|Thursday, April 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » पडवे येथे आढळला मृत बिबटय़ा

पडवे येथे आढळला मृत बिबटय़ा 

वार्ताहर/ जैतापूर

राजापूर तालुक्यातील पडवे येथील श्री नवलादेवी मंदिरानजीक एक वर्षाची बिबटय़ा मादी मृतावस्थेत आढळून आली आहे. दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱयांनी पंचनामा करून मृत बिबटय़ावर अंत्यसंस्कार केले. बिबटय़ाचा मृत्यू नेमका कशाने झाला ते समजू शकलेले नाही.

तालुक्यातील पडवे गावात एक बैठक आयोजीत करण्यात आली होती. त्या बैठकीच्या अजेंडय़ाची प्रत गावातील श्री नवलादेवी मंदिराच्या जवळ असलेल्या नोटीस बोर्डवर लावण्यासाठी ग्रामपंचायतीचे शिपाई संदीप अवसरे गेले असता त्यांना काहीतरी कुजल्याचा वास आला. त्यावेळी त्याने आजुबाजूला पाहिले. त्यावेळी एक बिबटय़ा मृतावस्थेत आढळून आला. त्यांनी गावचे पोलीस पाटील लक्ष्मीकांत अवसरे यांना याबाबत खबर दिली. यानंतर पोलीस पाटलांनी राजापूरचे वनरक्षक सागर गोसावी यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर राजापुरच्या वनपाल राजश्री किर, वनरक्षक सागर गोसावी व विजय म्हादये यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.

वनविभागाकडून मृत बिबटय़ाचा पंचनामा करण्यात आला. त्यावेळी त्याच्या पोटाखालील भाग बराच सडल्याचे व नखेही कुरतडल्याचे आढळले. मृतावस्थेत सापडलेला बिबटय़ा हा मादी जातीचा असून तो मृत होवून किमान तीन ते चार दिवसांचा कालावधी लोटला असल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिकाऱयांनी व्यक्त केला. बिबटय़ा नक्की कोणत्या कारणाने मृत झाला ते समजू शकले नाही. वनविभागाने मृत्य बिबटय़ावर अंत्यसंस्कार कले. यावेळी ग्रामस्थ शरद तांबे व संतोष तांबे यांनी वनविभागाला मदत केली.

Related posts: