|Wednesday, April 24, 2019
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मराठी शाळाही दर्जेदार बनाव्यात

मराठी शाळाही दर्जेदार बनाव्यात 

प्रतिनिधी/ सावंतवाडी

अलिकडच्या काळात मुलांना इंग्रजी माध्यमाकडे पाठविण्याकडे पालकांचा ओढा आहे. त्यामुळे मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. मराठी माध्यमाकडे शिक्षण घेण्याचा विद्यार्थ्यांचा कल वाढवायचा असेल तर इंग्रजी माध्यमाप्रमाणे मराठी शाळांमध्ये विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन लोकमान्य मल्टिपर्पज को. ऑपरेटिव्ह सोसायटीचे संस्थापक तथा ‘तरुण भारत’चे समूहप्रमुख, सल्लागार संपादक किरण ठाकुर यांनी येथे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना केले.

सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या प्राथमिक शाळेत संस्थेचे संचालक शशी नेवगी यांची कन्या रोहिता शशिकांत नेवगी स्मृती डिजिटल कक्षाच्या
उद्घाटनप्रसंगी ठाकुर बोलत होते. यावेळी संस्थेचे सचिव अशोक दळवी, खजिनदार रमेश बोंद्रे, उपनगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, संस्थेचे संचालक चेतन नेवगी, माजी नगराध्यक्षा श्वेता शिरोडकर, नगरसेवक आनंद नेवगी, शशी नेवगी, संजू शिरोडकर, मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी सतीश पाटणकर, प्रा. गिरीधर परांजपे आदी उपस्थित होते.

                            तंत्रज्ञानच बनले शिक्षक!

ठाकुर म्हणाले, आज जगात नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. त्यामुळे जगातले ज्ञान आपल्याला अवघ्या काही सेकंदात मिळत असते. जादूच्या दिव्याप्रमाणे जगातील माहिती आपल्याला मिळत असते. या माहितीचा उपयोग किती करून घ्यायचा, हा प्रत्येकापुढे प्रश्न आहे. मात्र, नवीन तंत्रज्ञान शिक्षकांच्या पुढे उत्तमोत्तम शिक्षक बनत चालला आहे. त्यातूनच ई-लर्निंगची कल्पना पुढे आली. पूर्वी विद्यार्थ्यांना ज्ञान मिळवण्यासाठी शिक्षकांवर अवलंबून राहवे लागत होते. तशी परिस्थिती आता राहिलेली नाही. त्यामुळे शिक्षकांनीही ज्ञानदान करताना बदलत्या तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे. त्यादृष्टीने डिजिटल शाळा उपक्रम शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.

                            मातृभाषेतून उत्तम शिक्षण!

येत्या 2050 मध्ये भारत जगातील पहिल्या दोन क्रमांकाच्या देशात असणार आहे. त्यामुळे यापुढच्या काळात प्रचंड स्पर्धा असेल. या स्पर्धेत टिकण्यासाठी दर्जेदार शिक्षण आवश्यक आहे. मातृभाषेतून शिक्षण घेणे ही चांगली बाब आहे. मात्र, इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याचा कल वाढला आहे. इंग्रजी माध्यमाकडे सुविधा असतात. तशा सुविधा मराठी माध्यमात उपलब्ध झाल्यास पालक मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत पाठवतील. इंग्रजी भाषादेखील बदलत्या काळात महत्वाची असल्याचे ठाकुर म्हणाले.

                           शिक्षणाला लोकाश्रय हवा!

शिक्षणाला पूर्वी राजाश्रय होता. मात्र, आता परिस्थिती बदलली आहे. त्यामुळे शिक्षणाला लोकाश्रय मिळणे आवश्यक आहे. देणग्या, मदतीच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रात सुविधा निर्माण करण्यासाठी पावले उचलली पाहिजेत, असे ठाकुर यांनी सांगितले. शशिकांत नेवगी यांनी आपल्या मुलीच्या स्मृतिप्रित्यर्थ डिजिटल कक्ष सुरू करून मुलीच्या स्मृती जपल्या आहेत. ही चांगली बाब असल्याचे ठाकुर म्हणाले,

उपनगराध्यक्षा कोरगावकर यांनी बदलत्या काळात ज्ञानदानासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. त्यातून डिजिटल इंडियाची संकल्पना साकार होण्यास मदत मिळणार आहे, असे स्पष्ट केले. यावेळी शुभदा शिरसाट यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक धोंडी वरक यांनी तर सूत्रसंचालन ज्योत्स्ना गुंजाळ यांनी केले. आभार मुख्याध्यापक प्रदीप सावंत यांनी मानले. यावेळी वाय. पी. नाईक, वैभव केंकरे, आबा नेवगी उपस्थित होते.

Related posts: