|Friday, March 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जिल्हा बँकेकडे कारखाना कर्ज प्रस्तावासाठी अर्जच नाहीत!

जिल्हा बँकेकडे कारखाना कर्ज प्रस्तावासाठी अर्जच नाहीत! 

कणकवली

साखर कारखान्यासाठीच्या कर्जाबाबत चर्चा करण्यासाठी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत यांना मी आठ दिवसांपूर्वी फोन करून भेट मागितली. त्यानुसार मी व आमच्या नियोजित साखर कारखान्याच्या संचालकांनी सावंत यांची शनिवारी ओरोस येथील जिल्हा बँकेत भेट घेतली. यावेळी कारखान्यासाठीचा मूळ प्रस्ताव 150 कोटीचा असून सल्फर फ्री साखरेसाठी आणखी 30-40 कोटींची आवश्यकता असल्याचे सांगतानाच कर्जासाठी आवश्यक त्या कागदपत्रांबाबत विचारणा केली. त्यावर, आम्ही आजतागायत कारखान्यासाठी असे कर्ज दिलेले नसून तसे कर्ज देण्यासाठीचे अर्जच आमच्याकडे नसल्याचे उत्तर सतीश सावंत यांनी दिले. त्यामुळे आमचा कर्जासाठीचा प्रस्ताव सादरच झाला नसल्याचा दावा माजी आमदार विजय सावंत यांनी केला.

येथील हॉटेल रॉयल सिटी इन येथे आयोजित पत्रकार परिषदेत सावंत बोलत होते. यावेळी मधुकर सावंत, संजय राणे उपस्थित होते. सावंत म्हणाले, सतीश सावंत यांनी, रितसर अर्ज केल्यास जिल्हा बँक कर्ज देण्यास तयार असल्याचे सांगितले होते. त्यानुसारच आम्ही त्यांची भेट घेतली व आवश्यक कर्जाबाबत तोंडी स्वरुपात माहिती दिली. त्यावर सावंत यांनी, आम्ही असे कारखान्याला कर्ज दिलेले नाही. आम्ही शिखर बँकेकडून अर्ज मागवून घेऊ. त्यात ‘करेक्शन’ करून अर्जाची प्रत तुम्हाला पाठवून देऊ. तत्पूर्वी, प्रकल्प अहवाल सादर करा. नाबार्डने हो म्हटले, तर आम्ही कर्ज देऊ. तसेच जिल्हा बँक 35 कोटीपर्यंतच कर्ज देऊ शकते. उर्वरित कर्जाबाबत आम्ही शिखर बँकेशी बोलू, असे आम्हाला सांगिल्याचे सावंत म्हणाले.

प्रस्ताव नाबार्ड, शिखर बँकेकडे पाठविणार

सावंत म्हणाले, सतीश सावंत यांनी प्रकल्प अहवाल नाबार्डकडे पाठविण्यापेक्षा आम्ही स्वत: नाबार्डकडे पाठवू. नाबार्डने ‘ओके’ म्हटल्यास प्रकल्प अहवाल शिखर बँकेकडेही पाठवू. शिखर बँक कर्ज देण्यास तयार असेल, तर जिल्हा बँकेकडे जाण्याची काय गरज? वसंतदादा शुगर इन्स्टिटय़ूटचे आम्ही सदस्य आहोत. त्यांच्याकडून प्रकल्प अहवाल दुरुस्त करून घेणार आहोत, असेही सावंत म्हणाले.

जिल्हा बँकेने कर्ज दिल्यास घ्यायला तयार!

जिल्हा बँकेने कर्ज दिले, तर आम्ही घ्यायला तयारच आहोत. पण त्यांनी आवश्यक पुढील कर्जाची जोडणी करून द्यायला हवी. अर्थात जिल्हा बँकेने ‘लिड बँक’ म्हणून काम करायला हवे. फक्त बोलाचा भात व बोलाची कडी नको, असेही सावंत म्हणाले. तर जिल्हा बँकेने दिलेल्या कर्जाची पूर्ण हमी आपण घेणार असून कारखान्याची संपूर्ण मशिनरी तसेच आणखी 150 कोटीची मालमत्ता जिल्हा बँकेत तारण म्हणून ठेवण्यास तयार असल्याचेही सावंत म्हणाले.

राणे व्हेंचरने केस लढवूनच दाखवावी!

राणे व्हेंचरने आमच्या कारखान्याबाबत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. मात्र, राणे व्हेंचरकडून केस लढविण्यापेक्षा पुढील तारखा मागितल्या जात आहेत. याबाबतच्या सुनावणीची 27 एप्रिललाही तारीख होती. मात्र, त्यांच्याकडून पुन्हा एकदा पुढील तारीख वाढवून घेतली गेली. त्यांनी केस लढवावीच. कारण विजय आमचाच आहे, असा विश्वासही सावंत यांनी व्यक्त केला.

Related posts: