|Friday, April 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » नगराध्यक्षांचे कौतुक अन् ‘सूचक’ सल्ले!

नगराध्यक्षांचे कौतुक अन् ‘सूचक’ सल्ले! 

प्रतिनिधी / रत्नागिरी

कार्यक्रम रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचा, व्यासपीठावर भाजपचे गल्ली ते दिल्लीपर्यंतचे नेते, मात्र चर्चेचा केंद्रबिंदू ठरले ते शिवसेनेचे नगराध्यक्ष राहुल पंडीत! राज्यात अन् देशात काहीही घडत असो पण रत्नागिरीत मात्र या कार्यक्रमाच्या निमित्ताने गंमतीदार चित्र पहायला मिळाले. थेट लोकसभा अध्यक्षांनीच केलेले नगराध्यक्षांचे भरभरून कौतुक व त्यांना दिलेले ‘सूचक’ सल्ले हे कमी म्हणून की काय सोसायटीच्या कार्याध्यक्षांनी पंडितांची काळजीच्या स्वरात केलेली चौकशी यामुळे उपस्थितांच्या भुवया चांगल्याच ऊंचावल्या आहेत.

रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या श्रीमान गंगाधर गोविंद पटवर्धन इंग्लिश मिडियम स्कूलच्या बाबुराव जोशी गुरूकूल प्रकल्पाच्या नूतन वास्तूचा उद्घाटन समारंभ सोमवारी सायंकाळी आयोजित करण्यात आला होता. व्यासपीठावर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांच्यासह भाजपचे तालुकाध्यक्ष व जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश शेवडे, गुहागरचे माजी आमदार विनय नातू यांसारखे स्थानिक व राज्य पातळीवरचे नेते उपस्थित होते.

राहुल पंडित आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, शिल्पाताई माझी चौकशी करत होत्या. बाळा, तुला काही ‘टेन्शन’ नाही ना, असे त्यांनी आपल्याला विचारले. यावर आपल्याला कसलेही टेन्शन नाही. नगराध्यक्ष म्हणून आता तीन-चार महिनेच झाले आहेत. चांगले काम सुरू आहे. शहराचा चांगला विकास करू, असे आपण सांगितल्याचे ते म्हणाले. पंडित यांच्या या वक्तव्याचा संदर्भ घेऊन रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन म्हणाल्या, ‘नगराध्यक्ष सगळ्य़ांचेच आहेत. आपण पक्षापलिकडे जाऊन विचार केला पाहिजे. विकासासाठी त्यांना साथ दिली पाहिजे’’, अशा शब्दात त्यांनी मनसोक्त कौतुक केले.

यानंतर लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन बोलण्यास उभ्या राहिल्या. मनोगताच्या सुरूवातीपासूनच त्यांनी पंडितांवर कौतुकाचा वर्षाव सुरू केला. ‘राहुल तुझ्याकडे चांगल्या क्षमता आहेत. तू शहराला चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतोस.’ असे सांगतानाच ‘नाही म्हणायलाही शिकले पाहिजे. जवळच्या माणसालासुद्धा त्याची चूक दाखवली पाहिजे.’ अमूक-अमूक गोष्ट चूक आहे. या बाबतीत मी तुझी साथ नाही देवू शकत, असे ठामपणे म्हटले पाहिजे’ यांसह अनेक ‘सूचक’ सल्ले त्यांनी दिले.

Related posts: