|Thursday, July 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » निपाणी,लोकूरमध्ये वळिवाच्या हलक्या सरी

निपाणी,लोकूरमध्ये वळिवाच्या हलक्या सरी 

प्रतिनिधी/ निपाणी

निपाणी, लोकूरसह परिसरात बुधवार 3 रोजी दुपारी 3 च्या सुमारास वळीव पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. सुमारे अर्धातास हा पाऊस झाला. यामुळे उष्म्यामुळे हैराण झालेल्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. याशिवाय दिवसभर ढगाळ वातावरण दिसून आल्याने मोठय़ा वळिवाची अपेक्षा लागून राहिली आहे.

चार दिवसापूर्वी सायंकाळी सुमारे तासभर वळीव पावसाने निपाणीसह परिसरात मोठी हजेरी लावली. यानंतर मात्र पुन्हा उष्णतेत वाढ झाल्यामुळे मोठय़ा वळिवाची शक्यता धुसर झाली होती. मात्र बुधवारी सकाळपासूनच शहर व परिसरात ढगाळ वातावरण दिसून आले. यानंतर दुपारी 3 च्या सुमारास वळीव पावसास सुरुवात झाली. पाऊस सुरु झाल्यावर शहरात वाहनधारक, प्रवासी तसेच नागरिकांची एकच तारांबळ उडाल्याचे दिसून आले. मात्र पुन्हा अर्ध्या तासानंतर पाऊस थांबला.

अजूनही वाढत्या उष्णतेने पाणी टंचाई कायम असून परिसराला मोठय़ा वळिवाची प्रतीक्षा आहे. यामुळेच तर ऊसपिक तारणार असून पेरणीपूर्व कामास गती मिळणार आहे. यंदा तंबाखू दर मोठय़ा प्रमाणात घसरल्याने ही तूट भरून काढण्यासाठी खरीप हंगाम साधण्याचे नियोज शेतकरी वर्गातून सुरु आहे. निपाणीत अजूनही वाढत्या उष्णतेने अंगाची लाही लाही होत आहे. ज्येष्ठ नागरिकांकडून छत्रीचा वापर ऊन व पाऊस या दोन्ही कारणांसाठी होत आहे. बुधवारी दिवसभर असलेल्या ढगाळ वातावरणाने परिसरात मोठय़ा वळिवाची अपेक्षा उंचावली आहे.

लोकूर परिसरात अर्धा तास हजेरी

लोकूर : लोकूर, कल्लाळ, शेडबाळ स्टेशन व शेडबाळ परिसरात बुधवार 3 रोजी सायंकाळी सुमारे अर्धा तास झालेल्या वळीव पावसामुळे सकाळपासूनच उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना व शेतकऱयांना काहीसा दिलासा मिळाला आहे. कृष्णा नदीत सध्या पाणी असतानाही वीजपुरवठा व्यवस्थित दिला जात नसल्याने शेतकऱयांना शेतीला पाणी पुरवठा करता येईना, अशी परिस्थिती नदीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱयांची झाली आहे. त्यामुळे परिसरात अनेक ठिकाणी ऊसपिके व इतर पिके वाळल्याचे दिसून येत आहे. याच दरम्यान बुधवारी सायंकाळी 5 नंतर मात्र वातावरणात अचानक बदल होऊन ढगाळ वातावरण निर्माण होऊन किमान अर्धा तास पाऊस झाल्याने शेतीपिकांना थोडासा तरी दिलासा मिळाला आहे.

Related posts: