|Monday, December 17, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » शहापूर विभाग शिवजयंती चित्ररथ मिरवणूक उत्साहात

शहापूर विभाग शिवजयंती चित्ररथ मिरवणूक उत्साहात 

प्रतिनिधी/ बेळगाव

बेळगाव शहराप्रमाणेच शहापूर व परिसरातील (भारतनगर-वडगाव) चित्ररथ मिरवणुकीची वैभवशाली परंपरा यंदाही जपण्यात आली. शिवरायांच्या जीवन कार्यावर आधारित चित्ररथांद्वारे शौर्यगाथा साक्षात अवतरण्यात आली. हजारो शिवप्रेमींच्या उपस्थितीत शहापूरची शिवजयंती चित्ररथ मिरवणूक उत्साहात पार पडली. शहापूर येथील विविध परिसरात देखावे सादर करत ही चित्ररथ मिरवणूक बेळगावच्या मुख्य चित्ररथ मिरवणुकीत सहभागी झाली.

लोकमान्य सामाजिक आणि सांस्कृतिक केंद्राच्यावतीने बँक ऑफ इंडिया कॉर्नर शहापूर येथे या चित्ररथ मिरवणुकीचे स्वागत करण्यात आले. तर मध्यवर्ती शिवजयंती उत्सव महामंडळ शहापूरतर्फे नाथ पै सर्कल येथे चित्ररथ मिरवणूक देखावा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. आमदार संभाजी पाटील, महापौर संज्योत बांदेकर, उपमहापौर नागेश मंडोळकर, कोल्हापूर येथील सखल मराठा संघाचे नेते दिलीप पाटील आदींच्या हस्ते शिवरायांच्या पुतळय़ाचे पूजन करण्यात आले. तसेच शिवाजी चौक-विष्णू गल्ली, वडगाव येथील चित्ररथाचे पूजन करून शहापूर येथील चित्ररथ मिरवणुकीचे उद्घाटन पार पडले.

याप्रसंगी शिवप्रति÷ानचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे, लोकमान्य सोसायटीचे संचालक अजित गरगट्टी, पंढरी परब, गजानन धामणेकर, माजी महापौर मालोजी अष्टेकर, नागेश सातेरी, नगरसेवक मोहन बेळगुंदकर, शहर म. ए. समितीचे उपाध्यक्ष टी. के. पाटील, लोकमान्यचे समन्वयक विनायक जाधव, तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर, अशोक चिंडक, अनंत लाड, नगरसेवक राजेंद्र बिर्जे, शिवाजी कुडुचकर आदी उपस्थित होते. महामंडळाचे अध्यक्ष नेताजी जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. महादेव पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

बेळगावची शिवजयंती राष्ट्रीय उत्सवच

‘लोकमान्य’च्या माध्यमातून शिवजयंती चित्ररथ मिरवणुकीत शिस्त व भव्यता आल्याचे यावेळी सांगण्यात आले. लोकमान्यच्यावतीने 21 लाखांची रोख बक्षिसे देण्यात आली आहेत. बेळगावातील हा शिवजयंती उत्सव राष्ट्रीय उत्सवच बनला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. महापौर संज्योत बांदेकर यांनी ही मिरवणूक यशस्वी आणि शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले.

चित्तथरारक कसरती सादर

_DSC0018

शहापूर व परिसरातील अनेक शिवजयंती उत्सव मंडळांनी चित्ररथ मिरवणुकीत सहभाग घेतला होता. अनेक चित्तथरारक कसरती, लेझीम, करेला, झांजपथक, ढोलपथक, भगवे ध्वज आणि पारंपरिक वेशभूषेत सहभागी झालेले शिवप्रेमी यामुळे संपूर्ण शहापूर परिसर रविवारी अवघा शिवमय बनला होता. कोरे गल्ली, शहापूर येथील सार्वजनिक श्री शिवजयंती उत्सव मंडळाच्यावतीने यंदा स्वराज्याची संकल्पना हा देखावा सादर केला. तोरणागड जिंकताना शिवाजी महाराज व मावळय़ांनी दाखविलेले शौर्य या चित्ररथातून सादर करण्यात आले. कचेरी गल्ली शहापूरच्या शिवसम्राट युवक मंडळाने मराठय़ांच्या शौर्याला दाद देणारे वेडात मराठे वीर दौडले सात हा देखावा उत्कृष्टरित्या सादर केला. चित्ररथासमोर कार्यकर्त्यांनी मलखांब, लाठीमेळा आदींचे सादरीकरण केले.

शिवरायांच्या काळात महिलांना मिळणारा आदर, सन्मान आणि आताच्या जगातील स्त्रियांवर होणारे अत्याचार, बलात्कार यावर आधारित देखावा श्री महागणपती युवक मंडळ, लक्ष्मी रोड, नाथ पै सर्कल शहापूर या मंडळाने जीवंत केला. तर बसवाण गल्ली-शहापूरच्या मंडळाने शिवरायांचा जन्मसोहळा, लग्नसोहळा आणि गोंधळाचा देखावा सादर केला. मराठी असल्याचा अभिमान सांगणारा ‘आम्ही मराठी असल्याचा अभिमान बाळगा’ हा देखावा शिवनेरी युवक मंडळ रघुनाथ पेठ, अनगोळतर्फे सादर करण्यात आला. पवार गल्ली-शहापूरच्या ओंकार मित्रमंडळाने दिल्ली दरबारातील औरंगजेबाची खिल्लत ठोकरताना शिवाजी महाराजांनी दाखविलेल्या शौर्याचा देखावा जीवंत केला. गाडेमार्ग बिच्चू गल्ली येथील छत्रपती संभाजी युवक मंडळानेही खास देखावा सादर केला होता. स्वराज्याचा श्रीगणेशा करण्यासाठी सोन्याचा नांगर फिरविण्याचा देखावा सार्वजनिक शिवजयंती उत्सव मंडळ, होसूर बसवाण गल्लीने सादर केला.

पन्हाळगडावरील शिवाकाशिदची कैद आणि त्याची हत्या हा देखावा हट्टीहोळ गल्ली-शहापूरच्या मंडळाने सादर केला. आनंदवाडी येथील मंडळाने रायरीचा झाला रायगड हा देखावा सादर केला. शिवकालीन आणि सध्याच्या इतिहासावर प्रकाश टाकणारा भारतनगर-पहिली गल्ली येथील शिवजयंती मंडळाचा देखावा लक्षवेधी ठरला. विष्णू गल्ली, वडगाव येथील छत्रपती शिवाजी व्यायाम शाळा मंडळाने संभाजी महाराज जन्मसोहळा ते संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळय़ाचा पूर्ण इतिहास चित्ररथाद्वारे मांडला. शिवज्योत प्रति÷ान गाडेमार्ग शहापूरने यंदा मावळय़ांचा गोंधळ हा देखावा जीवंत केला.

Related posts: