|Saturday, October 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » वाहतूक कोंडी, अपघातांमुळे महामार्ग ठप्प!

वाहतूक कोंडी, अपघातांमुळे महामार्ग ठप्प! 

प्रतिनिधी/ खेड

मुंबई-गोवा महामार्गावरील माणगाव येथे रविवारी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास झालेल्या वाहतूक कोंडीचा फटका प्रवाशांना बसला. महामार्गावर तब्बल 5 ते 6 कि. मी. अंतरावर लागलेल्या वाहनांच्या लांबच लांब रांगांमुळे सुट्टीच्या दिवशीच प्रवाशांचा चांगलाच खोळंबा झाला. कशेडी घाटात ऍसिडवाहू टॅंकर उलटला तसेच बावनदी पुलावर डंपर-ट्रकची ठोकर झाल्याने वाहतूक कोंडी झाली. तर खेड-दापोली मार्गावर डांबर वाहतुकीचा टॅंकर उलटल्याने पोलीस यंत्रणेची अक्षरश: धावपळ उडाली.

उन्हाळी सुट्टीच्या हंगामामुळे महामार्ग वाहनांच्या रहदारीने पुरता गजबजला आहे. त्यातच सलग सुट्टय़ांमुळे वाहनांची वर्दळ कमालीची वाढली आहे. मात्र, महामार्गावर ठिकठिकाणी होत असलेल्या अपघातांमुळे प्रवाशांना मनस्तापालाच समोर जावे लागत आहे. रविवारीही महामार्गावर वाहतुकीचा पुरता खोळंबा झाल्याने रणरणत्या उन्हात प्रवाशांची वाताहतच झाली. माणगाव येथील अरूंद रस्त्यामुळे वाहतुकीची कोंडी होवून महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.

सुट्टीच्या हंगामामुळे वाहनांची रहदारी वाढल्यामुळे वाहतुकीच्या कोंडीत आणखीनच भर पडली. महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढलेली असतानाही वाहतूक पोलिसांकडून ठोस उपाययोजनांचा अवलंब न केल्यामुळे असंख्य प्रवाशांना वाहतूक कोंडीला समोर जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर माणगाव येथील अरूंद रस्त्यामुळे रविवारी दोन्ही बाजूला 5 ते 6 कि.मी. अंतरापर्यंत वाहनांच्या रांगाच लागल्या. ही वाहतूक कोंडी फोडताना वाहतूक पोलिसांना अक्षरशः कसरतच करावी लागली. तब्बल अडीच तासानंतर वाहतुकीची कोंडी फोडण्यात पोलिसांना यश आले. विस्कळीत वाहतूक पूर्ववत होताच रणरणत्या उन्हात अडकलेल्या प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

 कशेडी घाटात सुदैवाने टळला अनर्थ

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात रविवारी पहाटे 4 वा.च्या सुमारास ऍसिडवाहू टँकर उलटून झालेल्या अपघातामुळे वाहतूक ठप्प झाली होती. या अपघाताची खबर मिळताच कशेडी येथील वाहतूक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने या अपघातामुळे अनर्थ टळला. अपघाताची खबर हरी पांडे (रा. बिहार) याने येथील पोलीस स्थानकात दिली. ब्रेक निकामी झाल्यामुळे टँकर उलटल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी अधिक तपास येथील पोलीस करत आहेत.

तब्बल 4 तास वाहतूक ठप्प

खेड-दापोली मार्गावरील फुरूस-भुवनेश्वरवाडीनजीक रविवारी सकाळी 11.30 वा. च्या सुमारास डांबर वाहतुकीचा टँकर उलटल्याने तब्बल 4 तास वाहतूक ठप्प झाली. मुख्य मार्गावरच सर्वत्र डांबर पसरल्याने दोन्ही बाजूकडून धावणाऱया वाहनांना ब्रेक लागला.

अब्दुल मुस्तफी (रा. उत्तरप्रदेश) हा टँकर घेवून दापोलीच्या दिशेकडून खेडकडे येत असताना ब्रेक निकामी झाल्याने टँकर उलटला. या टँकरमधील डांबर रस्त्यावर इतरस्त्र पसरल्याने वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला. तब्बल 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर रस्त्यावर पसरलेली डांबर व अपघातग्रस्त टँकर बाजूला करण्यात यश आले. या बाबतची खबर मिळताच येथील पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विस्कळीत वाहतूक पूर्वपदावर आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या अपघातामुळे दोन्ही बाजूला असंख्य वाहने रस्त्यातच अडकल्याने प्रवाशांचे हाल झाले. या प्रकरणी येथील पोलीस स्थानकात टँकर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला.

संगमेश्वरात महामार्गावर रांगाच-रांगा

संगमेश्वर वार्ताहराने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असून अपघातप्रवणक्षेत्रात बावनदी पुलाजवळ झालेल्या ट्रक व डंपर अपघातामुळे महामार्गाची वाहतूक 1 तास ठप्प झाली होती. रविवारी दुपारच्या दरम्यान झालेल्या अपघातामुळे वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.

बावनदी पुलाजवळील अरुंद जागेत डंपर व ट्रकची जोरदार धडक बसल्याने वाहतूक कोंडी झाली होती. दुपारच्या दरम्यान झालेल्या या अपघातामुळे वाहतूक कोंडीत मोठय़ा प्रमाणात झाली होती. रत्नागिरीहून मुंबईच्या दिशेने जाणारा डंपर व रत्नागिरीच्या दिशेने जाणारा ट्रक एकमेकांवर आदळल्याने वाहतूक कोंडीसह गाडय़ांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे.

Related posts: