|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सीआयआयकडून ‘जीएसटी’चे स्वागत

सीआयआयकडून ‘जीएसटी’चे स्वागत 

प्रतिनिधी/ पणजी

जीएसटी अर्थात गुडस् सर्व्हीस टॅक्सचे भारतीय उद्योग महासंघाने (सीआयआय) स्वागत केले असून तो कर देशासाठी महत्वाचा असल्याने त्याबाबत जनजागृती करण्याचे ठरविले आहे. गुंतवणूक तसेच औद्योगिक क्षेत्रात गोव्याचे मानांकन घसरले असून ते पुन्हा वर यावे आणि आघाडीवर रहावे म्हणून महासंघ सरकारशी सहकार्य करणार आहे.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. महासंघाचे पश्चिम विभागाचे अध्यक्ष निनाद कर्पे यांनी पत्रकार परिषदेत वरील निवेदन करुन सांगितले की उद्योग क्षेत्रातील गोव्याच्या मानांकनात प्रगती व्हावी म्हणून महासंघ सातत्याने प्रयत्नशील राहून सरकारला मदत करणार आहे. गोव्यात उद्योग सुरु व्हावेत, वाढावेत तसेच त्यांचा विकास व्हावा म्हणून नवीन उद्योजकांसाठी सहायता केंद्र (क्लिनिक) सुरु करण्याचा इरादा असून ते महिन्यातून एकदा सर्वांसाठी मार्गदर्शन-सल्ला याकरीता उपलब्ध असेल त्यानंतर खऱया अर्थाने गोव्याचे मानांकन सुधारेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

जीएसटी म्हणजे उद्योगांसाठी एक प्रकारचे आव्हान असून त्यावर आधारीत अनेक चर्चासत्रे महासंघातर्फे आयोजित करण्यात येणार आहेत. नवीन उद्योगांना अर्थसहाय्य मिळावे म्हणून ‘अर्थसहाय्य पोर्टल’ सुरु करण्यात आले असून गोव्यातही आता ते लागू होणार असल्याची माहिती देण्यात आली.