|Saturday, October 20, 2018
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » भाजपमधील वाद चव्हाटय़ावर, काँग्रेसमध्ये नवी खळबळ

भाजपमधील वाद चव्हाटय़ावर, काँग्रेसमध्ये नवी खळबळ 

आपल्यावर कारवाई होणार याची जाणीव झाल्यानेच की, काय ईश्वरप्पा संगोळ्ळी रायण्णा ब्रिगेडला चिकटून आहेत. लवकरच प्रमुख नेते कार्यकर्त्यांसाठी अभ्यासवर्ग घेण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे शिस्तीचा पक्ष अशी ज्याची ओळख होती, त्या भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर आला आहे.

शिस्तीचा पक्ष अशी ज्याची ओळख होती, त्या भाजपमधील अंतर्गत वाद चव्हाटय़ावर आला आहे. प्रदेशाध्यक्ष येडियुरप्पा आणि विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते ईश्वरप्पा हे भर रस्त्यावर एकमेकांविरुद्ध उभे ठाकले आहेत. दोन ज्ये÷ांच्या वादात आपण कोणाच्या बाजून थांबायचे हा कार्यकर्त्यांसमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे. पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाने या वादात हस्तक्षेप करून सद्यस्थितीचा अहवाल मागविला आहे. कर्नाटकाचे प्रभारी मुरलीधर राव यांनी नेते-कार्यकर्त्यांशी चर्चा करून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांना आपला अहवाल दिला आहे. या वादाचे मूळ शिमोगा जिल्हय़ातील घडामोडींत असले तरी संगोळ्ळी रायण्णा ब्रिगडेची स्थापना आणि त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांत निर्माण झालेली गोंधळाची स्थिती हेच वादाचे मूळ कारण असल्याचे भासविण्यात येत आहे. दोन नेत्यांमध्ये जुंपलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या हायकमांडने ‘ब्रिगेड’ला ब्रेक लावला आहे. तरीही ईश्वरप्पा एका पाठोपाठ एक वक्तव्ये करीत पक्ष संघटना बळकट करण्यासाठीच संगोळ्ळी रायण्णा ब्रिगेडची स्थापना झालेली आहे. ब्रिगेडच्या राजकारणापासून आपण तसूभरही मागे हटणार नाही अशी भूमिका मांडत आहेत. रा. स्व. सरसंघचालक मोहन भागवत तीन दिवस कर्नाटकाच्या दौऱयावर असतानाच या घडामोडी घडल्या आहेत आणि प्रथमच दोन ज्ये÷ नेत्यांच्या वादात संघ प्रचारकांच्या नावानेही शिमगा झाला. पक्षाचे राष्ट्रीय सह संघटना सचिव बी.एल. संतोष हेच या घडामोडींमागचे खरे सूत्रधार आहेत असा थेट आरोप येडियुरप्पा यांनी केला आहे. नंजनगुड आणि गुंडलूपेठमधील पराभवानंतर तर ईश्वरप्पा अधिकच आक्रमक झाले आहेत. हा आक्रमकपणा ईश्वरप्पा यांच्या मुळावर उठणार याची सर्व लक्षणे दिसून येत आहेत.

