|Saturday, March 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » देशातील दुसऱया क्रमांकाच्या उंच ध्वजाचे अनावरण

देशातील दुसऱया क्रमांकाच्या उंच ध्वजाचे अनावरण 

कोल्हापूरने दिली महाराष्ट्राला नवी ओळख  : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्गार: अभिनेता अक्षयकुमारची उपस्थिती

प्रतिनिधी/ कोल्हापूर

देशातील दुसऱया क्रमांकाचा सर्वात उंच राष्ट्रध्वज कोल्हापूरमध्ये उभारण्यात आला आहे.  हा ध्वज इथे येणाऱया पर्यटकांच्या मनामध्ये ऊर्जा निर्माण करेल. त्यांच्यामध्ये असणाऱया देशभक्तीची जाणीव त्यांना इथे होईल. आज कोल्हापूरने महाराष्ट्राला एक नवी ओळख दिली आहे. असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. सोमवारी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून फडणवीस यांच्या हस्ते पोलीस उद्यानाचे लोकार्पण करण्यात आले. या उद्यानामध्ये 303 फूट उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्यात आला आहे.

कोल्हापूर येथील पोलीस उद्यान ‘केएसबीपी’ या संस्थेने केले आहे. उद्यानामध्ये देशातील दुसऱया क्रमांकाचा सर्वाधिक उंचीचा राष्ट्रध्वज उभारण्यात आला असून, त्याची उंची तब्बल 303 फूट इतकी आहे. सोमवारी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून या उद्यानाचे लोकार्पण आणि राष्ट्रध्वजाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. प्रसिद्ध अभिनेता अक्षयकुमार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा उद्घाटन सोहळा पार पडला.

ते म्हणाले, ‘अंबाबाईच्या दर्शनाला देशभरातून भाविक कोल्हापुरात येतील. यावेळी लांबवरून डौलाने फडकणारा राष्ट्रध्वज त्यांना दिसेल. त्यावेळी त्यांच्या शरीरामध्ये एक प्रकारची ऊर्जा निर्माण होईल. त्यांच्या मनामध्ये असणाऱया देशभक्तीच्या भावनेची त्यांना जाणीव होईल. या उद्यानामध्ये आल्यावर त्यांना स्वातंत्र्य लढय़ातील हुतात्म्यांचे स्मरण होईल. देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे आंदोलन उभे राहिले त्यांची त्यांना माहिती मिळेल. स्वाभाविकपणे त्यांच्या मनामध्ये असणारा देशाभिमान जागृत होईल. या उद्यानाच्या रुपाने महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने कोल्हापूरने महाराष्ट्राला एक नवी ओळख दिली आहे.’

महात्मा फुले जन आरोग्य योजना

पोलीस दलाच्या कार्याचा गौरव करत फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र पोलीस दल हे कार्यक्षम आणि तत्पर आहे. पोलीस दलाने मनात आणल्यावर अपराध सिद्धतेचा टक्का 58 टक्क्यांवर गेला. महाराष्ट्रात पहिल्यांदाच अपराध सिद्धतेचे प्रमाण इतक्या पटींनी वाढले आहे. पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडवण्यासाठीही सरकार कटिबद्ध असून येत्या वर्षभरात राज्यात सर्वत्र पोलिसांच्या नव्या वसाहती बांधण्यात येणार आहेत. सहाय्यक फौजदार पासून खाली असणाऱया सर्व पोलीस कर्मचाऱयांना निवृत्त झाल्यानंतर चांगली आरोग्य सेवा मिळावी यासाठी ‘महात्मा फुले जन आरोग्य योजना’ बनवण्यात आली आहे. यामध्ये बाराशे आजारांचा समावेश करण्यात आला असून निवृत्त कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराचे सर्व उपचार मोफत होणार आहेत

