|Tuesday, August 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » भूविकास बँकेच्या मालमत्तेचा लिलाव

भूविकास बँकेच्या मालमत्तेचा लिलाव 

लिलावातून मिळालेल्या पैशातून कर्मचाऱयांची थकीत देणी देणार

सरकार करणार संघटनेच्या पदाधिकाऱयांशी  चर्चा

मुंबई / प्रतिनिधी

अखेरची घटका मोजत असलेल्या राज्य सहकारी कृषि ग्रामीण बहुउद्देशीय विकास अर्थात भूविकास बँकेच्या मालमत्तेचा लिलाव करण्याचे सरकारने ठरवले आहे. मालमत्ता लिलावातून मिळणाऱया पैशातून अधिकारी आणि कर्मचाऱयांची वेतनापोटी थकीत असलेली जवळपास 250 कोटी रुपयांची देणी दिली जाईल.

शेतकऱयांच्या हक्काची बँक म्हणून ओळखली जाणारी भूविकास बँक डबघाईला आली आहे. कोटय़वधी रुपयांच्या कर्जामुळे सरकारने ही बँक बंद करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय होऊनही कर्जदारांकडून थकबाकीची वसुली झालेली नाही. याशिवाय बँकेच्या हजारो अधिकारी-कर्मचाऱयांना अनेक महिन्यांपासून वेतन तसेच सेवानिवृत्तीनंतरची थकबाकी मिळालेली नाही. त्यामुळे कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आली आहे.

यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठक झाली. बैठकीत भूविकास बँकेच्या संदर्भातील प्रश्नांचा आढावा घेण्यात आला. कर्मचाऱयांना त्यांचे थकीत वेतन मिळावे म्हणून बँक कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱयांशी चर्चा करून न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करणार असल्याची माहिती सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.

भूविकास बँकेच्या राज्यभरात 59 मालमत्ता आहेत. आजच्या बाजारभावाप्रमाणे मालमत्तेची किंमत सुमारे 500 कोटी रुपये इतकी आहे. ही मालमत्ता विकून बँकेच्या अधिकारी-कर्मचाऱयांची थकबाकी दिली जाणार आहे. मात्र, कर्मचारी-संघटनांनी अगोदर थकबाकी द्या आणि नंतरच बँकेची मालमत्ता विका, अशी भूमिका घेत न्यायालयात दावा दाखल केला आहे. त्यामुळे कर्मचाऱयांच्या मान्यतेनंतरच बँक मालमत्तेच्या लिलावाबाबत निर्णय घेऊन तसा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्यात येईल, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.