|Saturday, August 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » फेणीला जागतिक दर्जा देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार

फेणीला जागतिक दर्जा देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार 

प्रतिनिधी /पणजी :

गोव्याची काजू आणि माडाच्या फेणीला जागतिक दर्जा देण्यासाठी गोवा सरकार प्रयत्न करणार असल्याची माहिती पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांनी दिली. येथे आयोजित ‘ग्रेफ एस्केप’ या वाईन महोत्सवाचे उद्घाटन करून ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी गोवा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल, पणजीचे आमदार सिद्धार्थ कुंकळेकर, महापौर सुरेंद्र फुर्तादो, मुख्य सचिव धर्मेद्र शर्मा, पोलीस महासंचालक डॉ. मुक्तेश चंद्र, पणजी पालिका आयुक्त दीपक देसाई आदी अधिकारी यावेळी उपस्थित होते.

सदर वाईन महोत्सवाची तारीख आधीच निश्चित केली जाईल व या महोत्सवाला जागतिक दर्जा देऊन विदेशी पर्यटकांना आमंत्रण दिले जाणार आहे. तसेच काजू व माडाच्या फेणीला जागतिक दर्जा दिला जाणार असल्याचे मंत्री आजगावकर यांनी सांगितले.

कांपाल येथे दयानंद बांदोडकर फुटबॉल मैदानावर सदर वाईन महोत्सवाचे आयोजन करण्यास राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे अधिकारणाने स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे या ठिकाणीच महोत्सव चालू राहिल, असे पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष नीलेश काब्राल यांनी सांगितले.

या ठिकाणी कुठल्याच प्रकारचे स्थायी बांधकाम करण्यात आलेले नाही. जो मंडप उभारण्यात आला आहे तो हंगामी स्वरुपाचा आहे. त्यामुळे त्याच्यासाठी मान्यता घेण्याची आवश्यकता नसल्याचे ते म्हणाले.

हरित लवादाने घेतली दखल

कांपाल मैदान सीआरझेड 2 क्षेत्रात येते व याठिकाणी सदर वाईन महोत्सव आयोजित केला जाणार नाही, असे राष्ट्रीय हरित लवादाला लेखी देऊनही परत त्याच ठिकाणी महोत्सव आयोजित केला जात असल्याचे राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे अधिकारणाने दखल घेतली आहे.

सीआरझेड 2 क्षेत्रात कुठलाही महोत्सव आयोजित करण्यासाठी परवानगीची आवश्यकता नाही. त्यामुळे पर्यटन विकास महामंडळाने लेखी दिलेल्या हमीचे उल्लंघन करण्याचा प्रश्नच येत नाही, असा मुद्दा सरकारी वकील फाविया मिस्किता यांनी मांडला.

या महोत्सवाला गोवा किनारी विभाग व्यवस्थापन प्राधिकारणाने दि. 19 एप्रिल रोजी मान्यता दिली होती व त्याच दिवशी मान्यता मागेही घेतली. जी.सी. झेड. एम. ए. ची नव्याने बैठक घेऊन परत योग्य निर्णय होईपर्यंत मान्यता मागे घेण्याच्या जी. सी. झेड. एम. ए. च्या आदेशाची अंमलबजावणी व्हावी, असे लवादाने सुचविले आहे.