27 एप्रिल रोजी ईश्वरप्पा यांच्या नेतृत्वाखाली बंडखोर नेते कार्यकर्त्यांचा बेंगळूर येथे मेळावा झाला. नेते कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात भाग घेऊ नये अशी सूचना करण्यात आली होती. मात्र येडियुरप्पांची सूचना डावलून ‘पक्ष संघटना वाचवा’ या नावाखाली मेळावा भरवून या मेळाव्याच्या व्यासपीठावर येडियुरप्पा यांच्या नेतृत्वाला आव्हान देण्यात आले. त्यामुळेच ईश्वरप्पा आणि त्यांच्या समर्थकांवर सूड उगविण्याची भाषा येडियुरप्पा करीत आहेत. प्रथमच संगोळ्ळी रायण्णा ब्रिगेडचा पक्षाशी काहीएक संबंध नाही असे राष्ट्रीय नेतृत्वाने जाहीर केले आहे. अमित शहा यांच्या आदेशावरूनच ब्रिगेडचे कामकाज सुरू आहे असे ईश्वरप्पा सांगत आले आहेत. कर्नाटकाचे प्रभारी मुरलीधर राव यांनी ब्रिगेडशी भाजपचे संबंध नाहीत असे जाहीर केल्यानंतर ईश्वरप्पा उघडे पडले आहेत. येडियुरप्पा यांच्या विरोधात आघाडी उघडून स्वतः त्याची जबाबदारी सांभाळणाऱया ईश्वरप्पा यांचे विरोधी पक्षनेतेपद धोक्मयात आले आहे. सद्यस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी येडियुरप्पा समर्थक गो. मधुसूदन, माजी मंत्री एम. पी. रेणुकाचार्य आणि ईश्वरप्पा समर्थक निर्मलकुमार सुराणा आणि भानूप्रकाश यांना प्रमुख जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे. 6 व 7 मे रोजी म्हैसूर येथे पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक होणार आहे. ‘मिशन-150’ ची दिशा ठरविण्यासाठी होणाऱया या बैठकीवरही येडियुरप्पा विरुद्ध ईश्वरप्पा यांच्यात सुरू असलेल्या राजकीय संघर्षाची छाया आहे. या बैठकीत ईश्वरप्पा आणि त्यांचे समर्थक भाग घेतील असे वाटत नाही. आपल्याला अद्याप निमंत्रण आले नाही. ते पोचल्यावर भाग घ्यायचा की, नाही ते बघू असे सांगून ईश्वरप्पा यांनी पक्षातील गुंता सुटेपर्यंत आपण बंडाचा झेंडा खांद्यावरून खाली ठेवणार नाही हेच सुचविले आहे. त्यामुळे संघर्ष अधिक चिघळणार याची लक्षणे दिसून येत आहेत. कारण नंजनगुडमध्ये पराभूत झालेले श्रीनिवास प्रसाद यांची पक्षाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड झाली आहे. ईश्वरप्पांना डिवचण्यासाठीच येडियुरप्पांनी ही निवड केली आहे. ईश्वरप्पा यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई झाली तर पक्षात उभी फूट पडणार हे निश्चित आहे.

आपल्यावर कारवाई होणार याची जाणीव झाल्यानेच की, काय ईश्वरप्पा संगोळ्ळी रायण्णा ब्रिगेडला चिकटून आहेत. लवकरच प्रमुख नेते, कार्यकर्त्यांसाठी अभ्यासवर्ग घेण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. रायचूर येथे अभ्यासवर्ग भरविण्यात येणार असून त्यासाठी आवश्यक तयारीही सुरू झाली आहे. रिसॉर्ट राजकारणातून सत्ता स्थापन करण्याची आपल्याला गरज नाही. कर्नाटकात संघाचे सरकार यायला हवे. त्यासाठीच आपले प्रयत्न सुरू आहेत, असे सांगत ईश्वरप्पा यांनी संघाची भलावण सुरू केली आहे. बी.एस. संतोष यांच्या माध्यमातून संघ नेत्यांनीही ईश्वरप्पा यांच्यामागे आपली शक्ती लावली आहे. कर्नाटकातील घडामोडीमुळे संघप्रमुख मोहन भागवत हे सध्या नाराज आहेत. त्यामुळे संघ प्रचारकांवर उघडपणे आरोप करू नका असा सल्ला राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी कर्नाटकातील भाजप नेत्यांना दिला आहे. त्यामुळे येडियुरप्पा यांनी सध्या आपल्या तोंडाला कुलूप लावले आहे. आपल्या रक्ताच्या थेंबाथेंबात भाजप भिनलेला आहे. आपण पक्ष सोडणार नाही असे ईश्वरप्पा वारंवार सांगत असले तरी जर पक्षाने कारवाई केलीच तर वेगळा विचार करण्याची तयारीही त्यांनी केली आहे. येडियुरप्पा आणि अनंतकुमार यांच्यातील संघषामुळेच कर्नाटकात भाजपला व्यवस्थित सत्ता चालवता आली नाही. येडियुरप्पा विरोधकांनी विरोधी पक्षाशी हातमिळवणी करून एकापाठोपाठ अशी त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर पडतील याची काळजी घेतली. त्यामुळेच पाच वर्षांत तीन मुख्यमंत्री बदलावे लागले हा इतिहास आहे. निवडणुकीला एक वर्ष शिल्लक असतानाच त्याची तयारी करण्याऐवजी एकमेकांवर कुरघोडी करण्यातच हे नेते धन्यता मानत आहेत. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी येडियुरप्पा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला आहे. भाजपला रामराम ठोकून त्यांनी के.जे.पी.ची स्थापना केल्यामुळेच केवळ 40 जागांवर समाधान मानावे लागले. गेल्या निवडणुकीत येडियुरप्पा यांनी वठवलेली भूमिका आता ईश्वरप्पा वठवत आहेत. शेवटी पक्षालाच त्याचा फटका बसणार आहे.

