|Tuesday, January 22, 2019
You are here: Home » Top News » मंत्र्याच्या गाडया अडवून वीजदरवाढीचा जाब विचारा -जयंत पाटील

मंत्र्याच्या गाडया अडवून वीजदरवाढीचा जाब विचारा -जयंत पाटील 

 

प्रतिनिधी/ सांगली

सोयाबीन, कांदा व पाठोपाठ तुरडाळीप्रश्न सपशेल अपयशी ठरलेले राज्यातील भाजपा आघाडी शेतकऱयांची घोर फसवणूक करत असून उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱयांना कर्जमाफी दिली मग महाराष्ट्रात कर्जमाफी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणता मुहुर्त काढत आहेत? शेतीपंपाची वीजदरवाढ रद्द झालीच पाहिजे. त्यासाठी सांगली जिल्हयात येणाऱया मंत्र्याच्या गाडया अडवून वीजदरवाढीप्रश्नी त्यांना घेराओ व जाब विचारा. अशी रोखठोक भुमिका राज्याचे माजी अर्थमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांनी सोमवारी मांडली. वीजदरवाढीप्रश्नी काँग्रेस राष्ट्रवादीसह जिल्हयातील पाणीपुरवठा संस्था, इरीगेशन फेडरेशन व शेतकऱयांच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढून भाजपा सरकारवर हल्लाबोल करण्यात आला.

शेतीपंप वीजबिलादरवाढीच्या विरोधात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या प्रमुख दोन पक्षांनी मोर्चाची हाक दिली होती. राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयापासून मोर्चाला दुपारी साडेबाराला प्रांरभ झाला. उघडया जीपमधून  काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार मोहनराव कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व माजी आमदार विलासराव शिंदे, राष्ट्रवादीच्या आमदार श्रीमती सुमनताई पाटील हे  मोर्चाच्या अग्रभागी होते. त्यापाठोपाठ माजी मंत्री जयंत पाटील, माजी आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार हाफीज धत्तुरे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डॉ.विश्वजीत कदम, महापौर हारूण शिकलगार, काँग्रेसचे शहरजिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, मनपा सभागृहनेते किशोर जामदार, क्रांती साखर कारखान्याचे अध्यक्ष अरूण लाड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष दिलीप पाटील, राजारामबापू साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.आर.पाटील, वसंतदादा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, काँग्रेसचे युवा नेते सत्यजीत देशमुख, पुंडलचे जि.प.सदस्य शरद लाड, जि.प.च्या माजी अध्यक्षा मालन मोहिते, मनपा स्थायी सभापती संगीता हारगे, आनंदराव मोहिते हे मोर्चात सहभागी झाले होते.

जिल्हा परिषद, राममंदिर कॉर्नर, काँग्रेस कमिटी, स्टेशन चौक, राजवाडा चौकामार्गे मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर नेण्यात आला. तेथे मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी मोर्चासमोर बोलताना जयंत पाटील म्हणाले, राज्यात आपले सरकार असताना  वीजबिलाचे दर मर्यादित ठेवून  शेतकऱयांना  दिलासा दिला होता. सध्या शेतीमालाला भाव मिळत नाहीत. जे तर मिळत असते तर शेतीपंपाच्या वीजदरात वाढ करण्यास काही हरकत नव्हती. पण नोटाबंदीमुळे शेतकऱयांना कवडीमोल भावाने शेतीमाल विकावा लागला.  परकीय चलन वाचावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केले म्हणून शेतकऱयांनी मोठया प्रमाणात तूर लावली. तूरीचा एक दाणाही शिल्लक ठेवणार नाही. अशा घोषणा करणाऱया मुख्यमंत्र्यांनी शेतकऱयांची फसवणूक केली आहे. गोदामात जागा नाही व बारदाणे नाहीत म्हणून नाफेडने तूर खरेदी बंद केली. त्याचा फटका शेतकऱयांना बसला.

फडणवीस सरकारच्या काळात राज्यात दहा हजार तर केवळ 2016या वर्षामध्ये 3050 शेतकऱयांनी आत्महत्या केल्या. असे सांगून पाटील म्हणाले, वीजदरवाढ करून सांगलीसह पश्चिम महाराष्ट्रातील उपसा सिचन योजना मोडीत काढण्याचा राज्य सरकारचा डाव आहे. ऊर्जा मंत्री  बावनकुळे यांचा या भागावर आकस आहे.  ताकारी टेंभु म्हैसाळ योजनेचेही वीजबिल वाढेल तर आश्चर्य वाटण्यासारखे नाही. शेतकऱयांना आधारभूत किंमत मिळत नाही. त्यामुळे  यापुढील काळात पश्चिम महाराष्ट्रात आत्महत्या व्हायला लागतील. अशी भितीही त्यांनी व्यक्त केली.

वीजदरवाढीवरून केवळ पंतगराव कदम, व आम्ही नेतेमंडळीनी नव्हे तर तुम्ही लोकांनी रस्त्यावर यायला हवे. असे स्पष्ट करून जयंत पाटील म्हणाले, उद्योजकांनी वीज सवलत देता मग शेतकऱयांना रात्री अपरात्री आणि तिही खंडीत वीज का देता शिवाय दर वाढवून या सरकारला काय साध्य करायचे, मोदी सरकारची धोरणे शेतकऱयांच्या विरोधातील आहेत. पेट्रोलचे दर वाढले. शेतकरी व लोकांना आता या सरकारच्या विरोधातील संघर्ष आणखी तीव्र करावा लागेल.

विश्वजीत कदम म्हणाले, हा संघर्ष मोर्चा आहे. भाजपा सरकारच्या काळात  राज्यात साडेतीन हजार शेतकऱयांनी आत्महत्या केल्या आहेत. सहकारी चळवळ मोडण्याचा डाव आहे. मुंबई गुजरातमधील काही उद्योगपतींच्या इशाऱयावर  सरकार शेतकऱयांच्या विरोधात जुलमी निर्णय घेत आहे.  सरकारातील एकाही मंत्र्याला  शेतकऱयांची दुःखे माहीत नाहीत.

आमदार सुमनताई पाटील म्हणाल्या, शेतकऱयांना कर्जमाफी दिलीच पाहिजे.  पी.आर.पाटील म्हणाले, वीजेचे नवीन उत्पादन नाही. या महिन्यातही जादा विजबिले आली आहेत. शेतीपंपाना तिप्पट वीजबिले भरावी लागतील.

 मानसिंगराव नाईक म्हणाले, शेतकऱयांना लुटायचे काम हे सरकार करत आहे. शिराळा तालुक्याला वेगळा न्याय लावून शेतकऱयांवर अन्याय सुरू आहे. शेतीपंपाच्या वीजबिलासाठी संघर्ष तीव्र करावा लागेल.

विलासराव शिंदे म्हणाले,वीज नियामक आयोगाने पुढील तीन वर्षाचे वीजेचे दर निश्चित केले आहेत. आपणास आता आरपारची लढाई लढावी लागेल. प्रसंगी सचिवालयावर धडक मोर्चा काढावा लागेल.

अरूण लाड म्हणाले,  भाजपा सरकारने शेतकऱयांना जमेतच धरलेले नाही.शेतीपंपाच्या वीजबिलात अडीचपट वाढ केली आहे. नोटाबंदीने शेतकऱयांच्या नाशवंत मालाचे नुकसान झाले. बँकांचे साडेनऊ हजार कोटी बुडवून विजय मल्ल्या परदेशात पळून गेला. ऊर्जामंत्री शेतकऱयांना दाद देत नाहीत.

Related posts: