाभराच्या कालावधीत कोणते काम महापालिका आणि बुडाच्या अधिकाऱयांनी केले नाही. परिणामी शिवसृष्टीचे उद्घाटन कसे होणार असा मुद्दा निर्माण झाला आहे.

महापौर व आमदारांच्या आदेशाला दोन्ही आयुक्तांनी हरताळ फासला आहे. यामुळे महापौर व आमदारांचा हा अपमान असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. अधिकाऱयांच्या बेजबाबदारपणामुळे शिवसृष्टीचे काम करण्यासाठी नगरसेवकांनीच पुढाकार घेतला आहे. उद्यानासभोवतीची स्वच्छता, रंगरंगोटी आदींसह काम करून घेण्यात येत आहे. येथील अडचणीची ठरलेली निलगिरीची झाडे तोडण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र, निखळलेल्या फरशा बसविण्याच्या कामाकडे बुडाच्या अभियंत्यांनी दुर्लक्ष केले आहे. पुतळय़ाच्या रंगरंगोटीकडे मूर्तिकाराने कानाडोळा केला आहे. उद्यानाच्या देखभालीची जबाबदारी कार्यकारी अभियंते डी. ए. हलगी आणि साहाय्यक पर्यावरण अभियंते उदयकुमार तळवार यांच्यावर आहे. पण या दोन्ही अधिकाऱयांनी ढुंकूनही पाहिले नाही. सदर शिवसृष्टीचे हस्तांतर बुडाकडे करण्यात आले असल्याने आपली जबाबदारी नसल्याचे सांगून दोन्ही अभियंत्यांनी हात झटकले आहेत. मात्र प्रत्यक्षात महापालिकेने शिवसृष्टी साकारण्यासाठी शिवाजी उद्यान रितसर हस्तांतर केले नसल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र हस्तांतराचा बागुलबुवा करून अधिकाऱयांनी काम करण्यास टाळाटाळ चालविली असून महापालिकेच्या अधिकाऱयांनी उद्यानाचा विकास करण्याबाबत दुजाभाव चालविला असल्याची तक्रार नागरिक करीत आहेत.

मुहूर्तावर उद्घाटन होऊ नये यासाठीच खटाटोप?

एकंदर ठरलेल्या मुहूर्तावर उद्घाटन होऊ नये, याकरिताच मनपा आणि बुडाच्या अधिकाऱयांनी काम पूर्ण करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. मात्र, कोणत्याही स्थितीत शिवसृष्टीचे उद्घाटन करण्यावर नगरसेवक ठाम आहेत. यामुळे सध्या स्वखर्चाने रंगरंगोटीचे काम सार्वजनिक बांधकाम स्थायी समिती अध्यक्ष विनायक गुंजटकर यांनी सुरू केले आहे. शिवसृष्टीच्या उद्घाटनासाठी केवळ दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. यामुळे याकरिता आता संघटनांनीच पुढे येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.

उद्या सायंकाळी 6 वाजता उद्घाटन करण्याचा निर्णय

शिवसृष्टीचे उर्वरित काम करून घेण्याबाबत प्रशासनाने उदासीनता दर्शविली आहे. मात्र, अशा अर्धवट अवस्थेत किती वर्षे शिवसृष्टी बंद ठेवणार, असा मुद्दा निर्माण झाला असल्याने उद्घाटन करण्यावर नगरसेवक ठाम आहेत. ठरल्याप्रमाणे शुक्रवार दि. 28 रोजी सायंकाळी 6 वाजता उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी प्रा. अनिल चौधरी यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.