|Thursday, August 22, 2019
You are here: Home » उद्योग » 2025 पर्यंत देशात 40 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक

2025 पर्यंत देशात 40 अब्ज डॉलर्सची विदेशी गुंतवणूक 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 

विदेशी गुंतवणूकदारांना भारतीय बाजारपेठ आकर्षित करत आहे. 2025 पर्यंत हा प्रभाव कायम राहिल्यास 40 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक देशात करण्यात येईल असे अमेरिकेतील संस्थेने म्हटले आहे. न्यूयॉर्क येथे कार्यालय असणाऱया सीआयआयएन ही संघटना गुंतवणुकीस प्रोत्साहन देण्याचे काम करते. या संघटनेचे सध्या 230 सदस्य आहेत.

गुंतवणूकदार साधारण राजकीय परिस्थिती स्थिर असणाऱया आणि चांगला परतावा देणाऱया अर्थव्यवस्थेकडे आकर्षित होतात. गेल्या पाच वर्षात देशात गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्यासाठी योग्य वातावरण निर्मिती झाली आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे लक्ष भारताकडे वळत आहे. दक्षिण आशियामध्ये भारत ही एक सध्या वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे. पुढील पाच ते सात वर्षांसाठी भारतीय अर्थव्यवस्था आपला विकासाचा वेग कायम ठेवण्याचा प्रयत्न करेल असे संघटनेने म्हटले आहे.

गेल्या पाच वर्षातील समाधानकारक कामगिरीच्या कालावधीत देशात साधारण 4 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात आली. प्रतिवर्षी साधारण 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येत आहे. सध्या भारतात गरिबीचे प्रमाण अधिक आहे. ही गरिबी दूर करण्यासाठी सध्याचे सरकार प्रयत्नशील आहे. नागरिकांच्या पायाभूत सुविधा पुरविण्यात आल्यास गुंतवणूकदारांना पुरक अशा वातावरणाची निर्मिती होईल. देशातील सकारात्मक वातावरणामुळे गुंतवणुकीत 25 टक्क्यांनी दरवर्षी वाढ होईल आणि 2025 पर्यंत 35 ते 40 अब्ज डॉलर्सपर्यंत गुंतवणुकीचा आकडा पोहोचेल असा आपला विश्वास आहे, असे संघटनेच्या आशियातील विभागाचे सल्लागार अनिल सिन्हा यांनी म्हटले.