|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » पंचायत प्रभाग पुनर्रचना अधिसूचना 3 मे रोजी

पंचायत प्रभाग पुनर्रचना अधिसूचना 3 मे रोजी 

प्रतिनिधी /पणजी :

येत्या 17 जून रोजी होणाऱया पंचायत निवडणुकीसाठी कोणत्याही राजकीय हस्तक्षेपाविना नैसर्गिक प्रक्रियेद्वारे प्रभागांची पुनर्रचना करण्यात आली असून दि. 3 मे रोजी या संदर्भातील अधिसूचना जारी करण्याचा इरादा पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांनी व्यक्त केला आहे. सर्व मावळत्या पंच सदस्यांची महत्त्वपूर्ण बैठक मंत्री माविन गुदिन्हो यांनी दि. 5 मे रोजी पणजीत बोलविली आहे.

राज्यात पंचायत निवडणुकीदरम्यान स्वच्छ वातावरण व्हावे या उद्देशाने आता पंचयतमंत्र्यांनी स्वत: पुढाकार घेतला आहे. त्या अनुषंगाने त्यांनी राज्यातील सर्व सरपंच आणि पंचांची महत्त्वपूर्ण बैठक घेण्याचे ठरविले असून 5 मे रोजी पणजीत इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात ही बैठक होईल. बैठकीत पंचायतमंत्री स्वत: सरपंच व पंचांबरोबर संवाद साधणार आहेत.

13 मे रोजी ‘गोवा स्वच्छता दिन’

पंचायतमंत्र्यांनी 13 मे हा स्वच्छता दिन निश्चित केला आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गोवाभर स्वच्छता दिन पाळला जाणार आहे. राज्यातील सर्व पंचांनी त्यादिवशी आपापल्या प्रभागात स्वत: उतरावे आणि आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन वा गावातील नागरिकांना घेऊन स्वच्छता अभियान आयोजित करावे. जनतेनेदेखील याकामी पंचाना वा सरपंचांना सहकार्य करावे, असे आवाहन पंचायत मंत्र्यांनी केले आहे. तसेच पंचांनी 13 मे रोजी केलेल्या कामांची नोंद सरकार दरबारी घेतली जाणार आहे. प्रत्येक पंचायतीमध्ये एक अधिकारी जाईल. पंचांनी केलेल्या स्वच्छता अभियानाची नोंद करून घेऊन ते आपला अहवाल पंचायत खात्याला सादर करतील.

राज्यातील पंचांची बैठक 5 रोजी

दि. 5 मे रोजी सकाळी 11 वा. इन्स्टिटय़ूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात होणाऱया बैठकीत एकंदरित स्वच्छ गोवा योजनेचा आढावा घेतला जाईल. शिवाय आगामी पंचायत निवडणूक स्वच्छ आणि उत्साही वातावरणात पार पडाव्यात या करिता पंचांबरोबर चर्चा केली जाणार आहे. शिवाय त्यांच्या सूचनांचाही विचार करण्याचे मंत्री गुदिन्हो यांनी ठरविले आहे. पंचायत निवडणुका या मोकळय़ा वातावरणात व्हाव्यात, असे ते म्हणाले.