अक्षयकुमार खरा हिरो

प्रसिद्ध अभिनेता अक्षयकुमार यांच्याबद्दल फडणवीस म्हणाले, गेल्या वर्षी मे महिन्यामध्ये महाराष्ट्रात दुष्काळजन्य स्थिती निर्माण झाली होती. यावेळी राज्य सरकारने जलयुक्त शिवार ही योजना दुष्काळजन्य भागात राबवण्यास सुरुवात केली होती. दरम्यान एके दिवशी सकाळी अक्षयकुमार यांचा मला फोन आला. महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणासाठी मी काय करू शकतो असे त्यांनी मला विचारले. मी कार्यक्रम करण्याची कल्पना मांडली पण ते म्हणाले, कार्यक्रमातून माझी प्रसिद्धी होईल त्यामुळे कार्यक्रम नको. दुसऱया दिवशी सकाळी ते माझ्या घरी आले आणि त्यांनी 50 लाखांचा धनादेश माझ्या स्वाधीन केला. पडद्यावर भूमिका करणारे अनेक हिरो असतात. मात्र जीवनामध्ये आपल्या कार्यातूनही हिरो ठरणाऱया व्यक्ती विरळच असतात. अक्षयकुमार हे यातीलच एक आहेत. असे मुख्यमंत्री म्हणाले.

पोलीस उद्यान ठरणार पर्यटकांचे आकर्षण

यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, छत्रपती शाहु महाराजांच्यानंतर या शहरामध्ये लक्षात राहतील अशा वास्तू कोणी बांधल्या नाहीत. या उद्यानाच्या माध्यमातून कोल्हापुरला एक नवी ओळख प्राप्त झाली आहे. अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेला भाविक जर कोल्हापुरात एखादा दिवस रेंगाळला तरच इथे पर्यटनाचा विकास होऊ शकतो. आता देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांना पहाण्यासारखे आणखी एक ठिकाण या उद्यानामुळे उपलब्ध झाले आहे. पुढील तीन महीने उद्यानामध्ये सर्वांना मोफत प्रवेश असेल. त्यानंतर 10 रुपये तिकीट आकारणी केली जाईल. तिकीट विक्रीतून जी रक्कम उभी राहील ती पोलीस कल्याणा निधीसाठी दिली जाईल.

पोलीस महासंचालक सतीश माथूर म्हणाले, ‘मी 1984 साली कोल्हापुरात प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून आलो होते. मराठी भाषा मी इथेच शिकलो. त्यामुळे माझे मराठी राकट आहे. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे कोल्हापुरात पोलिसांसाठी 1 हजार 339 घरांच्या उभारणीला लवकरच प्रारंभ होणार आहे. पोलिसांसाठी आरोग्य योजनाही सुरू झाली आहे. राज्यातील पोलिसांच्या पाल्यांसाठी 25 हजार रूपयांची शिष्यवृत्ती, 50 हजार रूपयांचे शैक्षणिक कर्ज दिले जात आहे.’

प्रास्ताविकात विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील म्हणाले, पोलीस गार्डनमध्ये आज देशातील सर्वाधिक उंचीचा दुसऱया क्रमांकाचा राष्ट्रध्वज उभारला आहे. आता दुसऱया टप्प्यात ट्रेनिंग पार्क, शस्त्रास्रे पार्क, आदी उभारण्याचा मानस आहे. या माध्यमातून पोलीस हे खऱया अर्थाने शिवबाचे मावळे आहोत, याचा आदर्श घालून दिला असल्याचे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राने केला पंजाबी माणसाचा सन्मान

प्रसिद्ध अभिनेचे अक्षयकुमार यांच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाची रंगत वाढली. अक्षयकुमार यांनी मराठी मध्ये भाषणाची सुरुवात करून उपस्थितांची मने जिकंली. ते म्हणाले, मी पंजाबी आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या बाजूला बसण्याचा मान मला तुम्ही सर्वांनी दिला. माझ्यासाठी हा अत्यंत सन्मानाचा आणि अभिमानाचा क्षण आहे. मी कोल्हापुरला पहिल्यांदाच आलो. हे अतिशय चांगले शहर आहे. या उंच राष्ट्रध्वजामुळे येथे पर्यटकांची संख्याही वाढेल. राज्यातील प्रत्येक पोलीस उद्यानामध्ये अशा प्रकारचा उंच राष्ट्रध्वज उभारला पाहीजे. आम्ही भारत के वीर जवान ऍप सुरु केले आहे. यामध्यमातून जवानांच्या कुटुंबियांसाठी मदत दिली जाणार आहे.

Related posts: