|Monday, June 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » अखेर शिवापूरवाडी धरणे आंदोलन मागे

अखेर शिवापूरवाडी धरणे आंदोलन मागे 

कुन्नूर :

शिवापूरवाडी फाटय़ावर असलेले संगम वाईन्स ताबडतोब बंद करावे. या मागणीसाठी गेले पाच दिवस सुरु असलेले आंदोलन शनिवारी मागे घेण्यात आले.

चिकोडीचे प्रभारी तहसीलदार संजू कांबळे, उपतहसीलदार प्रकाश शिरीवंत, महसूल निरीक्षक आर. आय. नाईक व अबकारी खात्याचे साहाय्यक फौजदार महांतेश बडगेर यांच्या मध्यस्थीनंतर 30 जूनपर्यंत हे दुकान बंद करु वा अन्यत्र हलविण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱयांच्या विनंतीला मान देऊन आंदोलन मागे घेत असल्याचे आंदोलकांतर्फे रावसाहेब खोत यांनी सांगितले.

येथील शिवापूरवाडी फाटय़ावर गेल्या आठ-नऊ वर्षापासून संगम वाईन्स हे विदेशी दारुचे दुकान सुरु आहे. हे दुकान सुरु झाल्यापासून शिवापूरवाडी येथील अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. त्याशिवाय तरुणही व्यसनात गुरफटल्यामुळे सर्व तरुण पिढीच बरबाद होत चालली आहे. त्याकरीता हे दुकान ताबडतोब बंद करावे. या मागणीसाठी मंगळवारपासून हे धरणे आंदोलन सुरु होते. याठिकाणी विविध प्रशासकीय अधिकारी तसेच लोकप्रतिनिधींनी भेट देऊन यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. पण दुकान बंद करण्याच्या मागणीवर आंदोलक ठाम होते.

यानंतर शनिवारी अबकारी खात्यातर्फे सदर दुकान 30 जूनपूर्वी अन्यत्र हलविण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या आंदोलनात कपिल कमते, संजय पाटील, सुलोचना किल्लेदार, सरीता जोमा, विमल कूट, लक्ष्मी जोमा, कमल खोत, सुवर्णा खोत, किरण खोत, रावसाहेब खोत, विमल कांबळे, जयश्री खोत, आनंदा जोमा, राजू मळगे, शोभा खोत यांनी भाग घेतला.