|Thursday, January 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » अत्याधुनिक सामूहिक शेतीची कास धरा!

अत्याधुनिक सामूहिक शेतीची कास धरा! 

किरण ठाकुर यांचे आवाहन

प्रतिनिधी/ दोडामार्ग

रोजगार निर्मितीत पर्यटन व्यवसायाचा जगात दुसरा नंबर लागत आहे. याठिकाणच्या बागबागायती व निसर्गसौंदर्य पाहण्यास जगभरातील पर्यटक येऊ शकतात. या निसर्गसौंदर्याला मायनिंगचा स्पर्श करू न देता अत्याधुनिक सामूहिक शेतीची कास धरा, असे प्रतिपादन ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख व सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी झोळंबेतील सांस्कृतिक सभागृहाच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षीय भाषणात केले.

यावेळी उद्घाटक खासदार विनायक राऊत यांनी या भागात मायनिंग प्रकल्पाचे प्रयत्न हाणून पाडण्याचे अभिवचन देत शेतीलाच प्राधान्य देणार असल्याचे सांगितले.

यावेळी ठाकुर पुढे म्हणाले, कोकणी माणूस स्वच्छतेला प्राधान्य देणारा असा आहे. तसाच तो येणाऱया प्रत्येकाशी अगत्याने वागतो. या ठिकाणचा निसर्ग जोपासण्याची मौखिक कामगिरीही त्याने चोख बजावल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जगात पर्यटन हा प्रमुख व्यवसाय असून ब्रिटनसारख्या देशाची अर्थव्यवस्था त्यावर अवलंबून आहे. आता आपल्या शेजारील श्रीलंकासारखाही देश या क्षेत्रात मोठी झेप घेत असून आपणही त्यात उतरले पाहिजे. आपली मानसिकता बदलून येणाऱया पर्यटकांचे स्वागत करण्याची भूमिका ठेवल्यास दोडामार्ग तालुकाही पर्यटन क्षेत्रात पुढे जाणार आहे.

मायनिंगच्या संकटाबाबत बोलताना त्यांनी त्यातून शासनाला जरी काही
प्रमाणात महसूल मिळत असला तरी या ठिकाणचा पिढीजात व्यवसाय व पर्यावरण नष्ट होते त्याचे काय? असा सवाल करत लोकांना मायनिंगला थारा देऊ नये. आपल्या जमिनी विकण्यापेक्षा त्यात सामूहिक शेती आधुनिक पद्धतीचा वापर करून करावी. निसर्गाचे वरदान व सौरऊर्जेचा वापर केल्यास त्यातून आर्थिक ताकद निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. आपण केवळ राजकारणावर चर्चा करून वेळ घालविण्यापेक्षा राज्यकर्त्यांना आपल्यावर लक्ष देण्यास भाग पाडा, असे आवाहनही त्यांनी केले.

मायनिंग प्रकल्पाला ठाम विरोध – विनायक राऊत

कोकणी माणसाने नेहमी इतरावर प्रेम केले असून जर कोणी त्यांचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला तर त्याला त्याने कधीही सोडले नाही. या भागावर जे मायनिंग संकट आहे. त्याबाबत शिवसेना लोकांबरोबर ठाम राहणार असल्याचे खासदार विनायक राऊत यांनी स्पष्ट केले. जर कोणी अशा प्रकल्पाची स्वप्ने पाहत असतील तर त्यांनी ती आतापासूनच पाहण्याची बंद करावीत. दोडामार्ग तालुका हा कोकणातील सर्वांत निसर्गसौंदर्याने नटलेला तालुका असून त्यावर मायनिंगचे कोणी संकट आणण्याचा प्रयत्न केला तर त्याची जरुर किंमत त्यांना मोजावी लागेल. या ठिकाणच्या नैसर्गिक रचनेचा विचार करून तसे रोजगार निर्माण करण्यावर आपला भर असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. वरील पार्श्वभूमीवर आपण त्या खात्याच्या राज्याच्या तसेच केंद्रीय मंत्र्याशीही चर्चा करून निर्णय घेणार असल्याचे सांगितले. यावेळी युवानेते विक्रांत सावंत, सभापती गणपती नाईक, बाबुराव धुरी, संपदा देसाई आदींनी विचार मांडले. यावेळी व्यासपीठावर नागेश परब, प्रदीप सावंत, सतीश कामत, प्रमोद गवस, सज्जन धाऊसकर, संजय गवस, सूर्यकांत परमेकर, गोपाळ गवस, धनश्री गवस, सतीश पाटणकर, रुपेश राऊळ, गणेशप्रसाद गवस आदी उपस्थित होते.

मोपा विमानतळाचा दोडामार्गला फायदा-किरण ठाकुर

जगाच्या पर्यटन नकाशावर आज गोवा राज्य असून या राज्याचा पर्यटन हा प्रमुख व्यवसाय आहे. देशी व विदेशी पर्यटकांची संख्या वाढू लागल्याने मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ आकार घेऊ लागले असून त्याचा फायदा दोडामार्ग तालुक्याला होणार आहे. मोपा परिसरातील कित्येक कि.मी. अंतरावर प्रचंड रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यात आता दोडामार्गने मागे राहता कामा नये. येणाऱया पर्यटकांचे स्वागत करत आपली कौटुंबिक अर्थव्यवस्था मजबूत करावी, असे आवाहन ठाकुर यांनी केले. या पार्श्वभूमीवर आपण पर्यटनपूरक अभ्यासक्रम सुरू केले असून त्यासाठी शैक्षणिक उपक्रमही राबविणार आहोत. मात्र, त्यासाठी राज्यशासनाने आवश्यक ते सहकार्य करणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

Related posts: