|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » स्वच्छ शहराच्या यादीत 234 वा क्रमांक

स्वच्छ शहराच्या यादीत 234 वा क्रमांक 

कल्याण-डोंबिवली महापालिकेचा प्रताप, तरीही प्रशासनांकडून सारवासारव

कल्याण / प्रतिनिधी

कल्याण- डोंबिवली महापालिकेचा स्वच्छ शहराच्या यादीत  तब्बल 234 वा क्रमांक लागला आहे. मागील वर्षीच्या सर्व्हेत शेवटच्या 10 मध्ये कल्याण- डोंबिवली महापालिकेचा नंबर लागला होता. मात्र आता 500 शहरात 234 वे स्थान मिळाले असून या सर्व्हेत गतवर्षी पेक्षा आपली कामगिरी चांगली असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे. पालिका प्रशासनाकडून कचरा प्रश्नावर सुरू असलेल्या कारवाई मुळेच काही प्रमाणात आपला दर्जा उंचावल्याचे पालिकेचे अधिकारी आणि महापौर यांनी सांगितले.

स्मार्टसिटीच्या बोहल्यावर चढलेल्या कल्याण- डोंबिवली महापालिकेचा  मागील वर्षी राज्य शासनाने केलेल्या सर्व्हेत अस्वच्छ शहराचा ठपका ठेवला होता. यानंतर पालिक क्षेत्रात स्वच्छ भारत अभियानातून वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहे.  आधारवाडी डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्यामुळे पुढील वर्षी आपला या यादीतील स्थान सुधारेल असा दावा पालिका आयुक्त ई रविन्द्रण आणि महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केला होता. मात्र यानंतर शहरातील कचऱयाची समस्या सुटलेली नसून दररोज कचरा उचलण्यासाठी असलेल्या घंटागाडय़ांच्या देखभाल दुरूस्तीसाठीची बिलेदेखील पालिका प्रशासनाकडून रखडवण्यात आली होती. यामुळे शहरात कचऱयाचे ढीग साचले असून कल्याण पूर्वेला अतिशय  गलीच्छ स्वरूप आले आहे. नव्याने वसलेल्या कल्याणातील कचरा देखील नियमित उचलला जात नसून या कचराकुंडय़ा काठोकाठ ओसंडून भरून वाहत आहेत.

डेब्रिजचे रस्त्याच्याकडेला असलेले ढीग, शहराच्या काही भागातून फिरताना दुर्गंधीमुळे नाक मुठीत घेऊन मार्गक्रमण करण्याची नामुष्की नागरिकांवर  ओढावली आहे.  थोडक्यात पालिकेकडून कचऱयाचे विघटन आणि विल्हेवाट लावण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी प्रत्यक्षात शहरातील कचरा प्रशासनासाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यातच  काल राज्य शासनाने जाहीर केलेल्या स्वच्छ शहराच्या यादीत कल्याण- डोंबिवलीला उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूरच्या नंतर स्थान देण्यात आले आहे. याबाबत प्रशासनाचे उपायुक्त धनाजी तोरस्कर यांच्याशी संपर्क  साधला असता मागील वर्षी पेक्षा यंदा पालिकेची स्थिती चांगली असून यंदा सर्व्हेसाठी निवडण्यात आलेल्या शहराची संख्या कितीतरी अधिक होती. या शहरात आपल्याला बऱयापैकी स्थान मिळाल्याचा दावा त्यांनी केला आहे. तर महापौर राजेंद्र देवळेकर यांनी देखील प्रशासनाची पाठराखण करताना यंदाची स्थिती समाधानकारक असल्याचे सांगितले. मात्र आता पालिकेने तयार केलेल्या प्रकल्पाची तातडीने अंमलबजावणी करण्यासाठी प्रशासनाने कारवाई सुरू करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.