|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आमोणेतील सेसा प्रकल्पाची सभापतींकडून पाहणी

आमोणेतील सेसा प्रकल्पाची सभापतींकडून पाहणी 

प्रतिनिधी/ सांखळी

डिचोली तालुक्यातील न्हावेली-आमोणा येथील सेसाच्या वीज निर्मिती व कोक प्रकलपामुळे वृक्षसंपदेवर मोठे संकट निर्माण झाले आहे. सदर प्रकल्पामुळे नागरिकांच्या आरोग्याकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचे वृत्त दै. तरुण भारतमध्ये प्रसिद्ध झाल्यानंतर गुरुवारी सांखळीचे आमदार तथा सभापती डॉ. प्रमोद सावंत तसेच गोवा प्रदूषण मंडळाचे अधिकारी शिवानंद सालेलकर यांनी भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली. यावेळी त्यांनी कंपनीला प्रदूषण नियंत्रणात आणण्याचे आदेश दिले.

गुरुवारी संध्याकाळी सभापती प्रमोद सावंत तसेच गोवा प्रदूषण मंडळाच्या अधिकाऱयांनी प्रकल्पाची पाहणी केली असता तेथे मोठय़ा प्रमाणात प्रदूषण होत असल्याचे निदर्शनास आले. सरकार प्रदूषणाकडे दुर्लक्ष करीत नसून आम्ही वेळोवेळी विविध प्रकारे तपासण्या करीत असतो, असे यावेळी त्यांनी सांगितले.

प्रदूषणाची ठोस अशी कारणे सापडू शकली नाहीत. मात्र हा संशोधनाचा विषय असल्याने ठोस असे काही सांगू शकत नाही. सरकारच्या प्रदूषण मंडळाची नेहमी नजर सांखळीत होणाऱया प्रदूषणाकडे असते तसेच त्याची दखल आम्ही वेळोवेळी घेतो, असे यावेळी अधिकाऱयांनी सांगितले.

सर्व उपाययोजना करून झाल्यानंतर सरकारची एक अनुभवी टीम पाठवून पाहणी करण्यात येणार आहे. प्रत्येक आठवडाचा अहवाल प्रदूषण मंडळाने सरकारला सादर करावा. प्रदूषणावर नियंत्रण फार महत्त्वाचे आहे. प्रत्येक गोष्टीची गांभीर्याने दखल घेतली जाणार असल्याचे सभापती प्रमोद सावंत म्हणाले.

सांखळी मतदारसंघात खाण व इतर कंपन्यांकडून होणाऱया प्रदूषणावर दै. तरुण भारतने आवाज उठविला आहे. त्यामुळे स्थानिक पंच, सरपंच तसेच लोकप्रतिनिधींनी तरुण भारतचे अभिनंदन केले जात आहे. सरपंच ऍड. दीपेश नाईक, परब, सर्वेश मुळगावकर, कृष्णा बायेकर, तसेच माजी आमदार प्रताप गावस यांनी वाढत्या प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली आहे.