|Friday, October 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » कृत्रिम हात-पाय प्रत्यारोपण उपक्रमाची समाजास नितांत गरज – जयंत पाटील

कृत्रिम हात-पाय प्रत्यारोपण उपक्रमाची समाजास नितांत गरज – जयंत पाटील 

प्रतिनिधी / इस्लामपूर

मला हात नाही, पाय नाही, या भावनेने जीवनातील उभारी हरविलेल्या असंख्य अपंगांच्यावर कृत्रिम हात-पाय प्रत्यारोपण करुन आम्ही त्यांच्या जीवनात नवी उभारी आणू शकलो, याचे आम्हा सर्वांना मोठे समाधान आहे, अशी भावना माजी मंत्री आ.जयंत पाटील यांनी इस्लामपूर येथील आरोग्य शिबीरात व्यक्त केली. तसेच कृत्रिम हात-पाय प्रत्यारोपण उपक्रमाची समाजास नितांत गरज असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. लोकनेते राजारामबापू पाटील स्मृती आरोग्य कार्यक्रमांतर्गत हे शिबीर घेण्यात आले.

येथील श्रीमती कुसूमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालयात राजारामबापू इडोंमेंट ट्रस्ट, साधू वासवाणी ट्रस्ट पुणे तसेच रोटरी कल्ब ऑफ विश्रामबाग व इंचलकरंजी टेक्सटाईल सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मोफत कृत्रिम हात-पाय प्रत्योरोपण शिबीर’ आयोजित केले होते. या शिबीरात 87 अपंगांना आ.पाटील यांच्या हस्ते कृत्रिम हात-पाय वितरण करण्यात आले. प्रांरभी लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन करण्यात आले. गेल्या महिन्यात हे शिबीर घेवून अपंगांच्या हात-पायाची मापे घेतली होती. आजच्या शिबीरात या कृत्रिम हात-पायाचे प्रत्यारोपण करुन ते कसे वापरायचे? याचे मार्गदर्शनही करण्यात आले.

आ.पाटील म्हणाले, आमच्या परिसरात हात-पाय प्रत्यारोपण शिबीर प्रथमच होत आहे. हा उपक्रम राबविणाऱया तिन्ही संस्थांना धन्यवाद देतो. या शिबीरात विजापूर जिह्यातील रामदुर्गपासून सिंधूदुर्ग जिह्यातील गावापर्यंत, तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर जिह्यातून अपंग सहभागी झाले आहेत. खरेच या उपक्रमाची समाजास नितांत गरज आहे. अपंगांना दिलेले कृत्रिम हात-पाय हलके व उत्तम दर्जाचे आहेत. राजारामबापूंच्या स्मरणार्थ गेल्या 30 वर्षात राबविलेल्या आरोग्य शिबीरात दरवर्षी साधारण 40 ते 50 हजार रुग्णांना विविध लाभ दिले आहेत.

स्वागत व प्रास्ताविकात रोटरी क्लब ऑफ विश्रामबागचे असिस्टंट गर्व्हनर अमित पाटील यांनी उपक्रमाबद्दल समाधन व्यक्त केले. यावेळी साधू वासवाणी ट्रस्टचे डॉ.सलिल जैन, मिलिंद जाधव, सोनटक्के, डॉ.राहूल सरोज, रोटरी क्लबचे एस.एन.अग्रवाल, रवि आडूकिया, सतिश राठी, सुरेंद्र मंगलाणी, सुरेश सिंघानिया, अश्विनी लांबा, तसेच राजारामबापू ज्ञानप्रबोधिनीचे कार्यवाह प्रा. शामराव पाटील, कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आर.डी.सावंत, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे नगरसेवक दिग्विजय सुर्यवंशी, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय पाटील, प्राचार्य डॉ.राजेंद्र कुरळपकर यांच्यासह अपंग व त्यांचे नातेवाईक उपस्थित होते. राजारामबापू सह.साखर कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश महाळुंगकर यांनी आभार मानले.

Related posts: