बेळगाव ‘स्मार्ट’ होणार तरी कसे?
स्वच्छ शहरांच्या यादीत 248वे स्थान
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
यंदाच्या वर्षात स्वच्छ भारत सर्वेक्षणाअंतर्गत केलेल्या पाहणीत इंदूर हे मध्यप्रदेशातील ऐतिहासिक महत्वाचे शहर भारतातील सर्वात स्वच्छ शहर ठरले आहे. दुसरा क्रमांक याच राज्याची राजधानी भोपाळने पटकाविला आहे. पहिल्या 10 क्रमांकामध्ये महाराष्ट्रातील नवी मुंबई हे एकच शहर आहे. तर कर्नाटकातील म्हैसूर शहराचा क्रमांक पाचवा क्रमांक लागला आहे. बेळगाव तब्बल 248 व्या क्रमांकावर आहे.
10 सर्वात अस्वच्छ शहरांमध्ये उत्तर प्रदेशातील 2, बिहारमधील 2, पंजाबमधील 2, उत्तराखंडमधील 1 तर महाराष्ट्रातील भुसावळ या एका शहराचा समावेश करण्यात आला आहे. सर्वाधिक स्वच्छ शहरे मध्यप्रदेशातील आहेत. एकंदर 434 शहरांची पाहणी या सर्वेक्षणाअंतर्गत करण्यात आली. दोन महिने चाललेल्या या पाहणीचे निष्कर्ष गुरुवारी घोषित करण्यात आले.
पहिल्या 10 स्वच्छ शहरांमध्ये अनुक्रमे पहिला क्रमांक इंदूर (मध्यप्रदेश), दुसरा क्रमांक भोपाळ (मध्यप्रदेश), तिसरा क्रमांक विशाखापट्टणम (आंध्र प्रदेश), चौथा क्रमांक सुरत (गुजरात), पाचवा क्रमांक म्हैसूर (कर्नाटक), सहावा क्रमांक तिरूचिरापल्ली (तामिळनाडू), सातवा क्रमांक नवी दिल्ली (महानगरपालिका क्षेत्र), आठवा क्रमांक नवी मुंबई (महाराष्ट्र), नववा क्रमांक तिरूपती (आंध्र प्रदेश) तर दहावा क्रमांक वडोदरा (गुजरात) यांचा समावेश आहे.
हे राष्ट्रव्यापी सर्वेक्षण भारतीय गुणवत्ता मंडळाने (क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडिया) आपल्या देखरेखीत करून घेतले. जानेवारी 2017 मध्ये सुरू झालेले हे सर्वेक्षण दोन महिने चालले. यात अनेक निकषांचा उपयोग करण्यात आला. प्रत्येक निकषावर प्रत्येक शहर किती प्रमाणात खरे उतरते, यावर त्यांना क्रमांक देण्यात आले आहेत. अशा प्रकारच्या सर्वेक्षणाचे हे तिसरे वर्ष आहे.
स्वच्छ भारत मोहिमेची प्रेरणा
स्वच्छ भारत मोहिम पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात 2014 मध्ये सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत दरवर्षी भारतातील सुमारे 500 महत्वाच्या शहरांचे सर्वेक्षण केले जाते. त्यानंतर निरीक्षणांचे विश्लेषण करून या शहरांना क्रमांक देण्यात येतो. यासाठी विविध निकष उपयोगात आणण्यात येतात.
मोहीम प्रभावी ठरत असल्याचा दावा
स्वच्छ भारत मोहिमेला ही अपेक्षेपेक्षा कमी वेगाने पण यशस्वी होत आहे, असा दावा मंडळाने केला आहे. ही मोहिम सुरू केल्यानंतर अनेक शहरांमधील प्रशासन आणि नागरीक यांच्यात स्वच्छतेचे भान निर्माण झाले आहे. लोक स्वयंस्फूर्तीने या मोहिमेत सहभागी होत असून स्थानिक प्रशासनाचीही या प्रश्नाकडे पाहण्याची दृष्टी सकारात्मक बनली आहे. त्यामुळे अनेक शहरांमध्ये गटारांची साफसफाई, कचऱयाची उचल व प्रक्रिया, सांडपाणी व्यवस्थापन, वृक्षारोपण इत्यादी कामे पूर्वीपेक्षा जास्त उत्साहात आणि वेगाने होत आहेत असे दिसून येत आहे, असे प्रतिपादन मंडळाने केले आहे.
अनेक आव्हाने कायम
स्वच्छ भारत मोहिम सुरू होऊन अडीच वर्षे झाली आहेत. मात्र अनेक आव्हाने आजही कायम आहेत. स्थानिक प्रशासनांना भेडसावणारी पैशाची चणचण हे महत्वाचे आव्हान आहे. कचरा प्रक्रियेने अनेक शहरांमध्ये म्हणावा तसा वेग घेतलेला नाही. त्यामुळे अनेक शहरांचा क्रमांक बराच खालचा लागलेला आहे. तरीही भविष्यकाळात ही मोहिम नेटाने चालविल्यास परिस्थितीत बरीच सुधारणा घडू शकते, असे मत मंडळाने नोंदविले आहे.
बॉक्स
हे आहेत ‘स्वच्छ शहर’चे निकष…
- प्रशासनाकडून कचऱयाची उचल
- झाडलोट आणि वाहतूक व्यवस्था
- घनकचरा प्रक्रिया, त्याची विल्हेवाट
- मुक्त हागणदारी समाप्ती, स्वच्छतागृहे
- माहिती तंत्रज्ञान आणि शिक्षणव्यवस्था
- लोक व प्रशासन यांच्या मनोवृत्तीत बदल
- शहरातील नागरिकांचे क्षमतासंवर्धन