|Thursday, July 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » राहुल देसाई यांचा भाजप प्रवेश

राहुल देसाई यांचा भाजप प्रवेश 

अनिल कामिरकर/ मुंबई

राधानगरी विधानसभा मतदारसंघातील युवक नेते व माजी जि. प. सदस्य राहुल देसाई यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री दालनात हा कार्यक्रम संपन्न झाला. मुख्यमंत्र्यांनी देसाई यांच्या नेतृत्वाखाली या महिन्यात होणाऱया मेळाव्यासाठी उपस्थित राहणार असल्याचे सांगितले.

माजी आमदार बजरंग देसाई यांचे चिरंजीव राहुल देसाई यांच्या प्रवेशाने राधानगरी विधानसभा मतदारसंघात भाजपची ताकद वाढली असून येत्या  विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या ‘मिशन 2019’ ला ताकद मिळाली आहे. प्रवेशावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रविणसिंह सावंत, अल्केश कांदळकर आदी उपस्थित होते.

जिल्हास्तरीय नेत्यांकडून सततच्या होणाऱया गळचेपीला कंटाळून कार्यकर्त्यांचा पक्षबदलासाठी दबाव वाढला होता. अखेर महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. मंगळवारी मुख्यमंत्री दालनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल देसाई यांच्यासह कार्यकर्त्यांचे स्वागत करुन पक्षप्रवेश करुन घेतला. यावेळी त्यांनी पक्ष वाढीसह ध्येयधोरणे पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी आवाहन केले.

यावेळी बोलताना महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, राहुल देसाई यांच्या नेतृत्वाला मतदारसंघात विकासकामांच्या माध्यमातून उभारी दिली जाईल. त्यांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल.

यावेळी स्वागत करताना भाजप तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील म्हणाले, राहुल देसाई यांच्या प्रवेशासाठी गेली दोन वर्षे आम्ही प्रयत्नशील होतो. त्यांच्या आजच्या प्रवेशाने पक्षाला एक चांगले नेतृत्व मिळाले आहे. येणाऱया काळात पक्ष बळकटीसाठी त्याचा खूप मोठा फायदा होणार आहे. 

राहुल देसाई यांच्यासोबत तालुका संघाचे उपाध्यक्ष एम. डी. पाटील, जि. प. चे  माजी समाजकल्याण सभापती गोपाळराव कांबळे, प्रदीप पाटील, दिनकर देसाई, शिवराज देसाई, संदेश भोपळे, सुदेश सापळे, शिवाजी मातले, सागर भाट, रविंद्र जाधव, तालुका संघाचे संचालक हिंदुराव देसाई, बाळासाहेब केसरकर (आजरा), लहु पाटील, रंगराव पाटील (मालवेकर), किरण कुरडे, नारायण पाटील, एम. एन. कांबळे, सुरेश खोत, दगडू राऊळ, अनिल तळकर, मोहन सुर्यवंशी, दत्ताजीराव देसाई (हिरलगे), प्रकाश वास्कर, सुरेश देसाई, युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष संदीप पाटील, बी. एस. पाटील, एस. एल. पाटील, शांताराम तोंदकर यांनी प्रवेश केला.

‘दै. तरुण भारत’ चे वृत्त खरे ठरले

माजी आमदार बजरंग देसाई यांचे सुपुत्र माजी जि. प. सदस्य राहुल देसाई भाजपामध्ये प्रवेश करणार असे वृत्त ‘दै. तरुण भारत’ ने सर्वप्रथम प्रसिध्द केले होते. राहुल देसाई यांच्या भाजप प्रवेशाने ते खरे ठरले.