काँग्रेसनेही संघटनात्मक बदलाची सुरुवात केली आहे. कर्नाटकाचे प्रभारी दिग्विजयसिंग यांना डच्चू देण्यात आला आहे. या बदलाला गोव्यातील घडामोडीही कारणीभूत आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या परदेश दौऱयावर असताना हा बदल झाला हे विशेष. कण्णूर (केरळ) चे खासदार के. सी. वेणुगोपाल यांच्या खांद्यावर कर्नाटकाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वेणुगोपाल हे राहुल गांधी यांच्या खास वर्तुळातील नेते आहेत. लवकरच प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदावरही नव्या नेत्याची नियुक्ती होणार आहे. गेली 4 वर्षे दिग्विजयसिंग कर्नाटकाचे प्रभारी होते. कर्नाटकातील त्यांचा कार्यकाळ नेहमीच वादग्रस्त होता. मूळ काँग्रेसजन आणि उपरे या वादात त्यांनी ठोस असे काहीच केले नाही. उलट वाद जिवंत ठेवून स्वतःचे महत्त्व वाढवून घेण्यातच त्यांनी धन्यता मानली. डी. के. शिवकुमार आणि एस.आर. पाटील या दोन नेत्यांमध्ये अध्यक्षपदासाठी चढाओढ सुरू आहे भाजपला शह देण्यासाठी काँग्रेसने जर लिंगायत चेहऱयाला पसंती दिली तर एस. आर. पाटील यांची वर्णी लागण्याची शक्मयता आहे. जर वक्कलिग कार्डचा वापर करण्याचे ठरविले तर डी. के. शिवकुमार यांना संधी मिळणार आहे. नंजनगुड आणि गुंडलूपेठ पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विजय झाला त्यामुळे मुख्यमंत्री सिद्धरामय्यानी पक्षावरील आपली पकड अधिक घट्ट करण्यासाठी प्रदेशाध्यक्षपदावर आपल्याच समर्थक नेत्याची कशी निवड होईल याची काळजी घेतली असली तरी राहुल गांधी यांच्या डोक्मयात मात्र वेगळाच विचार आहे असे दिसते. एक खांबी कारभाराला आळा घालण्यासाठी सामूहिक नेतृत्वावर अधिक भर दिला जात आहे. काँग्रेसचे ज्ये÷ नेते एच. विश्वनाथ निजदमध्ये प्रवेश करण्याच्या मार्गावर आहेत. भाजप आणि काँगेसमधील घडामोडी तटस्थपणे पाहणारे एच.डी. देवेगौडा आणि कुमारस्वामी किंगमेकर होण्याचे स्वप्न रंगवत आहेत. तंत्राशिवाय निवडणुका जिंकता येत नाहीत म्हणून प्रशांत किशोर यांच्या टीमची मदत घेतली जात आहे. सर्वच पक्ष मतदारसंघनिहाय सर्वेक्षण करून घेत आहेत. आता हे तंत्र कुणाला फायदेशीर ठरणार याचे उत्तर एक वर्षानंतर मिळणार आहे.

Related posts: